

India US Strategic Relationsc
esakal
इंडो-पॅसिफिक हे चीनशी स्पर्धेसाठीचे क्षेत्र मानलं जातं. तिथं अमेरिकेच्या पुढाकारानं भारत, जपान, ऑस्ट्रेलियासह क्वाड या गटाची स्थापना झाली. ट्रम्प या गटाकडंही उत्साहानं पाहत नाहीत. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणातही इंडो-पॅसिफिकमधील अमेरिकेच्या बदलत्या भूमिकेचं प्रतिबिंब पडलं होतं. दीर्घकालीन व्यूहात्मक आघाडीकडून अमेरिका तात्पुरत्या देवाणघेवाणीकडं वळत आहे. हे ट्रम्प यांच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य बनलं आहे. ‘हाऊडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’चे दिवस सरले आहेत. त्याची जागा रोकडा व्यवहार घेतो आहे.
अमेरिकेचं इराणमधील युद्ध आणि ते थांबवण्याच्या वाटाघाटी सुरू असताना भूराजकीय रचनेतील अनेक बदल पुढं येऊ लागले होते. या युद्धानं पश्चिम आशियातील समीकरणं दीर्घकाळासाठी बदलतील हे तर उघड आहे. शिवाय निदान काही काळासाठी तरी अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धेचे आयाम बदलले आहेत. पाकिस्तानची अमेरिकेसाठी उपयुक्तता पुनश्च दिसू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मागच्या सुमारे दोन दशकांत अमेरिका आणि भारत यांच्यातील उभयपक्षी संबंध नव्यानं ठरवले जातील, याची स्पष्ट चिन्हे दिसतात. व्यापार करारापासून ते संरक्षण आणि व्यूहात्मक प्राधान्यमक्रमापर्यंत हे बदल दिसताहेत. त्यातून दहशतवादविरोधातील जागतिक युद्ध आणि चीनला रोखण्याची रणनीती यातून भारत आणि अमेरिकेची तयार झालेली जवळीक बदलते आहे. अमेरिका - किमान ट्रम्प यांची अमेरिका भारताकडं व्यूहात्मक भागीदार म्हणून पाहील का, यापुढं प्रश्नचिन्हं तयार झालं आहे. अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच नाव बदलून ते केवळ फॅसिफिक कमांड ठेवणं हा त्यातील ताजा दृश्यभाग.