

Investment and Wealth Creation
esakal
उल्हास जोशी - joshiulhas5@gmail.com
आर्थिक क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचे क्षेत्र फार महत्त्वाचे समजले जाते. बहुतेकांना गुंतवणूक करण्याची, संपत्ती निर्माण करण्याची, श्रीमंत होण्याची इच्छा असते. या विषयावर शेकडो पुस्तके जगभर प्रसिद्ध झाली आहेत, होत आहेत आणि यापुढे पण प्रसिद्ध होत राहतील. या क्षेत्रातील एक जगभर गाजलेले पुस्तक म्हणजे ‘द एलिमेंट्स ऑफ इन्व्हेस्टिंग.’
हे पुस्तक अमेरिकेतील बर्टन जी. मालकेल आणि चार्लस डी. इलिस या लेखकद्वयीने लिहिले असून, दोघेही अमेरिकेच्या आर्थिक विश्वातील नावाजलेली व्यक्तिमत्वे आहेत. या दोघांना मिळालेल्या एकूण १०४ वर्षांच्या अनुभवावर (बर्टन यांचा ५४ वर्षांचा आणि चार्लस यांचा ५० वर्षांचा अनुभव) आधारीत हे पुस्तक असून, पुस्तकाचा मूळ उद्देश सर्वसामान्य लोकांना अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत गुंतवणूक, संपत्तीनिर्मिती, श्रीमंत होण्याचा मार्ग याविषयी मार्गदर्शन करणे हा आहे.
या पुस्तकाची सुरवात ओसिलिओ मॅकॅरी या अमेरिकी महिलेच्या उदाहरणावरून होते. १९९९ मध्ये या महिलेचा वयाच्या ९१व्या वर्षी मृत्यू झाला. त्यावेळी या महिलेने युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न मिसिसिपीला दीड लाख डॉलरची देणगी दिली होती. याबद्दल तिला युनिव्हर्सिटीची ‘ऑनररी डिग्री’ तर मिळालीच; पण त्याचबरोबर ‘प्रेसिडेन्शियल सिटिझन्स मेडल’ हा अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पण मिळाला. कारण तिने आयुष्यभर लोकांची धुणी-भांडी करून पैसे कमावले होते. यातून बचत करून तिने ही देणगी दिली होती. कारण ती ‘ग्रेट सेव्हर’ होती. त्यामुळे गुंतवणूक असो, संपत्तीनिर्माण करणे असो किंवा श्रीमंत होणे असो, याची सुरवात बचतीपासून होते. थोडे-थोडे पैसे साठवून मोठी बचत करता येते, पण केव्हा तर जेव्हा थोडे-थोडे पैसे साठवायला सुरवात करता तेव्हाच! तोपर्यंत नाही.