

Muslim Voting Trend India
esakal
हिंदी पट्ट्यात अनेक मुस्लिम मतदारांना असे वाटते की, प्रमुख भाजपविरोधी पक्षांना पाठिंबा दिल्यानंतरही ते भाजपचा उदय रोखण्यात अपयशी ठरले आहेत. परिणामी, जिथे कुठे एखादा नेता किंवा मुस्लिमांच्या हक्कावर बोलणारा पक्ष त्यांच्या अधिकारांसाठी निर्भयपणे बोलताना दिसतो, तिथे ते त्या पक्षाला पाठिंबा देतात. बिहारमधील निवडणुकीतही हेच दिसले. हा मतदार लालूप्रसाद यादव यांच्यापासून दूर गेला आणि त्याने ‘एमआयएम’च्या पारड्यात मते टाकली. मुस्लिम मतदानातील बदलत्या ‘ट्रेंड’चा घेतलेला आढावा...
देशात २०२४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मला अनेक जण संभाव्य निकालांविषयी विचारत होते. उत्तर प्रदेशात काय होईल, याबाबत मला काही जण विचारत होते. मी स्वतः जनमत संशोधन क्षेत्रात काम करीत असल्यामुळे आणि मी स्वतः उत्तर प्रदेशचा असल्यामुळे मला असे प्रश्न विचारले जात होते. उत्तर प्रदेश देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. उत्तर प्रदेशमधील नगिना लोकसभा मतदारसंघ विशेष चर्चेत होता. तिथे भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण उमेदवार होते. मी अनेकदा म्हणायचो की, ‘‘नगिना हा कदाचित उत्तर प्रदेशातील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे जिथे मुस्लिम मतदार समाजवादी पक्षाच्या मागे एकत्रितपणे येत नव्हते; राज्यातील इतर ठिकाणी ते ठामपणे अखिलेश यादव यांच्यासोबत होते.’’ मला परिचित असलेले राजकीय नेते, वरिष्ठ निवडणूक विश्लेषक आणि पत्रकार सातत्याने मला विचारायचे नगिना येथे मुस्लिम मतदार चंद्रशेखर आझाद यांच्याकडे का झुकत आहेत? मुस्लिम मतदारांशी बोललो आणि आझाद यांच्या प्रचंड संख्येने झालेल्या सभांना मी स्वतः उपस्थित राहिलो. आझाद हे धैर्याने निवडणूक लढणारे नेते आहेत, असे मतदारांना वाटत होते. ‘सीएए-एनआरसी’विरोधातील २०२० मधील आंदोलनादरम्यान झालेल्या त्यांच्या अटकेने ही धारणा अधिक दृढ केली. चंद्रशेखर आझाद निवडणूक जिंकले. ते नगिना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामध्ये ४५ ते ४७ टक्के मुस्लिम आणि २३ ते २५ टक्के दलित मतदार आहेत.