

Stock Market India
esakal
गेल्या सप्ताहात गुरुवारअखेरपर्यंत (ता. २० नोव्हेंबर) सारे कसे छान छान चालले होते. अगदी दलाल स्ट्रीटच्या पानवाल्यालादेखील माहीत होते, की निफ्टीने २६१००ची पातळी ओलांडली की मग काय मज्जाच मजा. आजकाल लहानसहान पंटर्सनादेखील निर्देशांकांच्या सर्व आधार व प्रतिरोध पातळ्या माहीत असतात. तेच तज्ज्ञांना शिकवतात, आता बाजार कसा वाढतो किंवा खाली कुठे थांबेल ते बघा वगैरे वगैरे! नेमकी गुरुवारी रात्री माशी शिंकली. अमेरिकेचा बेरोजगारीचा अहवाल काही समाधानकारक आला नाही, म्हणजे खरेतर चांगला आला. म्हणजे मुलगा नापास व्हावा असे वाटत असताना त्याने चक्क पास होऊन दाखवावे याचा तिकडे राग येतो. खरेतर हा डेटा सप्टेंबर महिन्याचा आहे. पुढे ४१ दिवस सरकारी कामकाज ठप्प झाले होते, म्हणजे डिसेंबरच्या बैठकीआधी नवा अहवाल तयार होणार नाही. त्यात रोजगारनिर्मिती वाढली, म्हणजे आता डिसेंबरच्या बैठकीत व्याजदर कमी होणार नाहीत असे तेथील बाजाराने गृहीत धरले. त्याबरोबर पडझड सुरू झाली, लागलीच डॉलर सुधारला, डॉलेक्स सुधारला आणि रुपयाने शरणागती पत्करली.