

Indian Astronomy
esakal
अर्चित गोखले - खगोलशास्त्राचे अभ्यासक
रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करण्यापासून ते अत्याधुनिक दुर्बिणी आणि गुरुत्वीय लहरींचा वेध घेण्यापर्यंत भारताने खगोलशास्त्रात मोठी मजल मारली आहे. गगनयान, आदित्य-एल१, शुक्रयान यांसारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमा आणि ''लायगो-इंडिया''सारखे जागतिक प्रकल्प भारताला विश्वाचे गूढ उकलण्याच्या एका नव्या वळणावर घेऊन आले आहेत. आगामी दशक हे भारतीय खगोलशास्त्रासाठी केवळ नव्या तंत्रज्ञानाचे नव्हे, तर नव्या शोधांचे आणि जागतिक सहकार्याचे दशक कसे ठरणार आहे, याचा सविस्तर वेध...
रात्रीच्या निरभ्र आकाशाकडे पाहताना दिसणारा प्रत्येक तारा हा केवळ प्रकाशाचा एक बिंदू नसतो. तो एखाद्या दूरच्या विश्वाची, जन्म घेणाऱ्या किंवा मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या ताऱ्याची, कृष्णविवराची किंवा कदाचित आपल्या सूर्यासारख्या एखाद्या ग्रहपरिवाराची कहाणी सांगत असतो. हजारो वर्षांपूर्वी भारतीयांनी आकाशातील या हालचालींची नोंद केली; आजचा भारत मात्र त्या आकाशातील प्रकाशाचेच नव्हे, तर क्ष-किरणांचे, रेडिओ लहरींचे, अवरक्त किरणांचे आणि गुरुत्वीय लहरींचेही अर्थ उलगडण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
येत्या दशकात भारतीय खगोलशास्त्रासमोर म्हणूनच एक विलक्षण संधी उभी आहे. ही संधी केवळ नवीन दुर्बिणी उभारण्याची किंवा आणखी काही अंतराळमोहिमा पाठवण्याची नाही. विश्वाच्या मूलभूत प्रश्नांच्या शोधात भारताने स्वतःची स्वतंत्र आणि प्रभावी वैज्ञानिक ओळख निर्माण करण्याची ही वेळ आहे. त्याच वेळी भारताचा अंतराळ कार्यक्रमही पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडे अधिक महत्त्वाकांक्षी टप्प्यात प्रवेश करत आहे. मानवाला अंतराळात पाठविण्याच्या गगनयान मोहिमेपासून ते भविष्यातील भारतीय अंतराळ स्थानकापर्यंत आणि शुक्राच्या अभ्यासासाठी नियोजित शुक्रयानापर्यंत भारताच्या अंतराळ क्षमतेचा विस्तार होत आहे. या सर्व मोहिमांचा थेट उद्देश खगोलशास्त्र नसला, तरी त्यातून विकसित होणारे प्रक्षेपण तंत्रज्ञान, जीवनसमर्थन प्रणाली, अंतराळातील दीर्घकालीन प्रयोग, दळणवळण व्यवस्था आणि वैज्ञानिक उपकरणे भविष्यातील अंतराळ-विज्ञानासाठी महत्त्वाची पायाभूत सुविधा ठरणार आहेत.