
Micro Retirement
esakal
‘विभव’ (नाव बदलेले आहे), एक पंचविशीतला म्हणजेच ‘जेन झी’मधील उच्चशिक्षित तरुण! नामांकित मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी, सहा आकडी पगार! कोणालाही हेवा वाटेल असे आयुष्य! आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी तो माझ्याकडे आला, तेव्हा त्याच्या उद्दिष्टांमध्ये एक सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट होतं, ते म्हणजे या नोकरीतून ‘मायक्रो रिटायरमेंट’ घेण्याचं! ते ऐकून मला जरा नवलच वाटलं, करिअरची अशी चांगली सुरुवात असताना; निवृत्तीची भाषा, भले ती तात्पुरती आणि अगदी अल्पकाळासाठी का असेना, पण असा विचार ही पिढी कसा करू शकते, याबद्दल मलाच खूप कुतूहल निर्माण झालं.
ही ‘जेन झी’ दीर्घकाळ नोकरी आणि मग साठाव्या वर्षी निवृत्ती, या पारंपरिक चौकटीबाहेरचा ते विचार करतात. त्यांचा आयुष्याकडे आणि करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक लवचिक, धाडसी आणि अनुभवांना जास्त प्राधान्य देणारा झाला आहे.
बहुतेक वेळा अनेक तरुणांना ‘मायक्रो रिटायरमेंट’ घेऊन एक ते दोन वर्षांच्या काळात नवं काहीतरी शिकायचं असतं, प्रवास करायचा असतो, एखादी बिझनेस आयडिया पडताळून बघायची असते, कुठेतरी समाजोपयोगी काम करायचं असतं. मात्र, या काळात त्यांचे नियमित उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बिघडतो, त्यात काही काळासाठी व्यत्यय येतो; त्यातही कर्ज, किंवा अन्य आर्थिक जबाबदाऱ्या असतील तर त्याचाही विचार करावा लागतो. परंतु, योग्य आर्थिक नियोजनाद्वारे हे शक्य आहे.