
Japan leadership change
esakal
डॉ. मनीष दाभाडे
पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे जपान पुन्हा एकदा राजकीय अस्थैर्यामध्ये ढकलला गेला आहे. देशांतर्गत आव्हाने आणि प्रादेशिक तणाव वाढत असल्यामुळे, जपानला स्थिर नेतृत्वाची गरज होती. या काळामध्ये इशिबा यांनी दिलेला राजीनामा जपानसाठी मोठा धक्का आहे. जपानमध्ये १९५५पासून लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे (एलडीपी) वर्चस्व आहे. मात्र, या पक्षाला लागोपाठच्या निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला.
त्यामुळे एक वर्षांचा काळ पूर्ण करण्याआधीच इशिबा यांना राजीनामा द्यावा लागला. अमेरिका आणि जपान यांच्यामध्ये नुकताच व्यापार करार झाला. या करारावरून निर्माण झालेली नाराजी ही ‘एलडीपी’च्या पराभवामागील एक महत्त्वाचे कारण होती.
मात्र, इशिबा यांचा राजीनामा हा एका नेत्याचे पतन नाही, तर यातून जपानच्या राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये दिसणारी खोल दरी दर्शविते. महासत्तांच्या स्पर्धांतील तणाव आणि ‘क्वाड’सारख्या प्रादेशिक गटांसाठीची प्रतिष्ठा या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. भारतासाठी आणि हिंद-प्रशांत दृष्टिकोनानेही जपानमधील कोणतीही घडामोड तितकीच महत्त्वाची ठरते.