Life Balance श्रीमंत होऊ आणि समृद्धही
Life Balance श्रीमंत होऊ आणि समृद्धहीEsakal

Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध

‘यशस्वी’ होणं म्हणजे ‘श्रीमंत’ असणं, अशीच बऱ्याच जणांची व्याख्या असते आणि त्यातूनच आपण कळत-नकळत ‘श्रीमंत’ होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत राहतो. पण हे पुरेसे आहे का? की आणखी काही बाबतीत समृद्धी आवश्यक आहे?

आनंद पोफळे
anand.pophale@gmail.com

आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात सर्व काही गतिमान होत आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे, तर आयुष्याच्या ‘टेस्ट’ची ‘वन-डे’ मॅच झाली आणि आता त्याचा वेग ‘टी-२०’सारखा झालाय. प्रत्येक जण या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी धावतोय; पण यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय याचा खरा अर्थ आपल्याला नक्की समजलाय का? हा कळीचा मुद्दा आहे. Know the difference between richness and Happy Balance life

‘यशस्वी’ होणं म्हणजे ‘श्रीमंत’ Rich असणं, अशीच बऱ्याच जणांची व्याख्या असते आणि त्यातूनच आपण कळत-नकळत ‘श्रीमंत’ होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत राहतो.

लौकिकार्थाने यात काही चुकीचे नाही; पण याचा खोलवर विचार केला, तर केवळ ‘श्रीमंत’ व्हायचे, की ‘समृद्ध’ व्हायचे हा मूलभूत प्रश्न पडतो.श्रीमंत झालो की आपण सुखी होऊ, हवी ती गोष्ट आपल्याला विकत घेता येईल, असा समज बहुतेक सर्वांचाच असतो. त्यामुळे प्रत्येकजण सुखी म्हणजे पर्यायाने श्रीमंत होण्यासाठी आटापिटा करत असतो.

या धावपळीत कित्येक आनंदाचे क्षण गमावले जातात, सुखाच्या मागे धावता धावता दमछाक होऊन जाते आणि ते सुख काही हाती गवसत नाही. या सुखाच्या लालसेपोटी काय गमावले याची जाणीव होते, तेव्हा उशीर झालेला असतो. अशावेळी जाणीव होते ती, फक्त पैशाच्या ‘श्रीमंती’पेक्षा सुख-समृद्धी-समाधान Happiness महत्त्वाचे आहे.

‘श्रीमंत’ आणि ‘समृद्ध’ यातील फरक

‘श्रीमंत’ आणि ‘समृद्ध’ यातील फरक जाणून घेण्यासाठी आपण काही उदाहरणे बघू या. राजेश एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये अतिशय मोठ्या हुद्द्यावर काम करतो. वयाच्या ४५ व्या वर्षी त्याने भरपूर पगार, मोठा फ्लॅट, अलिशान गाडी आणि अत्यंत उंची लाइफस्टाइल हे सगळे वैभव मिळवले आहे. कंपनीमध्ये आणि समाजात राजेश अत्यंत ‘यशस्वी’ आणि ‘श्रीमंत’ Rich म्हणून ओळखला जातो.

त्याच्यासारखे बनायचे असा विचार कित्येक जण करतात. आपले समाजातील स्टेट्स Social Status टिकवण्यासाठी तो खूप प्रयत्न करायचा. परंतु, या स्पर्धेत टिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी त्याला कराव्या लागणाऱ्या प्रयत्नात खूप वेळ द्यावा लागत होता आणि कुठे तरी त्याला सतत तणाव जाणवत होता. आपण एखाद्या ‘रोलर कोस्टर’ राईडमध्ये आहोत, ज्याचा वेग आता थांबवता येत नाही आणि यातून बाहेरही पडता येत नाही, अशी काहीशी अवस्था झाल्याचे राजेशला जाणवत होते.

यातूनच जीवनशैलीशी Lifestyle निगडीत रक्तदाब, मधुमेहासारखे आजार त्याला झाले आणि याचे पर्यावसन अवघ्या ४५व्या वर्षी बायपास सर्जरीमध्ये झाले आणि नंतर त्याच्या धावपळीच्या काम करण्यावर अनेक मर्यादा आल्या, पुढे काम कसे करायचे, आता आपण यशस्वी नाही, अशी विनाकारण खंत त्याला वाटत राहिली. इतके वर्ष कामात प्रचंड व्यग्र राहून भरपूर पैसे, तर कमावले; पण आता आलेल्या मर्यादांमुळे पुढे काय करायचे? हा मोठा प्रश्न त्याला पडला होता.

