सरस्वतीच्या दारी अखेर "लक्ष्मी दर्शन"! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरस्वतीच्या दारी अखेर "लक्ष्मी दर्शन"!}

आरोग्य विभागाच्या परीक्षेची जबाबदारी सोपविलेल्या "न्यासा"या संस्थेच्या टुकार, बेफिकीर कामामुळे आरोग्य विभागाची परीक्षा राज्यभर चर्चेत आली

सरस्वतीच्या दारी अखेर "लक्ष्मी दर्शन"!

काही दिवसांपूर्वीच मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) मागील वर्षभरात केलेल्या कारवाईबाबत बातमी दिली होती. त्यामध्ये एरवी महसूल व पोलिस विभागात "लाच घेण्यात कोणाचा पहिला नंबर" अशा पद्धतीने लाच स्विकारण्यातही कशी जोरदार चुरस सुरु असते यावर लिहिले होते. तेव्हा,एक वेगळा निष्कर्ष मी काढला होता. म्हणजे तशी आकडे बोलत होते. यावेळी नेहमीप्रमाणे महसूल विभागाने (Revenue Department) पहिला नंबर राखण्यात "यश"मिळवले, मात्र दुसऱ्या क्रमांकावर नेहमी टिकेचे धनी असणारे पोलिस (Police) नव्हते, तर तिसरीच व्यवस्था होती. हा दूसरा क्रमांक पटकाविला होता, शिक्षण (Education)विभागाने! हो तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे होते. आता तर तुकाराम सुपे, सुखदेव डेरे यांनी आपल्या कर्तबगारीने त्यावर शिक्कामोर्तब ही केले.

हेही वाचा: गृहकर्ज फेडावे, की गुंतवणूक करावी?

खर तर, आरोग्य विभागाच्या (Health Department) परीक्षेची जबाबदारी सोपविलेल्या "न्यासा"या संस्थेच्या टुकार, बेफिकीर कामामुळे आरोग्य विभागाची परीक्षा राज्यभर चर्चेत आली. त्यानंतर कशीबशी परीक्षा (Exam) झाली, त्यामुळे "न्यासा"वाल्यानी सूटकेचा नि:श्वास टाकला असेल, पण खेळाला खरी सुरुवात तर परीक्षा संपल्यानंतर होणार होती. आरोग्य विभागाच्या "ड" गटाची परीक्षा झाली, त्या दिवशी एक-दोन मुले या परिक्षेचा पेपर फुटला होता, म्हणून घसा फाडून सगळ्या जगाला सांगत होती, पण कोणीही "मायका लाल"ने त्यांचे ऐकून घेतले नाही. ही मुले फरासखाना, विश्रामबाग पोलिस ठाण्यात गेली होती, आपली तक्रार घ्या म्हणून, तिथेही त्यांच्या वात्याला निराशाच आली. हा प्रकार पत्रकार म्हणून माझ्या सहकाऱ्यांच्या व माझ्या कानावर आला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला आणि पुढे काही वेळातच शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्यांची तक्रार घेण्यात आली. पण इथेही खरी गेम होती, इतकी मोठी घटना घडली होती, तर त्याचे गांभीर्य ओळखून संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी तत्काळ पावले उचलून, स्वत: पोलिसांकडे जायला पाहिजे होते, पण तसे घडले नाही. मुलांच्या तक्रारीमध्ये "दम"असल्याने त्यांना सायबर पोलिसांकडे जाण्याचा सल्ला मिळाला. तिथे त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यानंतर अगोदर "असे काही घडलेच नाही" या अहंमपणात गुरफटलेल्या आणि उशीराने जागे झालेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली.

हेही वाचा: अंटार्क्टिकाचे भवितव्य

पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने प्रकारणाचे गांभीर्य ओळखले, प्रकरण किती खोल आणि किती "वर"पर्यंत जाऊ शकते याचा अंदाज घेतला. सुरुवातीला 2-4 एजंटला बेड्या ठोकल्यानंतर लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी बड़गिरे आणि त्यापाठोपाठ आरोग्य विभागाचा सहसंचालका बोटलेलाही अटक केली. याचा सखोल तपास करतानाच अटक केलेल्या दोघांनी म्हाडाच्या पेपरफूटीची आगाउ माहिती दिली आणि जी.ए. टेक्नोलॉजीचा डॉ. प्रीतिश देशमुख, हरकळ बंधु अटक झाले.

