

India West Asia Relations
esakal
श्रीराम कुंटे - kunteshreeram@gmail.com
अलिप्ततावाद म्हणजे तटस्थता नव्हे, हे नेहरूंनी पॅलेस्टाइन आणि इजिप्त प्रकरणांमध्ये घेतलेल्या भूमिकेतून दाखवून दिलं. त्यानंतरही अनेक प्रसंगांमधून भारत सैद्धांतिकदृष्ट्या आपल्या विरोधात नाही, हे पश्चिम आशियातल्या सर्व प्रमुख देशांच्या लक्षात आलं. भारत पश्चिम आशियाचा विश्वासू मित्र बनला. भारताची पुण्याई इतकी जबरदस्त होती, की १९९० मध्ये कुवेतवर इराकने आक्रमण केलं, तेव्हा सुमारे
१.७ लाख भारतीय तिथे अडकले होते. पुढच्या दोन महिन्यांत एअर इंडियाने तब्बल ४८८ उड्डाणं करून त्यांना भारतात परत आणलं. आजही ती जगातील सर्वांत मोठ्या नागरी सुटका मोहिमांपैकी एक मानली जाते.
२०१७ ला मोदी बेंजामीन नेतान्याहू यांना भेटायला जेरुसलेमला गेले. त्यानंतर लगेचच नाही पण या भेटीचा धुरळा खाली बसायच्या आत त्यांनी पॅलेस्टाइन मधल्या रमाल्लाहला भेट दिली. या भेटीच्या आसपासच सौदी राजपुत्र मोहम्मद बिन सलमान याने त्यांचं रियाधमध्ये शाही स्वागत केलं. त्याचवेळी भारत छाबहार बंदरात गुंतवणूक करत होता. भारत एकाच वेळी इस्राईल आणि पॅलेस्टाइन, इराण आणि सौदी अरेबिया, इस्राईल आणि इतर अरब देश यांच्याशी मधुर संबंध कसे ठेवू शकला याविषयी जगाच्या राजनैतिक वर्तुळात नेहमीच आश्चर्य व्यक्त केलं जातं. पण भारताचं पश्चिम आशियातलं राजनैतिक संतुलन हा काही एकविसाव्या शतकातला अपघात नाहीये. त्याच्यामागे दोन हजारांहून अधिक वर्षांचे सांस्कृतिक संबंध आणि व्यापार, संयमी राजनैतिक धोरण आणि सामरिक स्वायत्तता या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत.