

Nobel Prize Research
esakal
डॉ. दिलीप निकम - sakal.avtaran@gmail.com
नोबेल दर्जाच्या संशोधनासाठी सातत्य ही अत्यंत महत्त्वाची बाब असते आणि ते ‘पायथा ते माथा’ या तत्त्वानुसार घडते. त्याची सुरुवात शालेय शिक्षणापासून होते आणि पुढे विद्यापीठीय शिक्षणात त्याचे रूपांतर होते. कुतूहल, नावीन्याचा ध्यास, चिकाटी आणि जोखीम स्वीकारण्याची तयारी, हे गुण विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच विकसित व्हावे लागतात. नोबेल जिंकणारे वैज्ञानिक एका दिवसात तयार होत नाहीत.
दरवर्षी शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर झाले की आपण काही दिवस त्यावर चर्चा करत राहतो. भारतीयांना नोबेल पुरस्कार का मिळत नाहीत, आपल्या विद्यापीठांमध्ये आणि शालेय शिक्षणव्यवस्थेत नावीन्यपूर्ण (इनोव्हेशन) आणि नवनिर्मितीक्षम (इन्व्हेन्शन) विचारांना पुरेसा वाव का मिळत नाही, यावर चर्चा होते. चार दिवसांनी आपण हे सगळे विसरून जातो आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच चर्चा सुरू होतात.
खरे तर, नावीन्यपूर्ण हा आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग झाला आहे. नवीन गोष्टींची निर्मिती अनेक क्षेत्रांत सातत्याने होत असते. मात्र, नोबेल पुरस्कार केवळ इनोव्हेशन किंवा इन्व्हेन्शनसाठी दिला जात नाही, तर तो प्रामुख्याने डिस्कव्हरी म्हणजेच नवीन वैज्ञानिक सत्याचा किंवा घटनेचा शोध आणि त्यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिला जातो. जगाला माहीत नसलेल्या गोष्टींचा उलगडा करून त्या पहिल्यांदा जगासमोर आणणाऱ्या संशोधकांना हा पुरस्कार मिळू शकतो. मात्र, असा शोध एका रात्रीत केलेल्या प्रयत्नांतून लागत नाही.
डिस्कव्हरीची पहिली पायरी म्हणजे संशोधन (रिसर्च). अनेक वर्षे केवळ कुतूहलापोटी किंवा काहीतरी नवीन जाणून घेण्याच्या आणि करण्याच्या उर्मीपोटी संशोधन सुरू असते. जेव्हा एखाद्या प्रश्नाभोवती किंवा विषयाभोवती अविरतपणे संशोधन होत राहते, तेव्हा त्यातून एखादा महत्त्वपूर्ण शोध लागतो. प्रत्येक शोधाचा मानवाला तत्काळ उपयोग होईलच, असे नाही; मात्र त्याचे महत्त्व भविष्यात लक्षात येऊ शकते.
याच वर्षीच्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे उदाहरण घ्या. न्यूट्रिनोंशी संबंधित संशोधनाचा विचार केला, तर त्याचा आजच्या घडीला थेट व्यावहारिक उपयोग मर्यादित असू शकतो. मात्र, लाखो वर्षांपूर्वी विश्वात घडलेल्या एखाद्या घटनेचा उलगडा आपण आज करू शकत असू आणि त्या ज्ञानाच्या आधारे विश्वाचे स्वरूप, त्याचा इतिहास किंवा भवितव्य समजून घेण्याचा प्रयत्न करत असू, तर अशा संशोधनाचे महत्त्व निश्चितच मोठे आहे.