

Cauvery Water Dispute
esakal
लेखक : सुदर्शन कुडचे
कावेरी नदी ही दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांतील लाखो नागरिकांच्या जीवनाचा आधार आहे. या नदीच्या पाण्याच्या वाटपावरून अनेक दशकांपासून वाद सुरू आहेत. अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारने प्रस्तावित केलेला मेकेडातू प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या प्रकल्पाला मंजुरी देण्याबाबत, पर्यावरणीय परवानग्या, न्यायालयीन प्रक्रिया आणि राज्यांमधील मतभेद यांमुळे हा विषय केवळ जलसंपत्तीपुरता मर्यादित राहिलेला नसून संघराज्य व्यवस्था, पर्यावरण संरक्षण आणि जलसुरक्षा या तिन्ही दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे.
मेकेडातू हे कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यात कावेरी नदीवरील एक नैसर्गिक दरीचे ठिकाण आहे. कावेरी आणि अर्कावती नद्यांचा संगम झाल्यानंतर काही अंतरावर हा भाग येतो. स्थानिक भाषेत 'मेकेडातू' या शब्दाचा अर्थ 'शेळीने उडी मारलेली जागा' असा होतो. नदीची दरी अत्यंत अरुंद असल्यामुळे या ठिकाणी धरण उभारण्याची योजना अनेक वर्षांपासून विचाराधीन आहे.
मेकेडातू प्रकल्पामध्ये सुमारे साठ ते सत्तर हजार दशलक्ष घनफूट पाणी साठविण्याची क्षमता असलेला जलाशय उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पातून बंगळुरू महानगर तसेच आसपासच्या भागांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण आणि पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन हा प्रकल्प आवश्यक असल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. या प्रकल्पातून सुमारे चारशे मेगावॅट जलविद्युत निर्मितीचीही क्षमता विकसित होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प जलसंपत्तीबरोबरच ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातो.