

Prahar Sanghatana Protest
esakal
‘प्रहार’ संघटनेचं नाव घराघरात पोहोचलं होतं. त्याहून महत्त्वाचं ‘प्रहार’चे कार्यकर्ते आक्रमक, जिद्दी आणि नियोजक म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाऊ लागले. त्या काळात सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी पूर्णपणे कर्जात बुडत होता. कार्यालयांमध्ये त्याच्या दु:खाच्या फाइलवर धूळ बसलेली आणि हाच अन्याय आम्हाला सहन होत नव्हता.
हार’ संघटनेची स्थापना ही आमच्या आयुष्यातील साधी घटना नव्हती. ती होती एक ठिणगी, एक धग, एक जाज्वल्य निर्धार... पहिली शाखा आम्ही गांधी पुलावर स्थापन केली. त्या दिवशी सूर्य जणू नव्या संघर्षाचा साक्षीदार असावा, अशी एक वेगळीच ऊर्जा वातावरणात जाणवत होती. मोठं पोस्टर नव्हतं, ढोल-ताशे नव्हते... पण अकराशे पिशव्या रक्त संकलन करून गो. रा. खैरनार व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची रक्ततुला करून केलेलं रक्तदान हा एक ऐतिहासिक क्षण ठरला. रक्तदानासारख्या पवित्र कार्याने शाखेची सुरुवात, हेच ‘प्रहार’च्या सेवेचं मूल्य. शाखा उद्घाटनाच्या दिवशी लावलेलं पिंपळाचं आणि लिंबाचं झाड आजही डौलात उभं राहून त्या दिवसाचा इतिहास सांगत आहे. ‘प्रहार’ हे नाव उच्चारलं, की अंगात एक अनाकलनीय शक्ती निर्माण होते. या नावात आक्रमकता आहे; पण तिला दिशा देणारी होती सेवा आणि न्यायाची तळमळ.