esakal | मेस्सी-बार्सिलोना; दोघांत तिसरा जुनं सगळं विसरा!
sakal

बोलून बातमी शोधा

मेस्सी-बार्सिलोना; दोघांत तिसरा जुनं सगळं विसरा! }

माहेर घर बनलेल्या स्पॅनिश क्लब बार्सिलोनाकडून अर्ध्या किंमतीवर खेळण्याची हिंमत दाखवूनही त्याला अखेर आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी निरोप घ्यावा लागला.

मेस्सी-बार्सिलोना; दोघांत तिसरा जुनं सगळं विसरा!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीचा नवा क्लब ठरलाय. माहेर घर बनलेल्या स्पॅनिश क्लब बार्सिलोनाकडून अर्ध्या किंमतीवर खेळण्याची हिंमत दाखवूनही त्याला अखेर आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी निरोप घ्यावा लागला. बार्सिलोनाकडून जवळपास दोन दशकं खेळणाऱ्या मेस्सीसाठी फ्रान्सच्या पॅरिस सेंट-जर्मेन क्लबनं 4 कोटी 10 लाख डॉलर रकमेचा करार केलाय. ब्राझीलचा नेमार, फ्रान्सचा कायलन एम्बापे, स्पेनचा सर्जिओ रामोस आणि युरोपियन चॅम्पियन संघाचा गोली डोनारुमा या ताफ्यासोबत मेस्सीचा खेळ पाहण्याचं भाग्य फुटबॉल चाहत्यांना लाभणार असले तरी मेस्सी शेवटपर्यंत बार्सिलोनाकडून का खेळू शकला नाही? हा प्रश्न अनेक वर्षे चर्चाचा विषय ठरेल.

अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार बार्सिलोना क्लबपासून वेगळे होणार असल्याच्या चर्चा गेल्या 4 वर्षांपासून रंगत होत्या. मागील वर्षभरात या चर्चेला अक्षरश: उत आला. क्लब सोडण्याच्या मुद्द्यावरुन मेस्सी आणि क्लबचे तत्कालीन अध्यक्ष जोसेफ मर्तोमेव यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचीही चर्चा चांगलीच रंगली. पण करारातील अटी अन्य कोणत्याही क्लबला परवडणार नसल्यामुळे ही सगळी नौटंकी असल्याच्या प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या. क्लब आणि स्पॅनिश लिग मॅनेजमेंट सुरुवातीपासून मेस्सीला करार मोडून सहज दुसऱ्या क्लबमध्ये जाऊ देणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते. जर मेस्सीने करार तोडला तर त्याला 700 मिलियन यूरो (जवळपास 6 हजार कोटी) रुपये मोजावे लागणार होते. मेस्सीसाठी दुसरा कोणताही क्लब एवढी रक्कम मोजायला तयार होणार नाही, अशी चर्चा रंगली. हे प्रकरण कोर्टापर्यंत जाईल असे चित्र निर्माण झाले असताना बार्सिलोनासोबतच्या घट्ट नात्यामुळे मेस्सीने कोर्टात जाण्यापेक्षा या क्लबसोबत अतूट नाते जपण्याचा निर्णय घेतला. पण आता हे नाते तुटले आहे. मेस्सी अर्ध्या पगारावर क्लबसोबत थांबण्यास तयार असताना नात का टिकल नाही? हा प्रश्न अनेक फुटबॉल चाहत्यांना पडणे स्वाभाविक आहे.

हेही वाचा: खेळाडूंचा 'मानसिक खेळ'

दोघांत तिसरा अन् नात्यात दुरावा

क्लब आणि मेस्सी यांच्या नात्यातील रुसवा-फुगवा मिटला असला तरी नाते टिकण्यासाठी हे पुरेसे नव्हते. याला कारण होतं ते म्हणजे बार्सिलोना क्लब ज्या ला लिगामध्ये खेळतो त्यांची नियमावली. तांत्रिकदृष्ट्या नियमाचा दाखला देत ला लिगाने बार्सिलोना आणि मेस्सी यांच्यातील करारावर हस्ताक्षर करण्याला विरोध दर्शवला होता. जून पासूनच मेस्सी कोणत्याही अन्य क्लबसोबत करारबद्ध होण्यास स्वतंत्र झाला होता. कोरोनाचे संकट आणि क्लबची आर्थिक परिस्थिती ढासळल्यानंतर मॅनेजमेंटने अनेक खेळाडूंच्या सॅलरीसंदर्भात मोठे बदल केले. मेस्सीने अर्ध्या पगारावर क्लबसोबत राहण्याची इच्छाही दर्शवली पण तरीही त्याचे क्लबसोबतचे नाते तुटलेच.

क्लबवरील आर्थिक संकटाने गणितं बिघडली

क्लब जवळपास 1 बिलियन यूरो इतक्या मोठ्या कर्जात बुडालेला असताना जोसेफ मर्तोमेव यांनी बार्सिलोनाची साथ सोडली. आर्थिक घडी बसवण्यासाठी मॅनेजमेंटने खेळाडूंच्या सॅलरी कॅपमध्ये आवश्यक ते बदल केले. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, बार्सिलोना क्लबमधील 9 खेळाडूंचे वेतन हे आठवड्याला 200,000 यूरोच्या घरात आहे. महागड्या खेळाडूंपैकी ओस्मान डेम्बेले आणि सॅम्युअल यांनी मोजक्या मॅचेसमध्ये क्लबचे प्रतिनिधीत्व केल्याचे पाहायला मिळाले. खेळाडूंच्या वेतनामध्ये 50 टक्के कपात करुनही मेस्सीला संघात ठेवणे बार्सिलोनासाठी चॅलेंज होते. ला लीगाच्या वेतन मर्यादा ओलांडून मेस्सीला संघात ठेवणे क्लबला आणखी महागडे ठरले असते. त्यांच्यावर मोठ्या दंडाची कारवाई होऊ शकली असती.

हेही वाचा: बेदरकारपणा मांडणारा ‘पेल्ट्झमन परिणाम’

मेस्सी-बार्सिलोनाची स्टंटबाजी अन् ला लिगाच्या बदनामीचा कट?

बार्सिलोना क्लबला आर्थिक संकटात असल्याची जाणीव होती. मेम्फिस डेपे (लियोन) आणि सर्जिओ आणि एरिक गार्सिया (मँचेस्टर सिटी) यांनी क्लब सोडल्यानंतर मेस्सीचंही क्लब सोडण्याचे निश्चित होते. जगातील सर्वोत्तम खेळाडू क्लब सो़डल्याचा ठपका ला लिगा मॅनेजमेंटच्या नियमावलीवर लावायचा डाव स्टंटबाजीतून रचला गेला, असा तर्कही काही प्रसारमाध्यमातून लावण्यात आला आहे.

लिओनेल मेस्सी आणि बार्सिलोना क्लब यांनी दोघांच्यातील संमतीने नव्या कराराची तयारी करणे. त्यानंतर स्पॅनिश ला लिगा नियामांचा तांत्रिक अडथळ्यामुळे मेस्सीला बार्सिलोनासोबत राहता आले नाही. हे चित्र निर्माण करण्यात आले. मेस्सीने आधीच क्लबला अलविदा करण्याचे ठरवले होते, असा दावाही करण्यात येत आहे. याचे नेमकं उत्तर शोधणं कठीणच आहे. दोघांत तिसरा अन् सगळं विसरा असे म्हणतच आता मेस्सी ज्या नव्या क्लबकडून खेळतोय ते बघून आनंद मानावा लागेल.

go to top