ताणामुळे नैराश्‍याकडे स्वप्नाची वाटचाल

अवघ्या ३० व्या वर्षीच स्वप्नाने स्वतःच्या व्यवसायात नाव कमावले. अतिशय मेहनतीने तिने हा टप्पा गाठला. कमी कालावधीतच अधिक श्रीमंत होता येईल, असा विचार करून केलेली व्यवसायातील गुंतवणूक फसली आणि सर्व काही बिनसले. सततची स्पर्धा, आपल्या व्यवसायासाठी लागणारी लाइफस्टाइल मेंटेन करणे तिला जिकीरीचे वाटू लागले.

भविष्याची अकारण काळजी, त्यातूनच जोडीदारासोबत झालेल्या नात्यातील दुराव्यामुळे तिला ताण अधिकच असह्य झाला. या ताणावर मात करण्यासाठी ती शोधत असलेले उपाय कामी आले नाहीत. मित्र, परिवार यांनाही ती आपल्या अडचणी सांगू शकली नाही आणि अशातूनच ती नैराश्याच्या गर्तेत अडकली.

हे देखिल वाचा-

Life Balance श्रीमंत होऊ आणि समृद्धही
Happy Life : तुम्हीही जीवनातल्या आनंदाच्या शोधात आहात? बीके शिवानी यांच्या या टिप्स फॉलो करा

समतोल साधणारा विशाल

विशालने त्याच्या कामामुळे वयाच्या ३५ व्या वर्षी कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून स्वत:ची चांगली ओळख बनवली आहे. अतिशय मेहनती आणि दिलेली जबाबदारी चोख पार पाडणाऱ्या विशालने कंपनीमध्ये मिळणारा वरिष्ठ हुद्दा जाणीवपूर्वक नाकारला. खूप प्रवास, कामाच्या वेळा अनिश्चित होणार असल्याने त्याने ही जबाबदारी स्वीकारली नाही. आपल्या आर्थिक गणिताची सांगड विशालने अगदी योग्य पद्धतीने घातली आहे आणि भविष्यातील खर्चाची; तसेच त्याच्या आर्थिक उद्दिष्टांची योग्य आखणी केली आहे.

याखेरीज विशाल आपली वाचनाची आवड जोपासतो, तो दर महिन्याला दोन नवी पुस्तकं वाचतो, आपल्या आरोग्यासाठी दररोज एक तास चालणे त्याने गेले कित्येक वर्षे चालू ठेवले आहे. लोकांनी फारशा भेट न दिलेल्या जागा शोधून तेथील निसर्गाचा आस्वाद घेणे त्याचा छंद आहे.

याच छंदातून त्याने एक स्टार्ट-अपदेखील चालू केले आहे आणि शनिवार-रविवार तो अनेक गटांना अशा ठिकाणी घेऊन जातो. या छंदामुळे चांगले काम करण्याची प्रेरणा, ऊर्जा मिळत राहते, असा विशालचा अनुभव आहे. एकूणच काम, आर्थिक आघाडी, आरोग्य आणि आपले छंद यांचा चांगला समतोल विशालने साधला आहे.

राजेश, स्वप्ना आपल्या क्षेत्रात उत्तम काम करून श्रीमंत झाले होते, यशस्वी होते. कदाचित कुठे तरी कमी पडल्याने ते कठीण काळात तग धरू शकले नाहीत आणि त्या परिस्थितीचा सामना करू शकले नाहीत. याउलट विशाल आयुष्यातील अनेक आघाड्यांवर समतोल साधत आहे. वरील उदाहरणे प्रातिनिधिक असली, तरी खोलात जाऊन विचार केला, तर आज समाजात अनेक जण श्रीमंत होण्याच्या या वेगवान स्पर्धेत पोषक अशी जीवनमूल्ये हरवत चालले आहेत. ही जीवनमूल्येच खऱ्या अर्थाने आपल्याला ‘समृद्ध’ बनवत असतात. तेव्हा ‘श्रीमंत’ होण्याबरोबर ‘समृद्ध’ होण्याचाही प्रयत्न करू या.

