

Famous Indian Painters and Animation Experts
esakal
प्रसिद्ध चित्रकार विजय राऊत यांनी अमरावतीला स्थापन केलेल्या ॲनिमेशन कॉलेजने आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडविले आहेत. ॲनिमेशन अभ्यासक्रमाला त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. आपल्या विद्यार्थ्याला ते एकच प्रश्न विचारतात, ‘तुला ॲनिमेशन ही कला एकाग्रतेने तल्लीन होऊन शिकायची आहे का?’ त्याने ‘हो’ म्हटले की प्रवेश नक्की. म्हणूनच आज राऊत यांच्या काॅलेजला जीवन जगण्याची कला शिकवणारे ‘ॲनिमेशन गुरुकुल’ म्हटले जाते.
महाराष्ट्रातील ‘शब्द परिवार’ दरवर्षी वेगवेगळ्या देशांत शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित करीत असतो. महाराष्ट्रातील लेखक, कवी, विचारवंत, पत्रकार व कलावंतांना त्यासाठी आमंत्रित केले जाते. २०२४ मध्ये असेच मॉरिशसमध्ये शब्द परिवार आयोजित नववे शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. त्याचे उद्घाटक होते, महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रकार आणि दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे माजी अध्यक्ष विजय राऊत... एका चित्रकाराला शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून मान का दिला गेला? तर त्याचे उत्तर त्या संमेलनातील राऊत यांच्यावर असलेल्या माहितीपटामधून व त्यांनी दिलेल्या भाषणांमधून मिळाले... ॲनिमेशनबाबतचे समज-गैरसमज, भारतीय जागतिक ॲनिमेशन क्षेत्रात अजूनही कसे मागे आहोत, या क्षेत्रातील प्रगतीसाठी नेमके काय करायला हवे, मीडिया शिक्षणाच्या बाबतीत सरकारने नेमकी काय भूमिका घ्यावी याविषयी त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले. आपल्या भाषणाद्वारे त्यांनी त्यांच्या अमरावतीमध्ये असलेल्या ॲनिमेशन कॉलेजविषयीही माहिती दिली.