

India-China Geopolitics
esakal
श्रीराम कुंटे - kunteshreeram@gmail.com
आता येणाऱ्या काळात चीनचं आव्हान आणखी उग्र होणार आहे. हिंदी महासागरात भारताच्या वर्चस्वाला आव्हान मिळणार आहे. युक्रेन आणि ऊर्जासुरक्षेचं आव्हान असणार आहे. परिश्रमाने मिळवलेले शेजारी दुरावणार आहेत. बहुकेंद्री जगात संतुलन करावं लागणार आहे. आपल्या देशाची २०५० पर्यंतची दिशा स्पष्ट करणारा हा काळ असेल.
नरसिंहराव यांच्यानंतर पुढच्या दोन वर्षांमध्ये तब्बल तीन पंतप्रधान या देशाने पाहिले. अखेर १९ मार्च १९९८ ला वाजपेयी पंतप्रधान बनले आणि राजकीय अस्थिरता संपली. भू-राजकीय पातळीवर मात्र अस्थिरता वाढतच होती. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर अनेक मध्य आशियाई देश जन्माला आले. पाकिस्तानचा अडथळा असल्याने भारत मध्य आशियापासून तुटलेला आहे. चीन मात्र क्षिनजियांग मधून मध्य आशियाशी थेट जोडलेला आहे. त्यामुळे चीनने मध्य आशियाशी संबंध जोडण्यात भारतावर आघाडी घेतली. सोव्हिएत प्रभावाखाली असणाऱ्या या प्रदेशाला चीनने शांघाय सहकार्य परिषद आणि ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पाच्या माध्यमातून विळखा कधी घातला, हे जगाला समजलंच नाही. पाश्चात्त्य जगताने रशियाच्या परसदारात त्याचे हितसंबंध लक्षात न घेण्याची केलेली चूक चीनच्या पथ्यावर पडली. चीनच्या या डावपेचांबद्दल आणि भारत या प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्यासाठी कोणते ग्रेट गेम खेळतोय याबद्दल आपण या लेखमालेत पुढे बघणार आहोत.