

Khadi and Indian Freedom Struggle
esakal
शेफाली वैद्य - saptrang@esakal.com
विणकरांच्या अडचणींत भारतीय समाजजीवनाची उतरंडही गुंतलेली होती. वस्त्रोद्योगाचे कौशल्य हे ठरावीक जाती आणि समुदाय ह्यांच्यापुरतेच मर्यादित राहिले होते. विणकराकडे ज्ञान होते, कौशल्य होते, कला होती, पण त्याची कमाई ठरवणाऱ्या व्यवहारांवर त्याचे नियंत्रण नव्हते. त्यामुळे विणकराला मदत म्हणजे फक्त नवा माग देणे नव्हे. सूत मिळण्यापासून तयार कापड विकले जाण्यापर्यंतच्या साखळीत विणकराला न्याय्य स्थान मिळणे आवश्यक होते आणि त्यासाठी संस्थात्मक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे होते. स्वातंत्र्यपूर्वकाळात या सगळ्यांचे परिमाण वेगळे ठरले.
कापड केवळ अंगच झाकत नाही तर राजकीय भूमिकाही व्यक्त करू शकते, हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याने जगाला दाखवून दिले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात साध्या सुती वस्त्राला स्वदेशीचा, स्वावलंबनाचा आणि प्रतिकाराचा अर्थ मिळाला. इतिहासकार लीझा त्रिवेदी यांच्या Clothing Gandhi’s Nation या ग्रंथात खादीच्या या प्रवासाचा मागोवा घेतला आहे. भारताच्या समृद्ध वस्त्र इतिहासाचा हा पुढचा अध्याय होता. हाताने कातलेल्या सुतातून हातमागावर विणलेले साधेसे जाडे-भरडे वस्त्र, म्हणजेच खादी, स्वदेशीची ओळख बनले. भारतीय इतिहासात प्रसिद्ध असलेल्या धक्क्याच्या मलमलसारखी खादी तलम नव्हती, बनारसच्या रेशमी वस्त्रासारखी जरतारी नव्हती आणि महाराष्ट्राच्या पैठणीसारखी भरजरी नव्हती. तरीही भारतीय वस्त्रकलेच्या इतिहासात खादीचे स्थान अनन्यसाधारण आहे. खादीच्या धाग्यांमध्ये स्वावलंबनाचा स्वीकार होता आणि परकीय सत्तेला दिलेला ठाम नकारही. पण खादीचे स्वातंत्र्यलढ्यातले महत्त्व समजून घेताना खादी निर्मितीमागचे श्रम, किंमत आणि खादीच्या मर्यादाही तपासायला हव्यात.