समृद्ध होणे अधिक ‘परिपूर्ण’ आहे

आज आपण सर्वजण सुखी होणे म्हणजे श्रीमंत होणे हे परिमाण लावतो; त्याचे कारण तसे अगदी साधे आहे. सुखाची आपली व्याख्या म्हणजे ‘गरज’ पूर्ण झाली, तर सुख मिळाले अशी आहे. यामध्ये आपल्या गरजा अमर्याद होत आहेत आणि यातूनच आपण सुखी नसल्याची भावना निर्माण होत आहे.

थोडक्यात, सुखासाठी भरपूर चैनीच्या वस्तूंचा साठा करून आपण आपली जीवनशैली अधिक उंची केली आहे, तिचा स्तर वाढवले आहे, मात्र आपले खरे सुख यात कुठे तरी हरवत आहे आणि याच कारणामुळे आज जगात भारत पाचवी आर्थिक महासत्ता असूनही आनंदी देशांच्या यादीत शेवटून १० व्या म्हणजे १२५ व्या क्रमांकावर आहोत. तेव्हा केवळ ‘श्रीमंत’ हे परिमाण न लावता त्याबरोबर आपण ‘समृद्ध’ कसे होऊ यासाठी देखील प्रयत्न केले, तर नक्कीच आयुष्याच्या या टेस्टमध्ये सहज निभावून जाऊ.

थोडक्यात, ‘श्रीमंत’ म्हणजे पैशाने मोठे होणे आहे, जे मर्यादित आहे. मात्र, ‘समृद्ध’ होणे म्हणजे आपल्यातील क्षमतांचा पूर्ण विकास करत परिपूर्ण होणे, जे अधिक व्यापक, अर्थपूर्ण आहे.

हे देखिल वाचा-

Life Balance श्रीमंत होऊ आणि समृद्धही
Life Mantra : आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं असेल तर पालकांसोबतचं तुमचं नातं असं घट्ट करा

‘समृद्ध’ म्हणजे नेमके काय?

आपण जेव्हा गोष्टी पैशाच्या परिमाणात मोजतो, तेव्हा अमुक एक व्यक्ती ‘श्रीमंत’ आहे असे म्हणतो. आरोग्याच्या बाबत आपण एखादी व्यक्ती ‘आरोग्यसंपन्न’ म्हणतो, शिक्षणाबाबत आपण ‘शिक्षणाने समृद्ध’ असे म्हणतो किंवा ‘मित्रपरिवाराने संपन्न’ असे म्हणतो. तेव्हा ‘समृद्ध’ होणे म्हणजे नेमके काय याची व्याख्या करायची झाली, तर श्रीमंतीबरोबरच पुढील पाच क्षमतांनी समृद्ध होणे-

• आरोग्याने समृद्ध

• मित्र, परिवाराने समृद्ध

• कला/छंदाने समृद्ध

• आध्यात्मिक प्रगतीने समृद्ध

• दातृत्वाने समृद्ध

आरोग्याने समृद्ध

‘श्रीमंत’ होण्याच्या स्पर्धेत आरोग्यसंपन्न होणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतातील प्रसिद्ध गुंतवणूकदार (कै.) राकेश झुनझुनवाला यांनीदेखील आपल्या शेवटच्या काही दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेतली नसल्याची खंत बोलून दाखवली. ‘श्रीमंत’ होण्यासाठी झटणे, त्यासाठी मनापासून प्रयत्न करणे यात गैर काहीच नाही.

पण त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दररोज किमान अर्धा तास आपल्या आरोग्यासाठी दिला पाहिजे. आजारी पडल्यानंतर औषधोपचार आणि दवाखाना यांच्यावर खर्च करण्याऐवजी आधीच आपली स्वतःची काळजी घेत आरोग्याने समृद्ध होण्याचा संकल्प करू या.

मित्र परिवाराने समृद्ध

बऱ्याचदा कामाच्या व्यापात आपण आपला परिवार आणि मित्र यांना वेळ देऊ शकत नाही. खरं तर चांगले काम करण्याचे बळ आणि प्रेरणा आपल्याला आपल्या परिवारातून मिळत असते, तेव्हा रोजचा अधिकाधिक वेळ आपल्या परिवारासाठी देण्याचीदेखील अत्यंत गरज आहे.

अडचणींच्या काळात काही गोष्टी अशा आहेत, ज्या आपण आपल्या परिवारात नाही; पण मित्रांसोबत बोलू शकतो आणि मन हलकं करू शकतो. मित्र परिवाराने समृद्ध असणे म्हणजे अडचणीच्या वेळेस ज्याच्याकडे हक्काने मन मोकळे करू शकतो, असा मित्र आणि ज्यांच्यासाठी आपण झटतो, त्या परिवाराला वेळ देता येणे. तेव्हा ‘श्रीमंत’ होण्याच्याबरोबरीनेच ही समृद्धी कशी जोपासता येईल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू या.

