‘गुंतवणुकीतील काही कळत नाही....आता पुरे हा बहाणा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गुंतवणुकीतील काही कळत नाही....आता पुरे हा बहाणा!}
‘गुंतवणुकीतील काही कळत नाही....आता पुरे हा बहाणा!

‘गुंतवणुकीतील काही कळत नाही....आता पुरे हा बहाणा!

‘गुंतवणूक करायला हवी’ यावर सगळ्यांचे तात्त्विक एकमत असले, तरी अनेक जण ती टाळताना दिसतात. ‘गुंतवणुकीतील काही कळत नाही’, ‘पैसे अडकवून ठेवायचे नाहीत,’ ‘जोखीम घ्यायची नाही’ असे काही तरी बहाणे करून गुंतवणुकीबाबतची कृती टाळली जाते. असे बहाणे कोणते आणि ते किती पोकळ असतात आणि त्या संदर्भातील विचारांची दिशा कशी बदलली पाहिजे याबाबत मंथन.


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आम्ही काही लोकांशी गुंतवणूक या विषयावर संवाद साधला. या लोकांपैकी ‘नियमितपणे आर्थिक गुंतवणूक करायला हवी’ या मताशी सर्वचजण सहमत झाले. वाढती महागाई, नोकरी-व्यवसायातील अस्थिरता, निवृत्तीनंतर होणारी आर्थिक ओढाताण, वाढते औषधोपचार खर्च या आर्थिक संकटांमुळे प्रत्येक व्यक्तीने गुंतवणुकीला प्राधान्य दिले पाहिजे असे सर्वांचेच म्हणणे होते. मात्र, ‘आपण नियमितपणे आर्थिक गुंतवणूक करता का?’ या प्रश्नावर मात्र अनेकजणांचे नकारार्थी उत्तर होते. त्यामागील कारणे जाणून घेतल्यावर असे लक्षात आले, की त्यातील बहुसंख्य कारणे ही आर्थिक स्वरूपाची नसून मानसिक स्वरूपाची आहेत. खरे तर गुंतवणूक सुरू न करण्याचे हे बहाणे आहेत. यातील काही प्रातिनिधिक बहाणे पुढे दिले आहेत. या व्यक्तींप्रमाणेच आपणही असे काही बहाणे देत नाही ना हे तपासून पाहा.

हेही वाचा: पैसे छापून देणारे यंत्र मिळाले तर...?

‘गुंतवणुकीतील काही कळत नाही’


इंजिनियर असलेली सायली एका सॉफ्टवेअर कंपनीत गेली दोन वर्षे नोकरी करत आहे. नोकरी सुरू करून दोन वर्षे झाली; मात्र तिने अजूनही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुरू केली नाही. ‘गुंतवणूक हा कॉमर्स साईडचा विषय आहे, त्यामुळे मला त्यातले काही कळत नाही,’ असे तिचे म्हणणे आहे. सायलीने लक्षात घेतले पाहिजे, की ‘गुंतवणूक’ केवळ अभ्यासातील विषय नसून ते एक साधेसोपे शास्त्र आहे आणि ते प्रत्येक व्यक्तीला आत्मसात करावेच लागते. कारण आपल्या स्वतःच्या पैशांचे नियोजन आपल्यापेक्षा चांगले दुसरा कोणीही करू शकत नाही. इच्छाशक्ती असणारी कोणतीही व्यक्ती गुंतवणूक सल्लागार आणि इंटरनेटच्या माध्यमातून गुंतवणुकीची प्राथमिक माहिती घेऊन गुंतवणूक सुरू करू शकते. या बाबतीत एक गुंतवणूकतज्ज्ञ म्हणतात, की ‘ज्या व्यक्तीला एक ते दहा हे आकडे कळतात, त्याला गुंतवणूक कळू शकते.’ त्यामुळे ‘मला गुंतवणुकीतील काही कळत नाही,’ हा बहाणा करून आपण आपलेच नुकसान करत आहोत हे लक्षात घेऊन सायलीने गुंतवणुकीस शक्य तितक्या लवकर सुरुवात करणे उत्तम!

