

Global stock diversification
esakal
भारतीय शेअर बाजाराने अलीकडच्या काळात उच्चांक गाठल्यानंतर काहीशी स्थिरता आणि घसरण अनुभवली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेसह इतर जागतिक बाजारांनी लक्षणीय तेजी दाखवली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी केवळ देशांतर्गत बाजारावर अवलंबून न राहता, परदेशी बाजारांकडेही वळण्याची गरज आहे का, याचा विचार करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. त्या अनुषंगाने घेतलेला हा आढावा...
गेल्या २६ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या शेअर बाजाराने नवा उच्चांक केला (‘निफ्टी’ होता २६,२२७, ‘सेन्सेक्स’ ८५,९३० अंश). त्यानंतर अधूनमधून उसळी आली असली तरी निर्देशांक एकूण घसरणीच्या प्रवाहात आहेत. एप्रिल महिनाअखेरीस ‘निफ्टी’ २३,९९७ अंशांवर बंद झाला. भारताची तरुण लोकसंख्या, ‘कन्झम्प्शन थीम’ यांसारख्या कथा आता गुंतवणूकदारांना पाठ झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत बाजारात प्रवेश करणाऱ्या नवशिक्यांच्या पदरी थोडी निराशाच पडली आहे. अगदी गेल्या एक वर्षाचा विचार केल्यास ३० एप्रिल २०२५ पासून ‘निफ्टी’ १.४३ टक्के, तर ‘सेन्सेक्स’ ४.४६ टक्के पडला आहे. भारतीय निर्देशांक आज ना उद्या वर जातील, यात काही शंका नाही; पण आपल्या गुंतवणुकीत वैविध्य आणण्यासाठी भारताबाहेर बघावे का, असा प्रश्न सल्लागारांपुढे उभा आहे.