
मिलिंद गुणाजी
milindgunaji@gmail.com
मुंबईनजीकचं प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचं प्रवेशद्वार म्हणजे दस्तुरी नाका; मात्र तिथे फसवणूक होत असल्याच्या भावना काही जणांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केल्याने अस्सल निसर्गप्रेमी पर्यटकही चिंता व्यक्त करत होता. एक मात्र खरंय, की अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ निसर्ग अनुभवायचा असेल तर तुम्हाला माथेरानशिवाय जवळचा पर्याय नाही.
माथेरान म्हणजे निवांत निसर्ग. एक सुकून मिळतो इथे आल्यावर. नक्की सांगता येणार नाही, तरीही आतापर्यंत शंभर वेळा तरी मी माथेरानची वारी केली आहे. इथला निसर्गच मला इथे खेचून आणतो. काय जादू आहे माहीत नाही; पण मी आज अनेक पर्यटनस्थळं पालथी घातली तरी माथेरानची साद मला मुंबईच्या कोलाहलातही ऐकू येते आणि मग माझी पावलं आपसूकच इकडे धावू लागतात.