
दा. कृ. सोमण
भारतीय पंचांग म्हणजे भविष्य नव्हेच! पंचांग म्हणजे खगोल गणित. पंचांग म्हणजे आकाशाचे वेळापत्रक. पंचांग म्हणजे विज्ञान. भारतीय संस्कृतीमध्ये पंचांग कालगणनेला इतिहास लाभला आहे. हेच पंचांग नव्या स्वरूपात ग्रेगोरियन दिनदर्शिकेच्या प्रत्येक महिन्याच्या चौकटीत कॅलेंडरमध्ये दिलेले असते. ते प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.
भारतीय पंचांग हे कालगणनेचे एक प्राचीन साधन आहे. ते भारतीय संस्कृतीचे एक महत्त्वाचे अंग आहे. त्यामध्ये जसे धर्मशास्त्र आहे, तसेच ऋतूंवर आधारित विज्ञानही आहे. एका अर्थाने पंचांग हे खगोलगणित आहे. पंचांग ज्या ग्रंथावरून तयार करतात त्या ग्रंथाला ‘करणग्रंथ’ म्हणतात. जसे आकाशात आहे, तसेच पंचांगात हवे आणि जसे पंचांगात आहे तसे आकाशात दिसले पाहिजे यासाठी करणग्रंथांमध्ये वेळोवेळी सुधारणा केली गेली.