इथपर्यंत सगळे ठीक होते, कारण आत्तापर्यंत फक्त "परीक्षा" आणि "पेपरफटी"ही आरोग्य, म्हाडा भोवती फिरत होती. या प्रकरणाकडे पाहून ही साखळी थेट सरस्वतीचे आद्य सेवक "शिक्षक"या घटकापर्यंत पोचेल, याचा अंदाज कोणालाही आला नसेल, तसेच तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा विद्यमान आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाच्या आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही आला नसेल. पण पोलिसांना हा अंदाज डॉ. देशमुखला अटक केल्यानंतर आला.

हेही वाचा: आरोग्यदायी बदाम खा अन् सुदृढ रहा!

मुळात, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अटकसत्राने अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडणार हे पोलिसांना त्यांच्या प्राथमिक तपासातच उघड झाले होते. त्यानंतर पोलिसांनी सुपेला चौकशीच्या निमित्ताने बोलावून अधिकार पदाचा माज उतरविल्यानंतर सरस्वतीच्या सेवकांचे एक-एक प्रताप होऊ लागले. पहिल्या दिवशी1 कोटी, दुसऱ्या दिवशी पावणे दोन कोटी असे करीत 2-4 कोटीचा मुद्देमाल सापडला. त्यामुळे हा सुपे खरच सरस्वतीचा सेवक होता, की "लक्ष्मी"चा असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नव्हता.

सुपेच्या घरचे "लक्ष्मी दर्शन"थांबण्याची काही चिन्हे नव्हती आणि अजूनही नाही. तर दुसरीकडे मोठ्या साहजोगपणाचा आव आणून "सुपे कसा भ्रष्टाचारी आहे, कसे पैसे खात होता, "पेपर सेटिंग"कशी करीत होता," माध्यमांच्या प्रतिनिधीशी "गावगप्पा" मारणाऱ्या सुखदेव डेरेही पोलिसांच्या रडारवर आला आणि अडकलाही. या विभागातील आणि गैरप्रकार करणारे, ज्ञानदानाचे पवित्र काम ज्या हातानी करायचे, तेच भ्रष्टचाराने बरबटलेले हाताना अजुन बेड्या पडणार आहेत.

खरतर शिक्षण विभागातील हे "भीष्माचार्य", त्यांच्या हातात परीक्षासारखे महत्वाचे शस्त्र देऊन त्याद्वारे पुढच्या कित्येक पिढ्याचे भवितव्य घ'बि'डणार होते. शिक्षण विभागासारख्या पवित्र क्षेत्रात असल्याने समाजाने, सरकारने यांना मान-सन्मान, प्रतिष्ठा, आर्थिक मजबूती दिली, त्यांनी मात्र सरस्वतीच्या दारात विद्येपेक्षा "लक्ष्मी दर्शना"ला अधिक झुकते माप दिले. भ्रष्ट कारभाराचा हा डोलारा इतका झुकला, की अक्षरश: सगळ्याचे पितळ उघडे पडत गेले. सरस्वती सेवकांच्या या गैरकृत्यामुळे प्रामाणिकपणे, काबाडकष्ट करुन परीक्षा देणाऱ्या एका पिढीचा फक्त विश्वासघातच झाला नाही, तर शिक्षण या व्यवस्थेवरचा अक्षरशः विश्वास उडून गेला. सुपे, डेरे, सावरीकर, देशमुख यांच्यासारख्या 5-10 कुटुंबाना नोटांच्या बिछान्यावर सुखाची झोप लागेलही, पण थेट सरस्वतीच्या मंदिरात "लक्ष्मी दर्शन"घडवून तरुण पिढीची तरी झोप त्यांनी उडवली हे नक्की.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top