

New Tax Regime
esakal
महिना दीड लाख रुपये पगार कमवणारा अमोल ३२ वर्षांचा आहे. मित्रांच्या नजरेत तो ‘सेटल’ आहे. कारण अमोलकडे ‘एसयूव्ही’ गाडी आहे. हातात दीड लाखांचा आयफोन आहे. खिशात तीन-तीन क्रेडिट कार्ड आहेत. सोशल मीडियावर त्याचं आयुष्य परफेक्ट दिसतं; पण रात्री त्याला अनेकदा झोप येत नाही, सतत बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीमुळे नोकरीची पुढच्या १० ते १५ वर्षांची काहीच खात्री नाही. नोकरी गेली तर काय? आजारी पडलो तर काय? ईएमआय, कार्ड बिल आणि खर्चांची यादी डोळ्यासमोर फिरत राहते. अमोल मेहनती आहे, हुशार आहे, कमावतो आहे; पण तरीही तो आतून अस्वस्थ आहे. आणि ही गोष्ट फक्त अमोलची नाही. हे आजच्या युवा मध्यमवर्गाचं ‘नवं वास्तव’ आहे. बाहेरून संपन्न दिसणारी, आतून मात्र सतत तणावात जगणारी पिढी.
प्रत्येक पिढी आपल्या पुढच्या पिढीकडे बघून नाक मुरडत म्हणते, ‘‘आमच्या काळात सगळं कसं मापात शिस्तबद्ध होतं.’’ सहसा ही वाढत्या वयाची कुरकुर म्हणून आपण दुर्लक्ष करतो; पण आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले, तर आजच्या तरुण पिढीबद्दल जुन्या पिढीचे हे मत शंभर टक्के खरे आहे. पैसे खर्च आणि बचत करण्याच्या दृष्टिकोनात आज एक भयानक बदल झाला आहे. आजच तुम्ही वेळीच सावध झाला नाही, तर उज्ज्वल भविष्य केवळ एक मृगजळ ठरेल. लक्षात ठेवा, ‘लिक्विडिटी’ म्हणजे सुरक्षितता नव्हे!