

Navi Pillay Nobel Peace Prize
esakal
प्रा. डॉ. अविनाश कोल्हे
वंशभेदाविरुद्धचा लढा, आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेची भक्कम उभारणी आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आयुष्यभर केलेले कार्य, असा नवी पिल्लई यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. जागतिक शांततेसाठी कायद्याचे अधिष्ठान महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल नोबेल पुरस्कारासाठी घेतल्याने आंतरराष्ट्रीय न्याय आणि मानवी हक्कांच्या लढ्याला नवे बळ मिळाले आहे.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जगभरातील नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. याच काळात विविध नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जाते. यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनेडियन साहित्यिक अॅन कार्सन (जन्म : १९५०) यांना; तर शांततेचा नोबेल पुरस्कार भारतीय वंशाच्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या नागरिक असलेल्या नवनीथम ‘नवी’ पिल्लई (जन्म : १९४१) यांना जाहीर झाला. भारतीय वंशाच्या व्यक्तीला हा मानाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहेच; पण मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेतली गेली, याचेही विशेष समाधान आहे. २००७ मध्ये पिल्लई वडिलांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी भारतात आल्या होत्या. तमिळनाडूमधील दिंडिगुल जिल्ह्यातील पझाया वथालकुंडू हे त्यांचे मूळ गाव. शांततेच्या नोबेल पुरस्कारामध्ये सुवर्णपदकासह सुमारे दहा कोटी रुपयांच्या रोख रकमेचा समावेश असतो.