Premium|Anti Slavery Movement : शोषणाला चेहरा नसतो, सीमाही नसतात...

Nepal Bonded Labour : लंडनमधील आंतरराष्ट्रीय गौरवानंतर नेपाळमध्ये वेठबिगार मुक्ती चळवळीचे अनुभव मांडताना भारत-नेपाळ सीमावर्ती तराई भागातील दारिद्र्य, मानवी हक्क आणि सामाजिक वास्तवाचा वेध घेण्यात आला.
Anti Slavery Movement

Anti Slavery Movement

esakal

Updated on

विवेक पंडित - pvivek2308@gmail.com

आम्हाला लंडनमध्ये गुलामीविरोधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने anti-slavery या संस्थेने लंडनमधल्या अन्य काही नागरी संस्थांसोबत आमच्या अनुभवांच्या देवाण-घेवाणीसाठी बैठक आयोजित केली होती. पुरस्कारानंतर या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं होतं. आम्हाला या क्षेत्रातलं कळतं, असा विश्वास यानिमित्ताने जगभरातल्या गुलामीविरोधी काम करणाऱ्या संस्थांमध्ये निर्माण झाला होता. ‘ॲक्शन एड’सारख्या काही संस्था ज्या जगभरातील ग्रामविकास, आदिवासी विकास, मानवी हक्क यासाठी कार्य करीत होत्या, त्या संस्थांचे प्रमुख आणि कार्यकर्ते यांची ती बैठक होती. या बैठकीत मी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष येऊन गुलामांना संघटित करण्यासाठी त्यांना मदत करावी तसेच तिथल्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण घ्यावं, असा मनोदय उपस्थित बहुतांशी संस्था-संघटनांनी व्यक्त केला. जवळपास गेली दहा वर्षं ठाणे जिल्ह्यात, मराठवाड्यात मी हे कार्य करीतच होतो. त्यामुळे मी त्यांना आनंदाने होकारही दिला.

‘ॲक्शन एड’ या संस्थेने मला नेपाळमध्ये काही संस्थांच्या प्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी येण्याबद्दल विनंती केली. पुरस्काराहून परत येताच महिनाभराच्या आतच मी काठमांडू येथे गेलो. नेपाळमध्ये जाण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. ‘ॲक्शन एड’ यांनी काठमांडूला दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेसाठी भारताच्या उत्तर सीमेला लागून असणाऱ्या तराई भागातील बर्दिया, बाके, कैलाली, कांचनपूर, डांग या जिल्ह्यांतील कार्यकर्ते आले होते.

दिल्ली बहादूर चौधरी हा आदिवासी तरुण गेली काही वर्षं ‘बेस’ या संस्थेच्या माध्यमातून तिथे काम करीत होता. १९९६मध्ये तो त्या भागातल्या वेठबिगारांच्या मुक्तीसाठी इतर अनेक संस्था-संघटनांसोबत कार्यरत होता. तो काम करीत असलेला नेपाळचा तराई भाग हा आपल्या कल्पनेतला नयनरम्य नेपाळ वाटतच नव्हता. आपल्या कल्पनेतला नेपाळ म्हणजे हिमालयाच्या कुशीत विसावलेला, उंचच उंच पर्वतरांगांचे शिखर असणारा, सौंदर्याची भरभरून देणगी लाभलेला असा पहाडी भाग. मात्र तराई भाग हा याच्या नेमका विसंगत. या भागात फिरताना आपण नेपाळमध्ये आहोत, याचा कुठेही लवलेश दिसत नव्हता. उलट आपण भारतातल्या दारिद्र्यात खितपत असलेल्या खेड्यांमध्येच फिरतो आहोत, असा भास होत होता. नेपाळ आणि भारत यातली सीमा ही बिहार, उत्तर प्रदेशपासून जवळपास सातशे किलोमीटरची. हा सीमा भाग पूर्ण मोकळा आहे. दोन देशांतली सीमा असूनही त्याचं काही विशेष वेगळं अस्तित्व तिथे दिसत नाही.

Anti Slavery Movement
Premium|Bonded Labour Act : वेठबिगारीच्या कायद्याची पहिली अंमलबजावणी; श्रमजीवी संघटनेचा ऐतिहासिक लढा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com