
Politics in Indian cricket
esakal
खरं बोलणाऱ्याचं आयुष्य सोपं असतं. त्याला कधी कुठले बुरखे, मुखवटे किंवा सोंगं ओढून आणावी लागत नाहीत. सुखी असतो असा माणूस. केव्हाही अन् कुणासमोरही स्वच्छ, निर्मळ तोंडभरून हसू शकतो; पण खोटं बोलणाऱ्याचं तसं नसतं. आपण केव्हा, कुठे, कधी, कुणाशी, काय खोटं बोललो आहोत हे त्यांना सतत लक्षात ठेवावं लागतं. त्यात भर म्हणा, संदर्भसुद्धा ध्यानात ठेवावा लागतो. सतत चिंता सतावते!
देशाचं राजकीय नेतृत्व वेळोवेळी, विशेषतः आशियाई कप स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर ठणाणा बोंब मारून हेच सांगतंय. बरं, राजपक्ष आणि विरोधी पक्षाने राजकारणाचे खेळ करावे त्यात फारसं काही नवीन नाही; पण खेळात राजकारण? तसं पाहता हेसुद्धा आपल्या अंगवळणीच पडलंय. मात्र त्यात भाबड्या खेळाडूंचा वापर करून घेण्याबद्दल मला आक्षेप आहे. मी खेळाडूंना भाबडं म्हणतो, कारण बहुसंख्य खेळाडू सरळ मनाचे असतात.
समोर आलेली परिस्थिती स्वीकारून त्यावर मात करून किंवा त्यावर उपाय काढून पुढे जाण्यावर त्यांचा अधिक भर असतो. महत्त्वाचं, फक्त तोंडाची वाफ दवडून खेळाडूंना मैदान फत्ते करता येत नाही. त्यासाठी अनेकविध दडपणांचं ओझं प्रत्यक्ष सहन करून ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ चालीनुसार मैदानावर कामगिरी करावी लागते! तिथे जुमलेबाजी चालत नाही.