

Mother's Struggle
esakal
किशोर बळी -sakal.avtaran@gmail.com
आई आज इथे तू नाहीस; पण तुझा मायेचा हात सतत फिरत राहतो पाठीवरून. तुझ्या पायावर मस्तक टेकवल्याने पावन झाल्यात माझ्या ललाटरेषा. आई, मी खूप मोठा होईन. आभाळ कवेत घेईन. तुला कधीच नाही विसरणार...
आजी सांगते की आजोबांनी तिला फारकत दिली तेव्हा आमची आई तिच्या पोटातच होती. आजीच्या वडिलांच्या नावे असलेली शेती आपल्या नावावर करून द्यावी, असा आजोबांचा आग्रह होता. त्या वादातून आजीचा घटस्फोट झाला होता. आजीची आई आजारी आणि वडील वारलेले होते अन् अशा परिस्थितीत तिच्यावर हा प्रसंग आला होता. एक स्त्री म्हणून या प्रसंगाला सामोरं जाणं, हे प्रचंड संघर्षाचं होतं.
घरात एकुलती एक असलेल्या आजीला मुलगी झाली आणि तिने नंतर लग्न न करता मुलीसाठी जगायचं ठरवलं. लेकीच्या प्रेमापोटी तिने आपल्या व्यक्तिगत जीवनाचा एक प्रकारे त्यागच केला होता. सुख, समाधान, आनंद या सगळ्या गोष्टींची फारकत घेऊन तिने खडतर मार्ग निवडला. आजीच्या एकूणच जीवनपटाचा विचार जेव्हा जेव्हा करतो तेव्हा अंगावर काटा येतो आणि त्या काळात अन् त्या पद्धतीच्या समाजव्यवस्थेत खंबीरपणे काळाच्या छाताडावर पाय देऊन उभी राहिलेली आजी मला इतिहासातल्या एखाद्या रणरागिणीसारखी वाटते. तिची गोष्ट एखाद्या कादंबरीसारखी वाटते.