Marathi Satire and Humour Literature
esakal
ब्रिटिश नंदी - sakal.avtaran@gmail.com
प्रो. बापट, यांना अखिल विश्वात कोण ओळखत नाही? तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास (प्राचीन आणि अर्वाचीन), राजकारण (प्राचीन आणि अर्वाचीन तसेच नुसते चीन), मानसशास्त्र (न्यू ॲण्ड मॉडर्न), संस्कृत (अल्ट्रामॉडर्न), लॅटिन (ओन्ली न्यू) व इंग्रजी (ओल्ड डिक्शनरी) अशा विविधांगी विषयांमध्ये प्रो. बापट अतिशय पारंगत आहेत. त्यांच्याइतका भाषाकोविद व शास्त्रपारंगत विद्वान संपूर्ण ग्रहमंडळात सांपडण्याची शक्यता कमीच. एकवेळ परग्रहावर पिण्याचे शुद्ध पाणी सांपडेल; पण असे विद्वत्तेचे मिनरल पाणी सांपडणार नाही. भले भले थोर्थोर भाषापंडित प्रो. बापट यांच्यासमोर अक्षरश: लोळण घेतात. सांप्रतकाळी तर प्रो. बापट हे आदर्शवादाचेच आदर्श ठरू लागले आहेत.
...तर अशा दशग्रंथी विद्वानाचे चीज या महाराष्ट्राच्या भूमीत होऊ शकले नाही, याची आम्हांस खंत वाटते. ज्या गोष्टीचे पुण्यात चीज होऊ शकत नाही, तिचे महाराष्ट्रात काय होणार, कपाळ? अशा पंडितगृहस्थास खरे तर दिल्ली सरकारने घरी (नारायण पेठेत) जाऊन पद्मश्री वगैरे देण्याची गरज आहे. मध्यंतरी म्यागसेसे अवॉर्ड देणाऱ्या कमिटीची माणसे गपचूप येऊन गेली. ही कमिटी संभाव्य पुरस्कार विजेत्यांची आडून आडून चौकशी करते आणि मग हळूच पुरस्कार जाहीर करते... पण या कमिटीची माणसे येऊन जऽऽरा पुढे जाऊन ‘प्रभा विश्रांती गृहात’ बसून बटाटेवडा खाऊन गेली. तोच तो बिगर चटणी वडा! (‘चटणी वड्याच्या आतच आहे, बघा!’ - इति मालक.) बटाटेवडा खाताना कमिटीवाले मूळ काम विसरल्याने प्रो. बापट यांचा म्यागसेसे पुरस्कार थोडक्याकरिता हुकला. सध्याचे जगच मुळी असे झाले आहे, त्याला काय क्रावे? असो.
...कपाळावरून आठवले. प्रो. बापट यांचे कपाळ ऊर्फ भालप्रदेश विलक्षण विस्तीर्ण आहे. त्यात ते दर एकवीस दिवसांनी नारायण पेठेतल्या केशकर्तनालयातल्या खुर्चीत मान टाकून बसतात. अर्ध्या तासाने भालप्रदेश आणि त्याच्याही वर पसरलेला तालप्रदेश एकसंध होतो, जणू काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर एकमेकांत विलीन व्हावे! परंतु ही उपमा चुकली. काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर विलीनीकरण कितीही स्वप्नवत वाटले तरी ते तर्कसंगत नाही, असे प्रो. बापट यांचेच मत आहे. तसे त्यांच्या मते जगात काहीच तर्कसंगत नाही.