

Artemis II Mission Success
esakal
अलीकडेच नासाच्या आर्टेमिस २ मोहिमेने चंद्राभोवती यशस्वी प्रदक्षिणा पूर्ण करून पृथ्वीवर सुरक्षित परत येत इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अपोलो ११ मोहिमेनंतर जवळपास ५ दशकांनी मानव पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेने यशस्वीरित्या पुढे जात असल्याचे हे ठोस संकेत आहेत. या मोहिमेमुळे मानवयुक्त चंद्रप्रवासाची क्षमता प्रत्यक्षात सिद्ध झाली असून, पुढील चंद्र लँडिंग मोहिमांसाठी मार्ग अधिक स्पष्ट झाला आहे. आजच्या जागतिक पार्श्वभूमीवर, जिथे चीन आणि रशिया यांसारखे देशही चंद्र मोहिमांमध्ये वेगाने प्रगती करत आहेत, तिथे आर्टेमिस २ चे यश केवळ वैज्ञानिक उपलब्धी नसून जागतिक सामर्थ्य आणि तांत्रिक नेतृत्वाचे प्रतीक ठरते. त्यामुळे आर्टेमिस मिशन आता केवळ भविष्यातील योजना राहिलेले नाही, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीत यशस्वी ठरत असलेले एक व्यापक आणि दीर्घकालीन अवकाश धोरण बनले आहे. मानवाने चंद्रावर तग धरणे, तेथील संसाधनांचा वापर करणे आणि पुढील मोहिमांसाठी मंगळ ग्रहाकडे वाटचाल करणे या सर्व उद्दिष्टांच्या दिशेने मानवजातीने एक मोठे पाऊल टाकले आहे. त्यामुळे, आर्टेमिस २ च्या यशानंतरचा हा काळ ‘नव्या चांद्रयुगाची’ सुरुवात मानला जात आहे.
आर्टेमिसची संकल्पना या जाणिवेतून उदयास आली की, चंद्र हा अंतराळातील पुढील संशोधनासाठी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. १९७२ मध्ये अपोलो मोहिमा संपल्यानंतर चंद्र संशोधन मागे पडले आणि लक्ष पृथ्वीभोवतीच्या उपग्रह तंत्रज्ञानाकडे वळले. मात्र, २१व्या शतकात नव्या भू-राजकीय स्पर्धा, नैसर्गिक संसाधनांची वाढती गरज आणि तांत्रिक प्रगती यामुळे चंद्र पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. नासाच्या नेतृत्वाखाली २०१७ मध्ये आर्टेमिस कार्यक्रम सुरू झाला. या मोहिमेची उद्दिष्टे म्हणजे पहिल्या महिला आणि पहिल्या रंगवर्णीय व्यक्तीला चंद्रावर उतरवणे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन केंद्र उभारणे आणि पुढील मोहिमांसाठी मंगळ ग्रहाकडे जाण्याची तयारी करणे. ही दृष्टी केवळ वैज्ञानिक नसून राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घटकांनाही स्पर्श करणारी आहे.