‘पैसे कोठेही अडकवून ठेवायचे नाहीत’


सोहमचा स्वतःचा छोटा व्यवसाय आहे. त्यासाठी त्याने बँकेत चालू खाते (करंट अकौंट) सुरू केले आहे. याच खात्यावर तो सर्व पैसे साठवून ठेवतो. अडचणीच्या वेळेस असे पैसे चटकन उपयोगी पडतात, असे त्याचे म्हणणे आहे. मात्र, असे करताना चालू खात्यावरील रकमेवर व्याज मिळत नाही हे सोहम विसरत आहे. आजकाल अनेक बँका ‘फ्लेक्झी डिपॉझिट स्कीम’ ही सुविधा देतात ज्यामध्ये ग्राहकाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम खात्यावर जमा झाली, की आपोआप मुदत ठेवीत गुंतवली जाते आणि ग्राहकाला हव्या त्यावेळी मुदत ठेवीत रक्कम वापरतादेखील येते. याशिवाय बँकेतील रिकरिंग डिपॉझिट स्कीम, पोस्टातील मासिक गुंतवणूक योजना यांसारख्या योजनांमध्ये आपल्याला शक्य असेल तेवढी रक्कम आपण दर महिन्याला गुंतवू शकतो आणि ज्यावर खात्रीशीर परतावा मिळवू शकतो. शेअर बाजारातदेखील ठराविक रक्कम मुद्दल म्हणून गुंतवून त्यावर मिळणारा फायदा आपल्या आवश्यकतेप्रमाणे काढून घेता येतो आणि काही कालावधीनंतर आपले मुद्दल आपल्याला परत मिळाले, की आपला आत्मविश्वास वाढून आपण अधिक जोमाने त्या गुंतवणुकीविषयी निर्णय घेऊ शकतो.
उदाहरणार्थ, आपण शेअर बाजारात दोन लाख रुपये भांडवल म्हणून गुंतवले आहेत आणि या गुंतवणुकीवर होणारा फायदा आपण बाजारातून काढून घेत आहोत; मात्र मुद्दल बाजारात गुंतवून ठेवत आहोत असे समजूयात. काही कालावधीनंतर बाजारातून काढून घेतलेला नफा दोन लाख रुपये झाला, की आपली मुद्दल बाजारातून आपल्याला परत मिळाली याचे समाधान वाटते. त्यानंतर बाजारातील उर्वरित रकमेवर आपण थोडा अधिक धाडसाने निर्णय घेऊ शकतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धती वापरून आपण गुंतवणूक आणि पैशांची उपलब्धता याचा मेळ घालू शकतो. त्यामुळे ‘मला कुठेही पैसे अडकवून ठेवायचे नाहीत,’ असा हट्ट धरून आपण स्वतःचेच नुकसान करून घेत आहोत, हे सोहमने लक्षात घेतले पाहिजे.

हेही वाचा: आपली आर्थिक सुरक्षा आपल्याच हाती!

‘कोणतीही जोखीम घ्यायची नाही’


अथर्वला शेअर बाजाराचे खूप आकर्षण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करण्याचा त्याचा अनेक वर्षांपासून विचार चालू आहे. मात्र शेअर बाजारात कोणतीही जोखीम न घेता त्याला गुंतवणूक करायची आहे. त्याला त्याच्या मित्राने म्युच्युअल फंडाचा पर्याय सुचविला; पण त्या गुंतवणुकीतही जोखीम असते, असे अथर्वने कुठेतरी वाचले आहे. अथर्वचे म्हणणे एका अर्थी बरोबर आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीत जोखीम असतेच. खरे तर केवळ शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडच नाही, तर प्रत्येकच गुंतवणुकीत काही ना काही जोखीम असतेच. तसेच शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतील जोखीम दीर्घकाळात खूप कमी होते, हे आत्तापर्यंतची आकडेवारी दाखवते त्यामुळे नियमितपणे गुंतवणूक करत राहिल्यास त्यातील धोका जवळजवळ नाहीसा होतो. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली गंगाजळी शिल्लक, वर्षानुवर्षे साठलेला नफा, कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही, उत्पादनाची मोठी साखळी अशी वैशिष्ट्ये असलेल्या कंपन्या अभ्यासातून शोधून काढता येतात. या कंपन्यांच्या शेअर्समधील गुंतवणुकीत खूपच कमी जोखीम असते. त्यामुळे ‘मी अजिबात जोखीम घेणार नाही,’ असे म्हणणारी व्यक्ती कोणतीच गुंतवणूक करू शकणार नाही आणि अजिबात गुंतवणूक न करणे हीच सर्वांत मोठी जोखीम असते, हे अथर्वने समजून घेतले पाहिजे.

हेही वाचा: आपली आर्थिक सुरक्षा आपल्याच हाती!

