
भूषण महाजन
ता. ३१ मार्च ते ४ एप्रिलचा सप्ताह ट्रम्प यांनीच गाजवला. अत्यंत गाजावाजा केलेले टॅरिफ अस्त्र त्यांनी २ एप्रिल रोजी जगावर डागले आणि संपूर्ण जगाची भंबेरी उडवली ह्यात शंकाच नाही. हा जवळचा, तो दूरचा असा भेदभाव न ठेवता सब घोडे बारा टक्के ह्या न्यायाने जगातील प्रत्येक देशावर त्यांनी १० टक्के आयातकर लादला होताच, त्याजोडीला आता ट्रम्प ह्यांच्या ‘मती’प्रमाणे टॅरिफ ह्या नावाखाली अधिकच करवाढ केली गेली आहे.
कुठल्या देशावर किती टॅरिफ लादला गेला त्याचे आकडे समाज माध्यमांवर फिरत असल्याने त्याची पुनरुक्ती करीत नाही. मात्र इतकीच नोंद करावी लागेल, की त्यांचे तथाकथित मित्र देश - कॅनडा, ब्रिटन व भारतही त्यातून सुटलेले नाहीत. भारतासह प्रत्येकच देशाला आपले व्यापार धोरण पुन्हा नव्याने आखावे लागणार आहे.