
Asiatic Society Mumbai
esakal
मुंबई मराठी साहित्य संघ, एशियाटिक सोसायटी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इत्यादी ऐतिहासिक संस्था सध्या कुठल्यातरी कारणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्या बळकावण्याचा एक सुनियोजित प्रयत्न सध्या सुरू आहे. दोन शतकांहून अधिक काळाचा इतिहास असलेली एशियाटिक सोसायटीही त्यांच्या निशाण्यावर आहे. ती वाचवण्यासाठी मुंबईकर आणि मराठी माणसाने जागरूक राहण्याची गरज आहे.
मुंबईत साहित्य, संस्कृती व संशोधन क्षेत्राशी निगडित अनेक प्रतिष्ठित संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये मराठी साहित्य संघ, एशियाटिक सोसायटी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इत्यादी ऐतिहासिक संस्थांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल; मात्र अलीकडे या संस्था कुठल्यातरी कारणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. नियोजनाचा अभाव, शासनाचे दुर्लक्ष व व्यवस्थापन मंडळाची निष्क्रियता यामुळे या संस्थांचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला आहे. याचा फायदा घेत या संस्था बळकावण्याचा एक सुनियोजित प्रयत्न आता होत आहे. ९० वर्षांचा इतिहास असलेल्या गिरगावमधील मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत हा प्रकार ठळकपणे समोर आला. आता दोन शतकांहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या एशियाटिक सोसायटीच्या बाबतीतही हे होताना दिसत आहे.