‘गुंतवणुकीसाठी पैसे शिल्लक राहत नाहीत’

रमेशप्रमाणेच गुंतवणुकीसाठी पैसे शिल्लक राहत नाहीत, ही अनेकांची समस्या असते. आजच्या महागाईच्या काळात ही परिस्थिती ओढवली असली, तरी यातून मार्गही आपल्या स्वतःलाच काढायचा आहे, हे विसरून चालणार नाही. यावर पहिला पर्याय म्हणजे खर्च कमी करणे. हे शक्य नसल्यास दुसरा पर्याय म्हणजे उत्पन्न वाढवणे. हेदेखील शक्य नसल्यास आपल्या उत्पन्नातून गुंतवणुकीची रक्कम बाजूला काढून उरलेल्या रकमेत तातडीचे आणि अत्यावश्यक खर्च भागवणे आणि इतर खर्च पुढे ढकलणे हा पर्याय काढता येतो. भविष्यात आर्थिक आरिष्ट्य टाळायचे असेल, तर तीनपैकी एखादा पर्याय आपल्याला निवडावाच लागेल. मौजमजेवर केलेला खर्च हा क्षणिक आनंद देतो, तर गुंतवणुकीत ठेवलेले पैसे हे आयुष्यभर आनंद देतात हे लक्षात ठेवून निनादने अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे आणि गुंतवणुकीस हळहळू सुरुवात करावी.

‘विचार करण्यासाठी अजून वेळ हवा आहे’

गेल्या वर्षी पंकजने नोकरी सुरू केली. वर्षभरात मिळालेला सर्व पगार त्याने मौजमजेवर खर्च केला. आता त्याने हळूहळू गुंतवणुकीचा विचार सुरू करून त्याची अंमलबजावणी करावी, असे त्याच्या पालकांचे मत आहे. मात्र, पकंजच्या मते गुंतवणूक हा निवृत्तीजवळ आलेल्या लोकांनी विचार करायचा विषय आहे. तरुण वयात मौजमजा करून घ्यावी, बचत आणि गुंतवणुकीसाठी संपूर्ण आयुष्य पडलेले आहे, असे त्याचे पक्के मत आहे. खरे तर आयुष्यात जितक्या लवकर आपण गुंतवणूक सुरू करतो, तेवढे अधिक त्याचे फायदे आपल्याला मिळतात हे पंकजने लक्षात ठेवले पाहिजे.


एका सोप्या उदाहरणाने हे सहज लक्षात येईल. रमेशने नोकरीच्या पहिल्या महिन्यापासून म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये दरमहा पाच हजार रुपये गुंतवणूक सुरू केली. ती गुंतवणूक त्याने निवृत्तीपर्यंत म्हणजेच पुढील तीस वर्षे सुरू ठेवली. याउलट त्याचा मित्र सुरेशने नोकरी लागल्यानंतर दहा वर्षानंतर दरमहा तेवढ्याच रकमेची म्हणजे पाच हजार रुपयांची त्याच म्युच्युअल फंडात एसआयपी सुरू केली. त्यामुळे निवृत्तीपर्यंत त्याला वीस वर्षे गुंतवणूक करता आली. सुरेशने गुंतवलेल्या एकूण बारा लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य निवृत्तीच्यावेळी सुमारे पंचाहत्तर लाख एवढे झाले, तर रमेशने गुंतवलेल्या एकूण अठरा लाख रुपयांचे मूल्य निवृत्तीच्या वेळी तब्ब्ल साडेतीन कोटी रुपये झाले. या उदाहरणात वार्षिक परतावा १५ टक्के गृहीत धरला आहे. या दोघांच्या गुंतवणुकीत फक्त सहा लाख रुपयांचा फरक आहे; मात्र निवृत्तीच्या वेळी मिळालेल्या रकमेत मात्र सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा फरक आहे. यामागील एकमेव कारण म्हणजे रमेशने आयुष्यात लवकर गुंतवणूक सुरू केली, तर सुरेशने गुंतवणूक उशिरा सुरू केली. या एका उदाहरणाने आयुष्यात गुंतवणूक लवकर सुरू करण्याचे महत्त्व रमेशच्या लक्षात येईल.
लेखात उल्लेख केलेले बहाणे हे प्रातिनिधीक स्वरूपाचे आहेत. याशिवाय गुंतवणूक टाळण्यासाठी लोक इतर अनेक बहाणे देत असतात. मात्र, तसे करून ते स्वतःचेच नुकसान करून घेत असतात हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top