

China in South America
esakal
श्रीराम कुंटे - kunteshreeram@gmail.com
आर्थिक शक्ती आपल्याकडे नाही हे वास्तव स्वीकारून आपण चीनपेक्षा जास्त इच्छाशक्ती दाखवली तर यातूनही मार्ग निघू शकतो. वसाहतकाळात शोषण झालेल्या दक्षिण अमेरिकेला आज आधुनिक शोषणकर्त्यांच्या रूपात चीन किंवा इतर देशांना बघायची इच्छा नाहीये. त्यांना चीन हवा आहेच, पण चीनला पर्याय ठरू शकणारा देशही हवा आहे. हे ओळखून भारताने आपली धोरणं आखली तर हा ग्रेट गेम साधनसंपत्तीभोवती न फिरता आपल्याला हव्या असलेल्या मुद्द्यांभोवती फिरू शकेल.
मेक्सिकोत वर्ष १५१९ मध्ये पाऊल ठेवणाऱ्या हर्नान कॉर्टेझ याने फक्त सहाशे सैनिक, अफाट धैर्य आणि देवी रोगाची अनपेक्षित साथ यांच्या बळावर बलाढ्य ॲझटेक साम्राज्यावर फक्त दोन वर्षांत विजय मिळवला. या साम्राज्याला लुटून स्पेन हा युरोपमधला प्रमुख देश बनला. स्पेनने पुढे १६९७ ला माया साम्राज्यावर विजय मिळविल्यावर दक्षिण अमेरिकेवर युरोपचं वर्चस्व प्रस्थापित झालं. १९व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपीय साम्राज्यं पूर्ण भरात असताना अमेरिकेचा उदय होऊ लागला. जागतिक महासत्ता बनण्यासाठी अमेरिकेला प्रादेशिक महासत्ता बनणं गरजेचं होतं. त्यासाठी १८२३ ला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेम्स मन्रो यांनी दक्षिण अमेरिकेत युरोपियांना वेसण घालण्याचं परराष्ट्र धोरण आखलं. हे मन्रो धोरण आजही अमेरिकेच्या दक्षिण अमेरिकेतल्या धोरणावर प्रभाव टाकतंय.