

Mumbai Stone Age
esakal
मुंबई... कोट्यवधी भारतीयांची स्वप्ननगरी. देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख केंद्र. आर्थिक राजधानी आणि सतत धावती, अशी तिची ओळख. मात्र या झगमगत्या महानगराचा इतिहास केवळ काही शतकांचा नाही. पुरातत्त्वीय संशोधनातून समोर आलेली माहिती पाहिली तर मुंबईचा प्रवास थेट पाषाणयुगापर्यंत जातो. आज कल्पनाही करता येणार नाही अशा अतिप्राचीन काळातही मुंबईत मानवी वस्ती होती...
पुरातत्त्वीय उत्खननांमध्ये मुंबईत पाषाणयुगाच्या विविध कालखंडांतील दगडी हत्यारे मोठ्या प्रमाणावर सापडली आहेत. या हत्यारांमधून त्या काळातील मानवाचे जीवन, त्यांची उपजीविका आणि पर्यावरणाशी असलेले नाते उलगडते. मुंबईतील पाषाणयुगीन मानवाचा शोध घेण्यासाठी गेल्या सव्वाशे वर्षांहून अधिक काळ संशोधकांनी सातत्याने प्रयत्न केले. के. आर. यू. टॉड, एस. सी. मलिक आणि पुढे डॉ. सांकलिया यांसारख्या विद्वानांनी या दगडी अवजारांवर सखोल अभ्यास केला. त्यांच्या संशोधनामुळे मुंबईचा ज्ञात इतिहासच नव्याने मांडला गेला आणि मुंबईच्या इतिहासला कलाटणी मिळाली.