कला/छंदाने समृद्ध

आपल्या आवडीचा छंद किवा एखादी कला जोपासणे ही देखील समृद्ध होण्याची एक पायरी आहे. वाचनासारखा छंद जोपासण्यासारखा आनंद नाही. सुधा मूर्ती यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितल्याचे आठवते, की गेल्या कित्येक वर्षात त्यांनी नवी साडी खरेदी केली नाही; पण वीस हजारांहून अधिक पुस्तकं मात्र आवर्जून खरेदी केली आहेत.

आपली आवड किंवा छंद जोपासून आपल्याला काम करण्याची अधिक चांगली प्रेरणा मिळते, असा अनेक जणांचा अनुभव आहे. तेव्हा कामाच्या व्यापात आपले चांगले छंद जोपासू शकलो नसू, तर हा देखील एक संकल्प करू, की आठवड्यातील, महिन्यातील ठराविक वेळ आपल्या छंदासाठी काढू या.

आध्यात्मिक प्रगतीने समृद्ध

लौकिक अर्थाने श्रीमंत होणे ही आपली गरज असली तरीही व्यापक आणि अर्थपूर्ण समृद्धी म्हणजे आध्यात्मिक प्रगती. आयुष्याच्या एका टप्प्यावर याची जाणीव प्रत्येकाला होतेच आणि ‘कोविड’च्या काळात हा धडा आपल्याला चांगलाच मिळाला. आपण करत असलेले प्रयत्न एका बाजूला; पण आयुष्याची अनिश्चितता दुसऱ्या बाजूला, या परिस्थितीमध्ये चांगले आणि वाईट काय, याचा विचार करण्याची विवेकबुद्धी, सुख आणि दु:ख समान भावाने घेता येण्याची क्षमता ही आध्यात्मिक प्रगतीनेच साध्य होते. तेव्हा ही क्षमता आपण विकसित करण्याची आत्यंतिक गरज आहे. आध्यात्मिक प्रगतीने समृद्ध होऊन मानसिक समाधान, उत्तम काम करण्याची उर्जा प्राप्त करणे ही देखील एक साधनाच आहे.

दातृत्वाने समृद्ध

आपण मिळवलेले यश, श्रीमंती यांचा समाजालादेखील उपयोग करून देण्याचा विचार म्हणजे दातृत्वाने समृद्ध होणे. अनेकदा आपण आपल्या आर्थिक नियोजनामध्ये आपली उद्दिष्टे साध्य करण्याचा विचार करतो. परंतु, यात आपण समाजासाठी काही रक्कम दान करणे, आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा समाजासाठी करणे आदी गोष्टींचा आवर्जून विचार करायला हवा.

दातृत्वाने समृद्ध होण्याची क्षमता आपल्याला अजून अधिक काम करण्याची प्रेरणा देत राहील. बिल गेट्स, अझीम प्रेमजी, रतन टाटा यांसारखे प्रथितयश उद्योगपती आपल्या संपत्तीमधील मोठा हिस्सा समाजातील गरजू घटकांसाठी देत असतात्त, त्यांच्यातील हा गुण आपणदेखील घेत, यात खारीचा वाट उचलू या.

ऑस्ट्रेलियामध्ये इमर्जन्सी वॉर्डमध्ये काम करणाऱ्या ब्रोनी वेअर या नर्सने आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असणाऱ्या अनेक जणांची सुश्रुषा करताना, त्या पेशंटनी बोलून दाखवलेली त्यांच्या आयुष्यातील खंत Regrets of the Dying या पुस्तकामध्ये खूप परिणामकारकरित्या लिहिलेली आहे.

आयुष्यातील शेवटच्या घटका मोजणाऱ्या बहुतेक पेशंटनी आपण आयुष्यात केवळ दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःच्या उद्दिष्यासाठी जगलो नाही, तसेच मित्र आणि परिवारासाठी पुरेसा वेळ देऊ शकलो नाही, आयुष्यात आनंदी राहू शकलो नाही, अशी खंत असल्याचे सांगितले.

आपल्या सर्वांसाठी हा नक्कीच एक ‘वेक-अप कॉल’ आहे. तेव्हा चांगल्या मार्गाने उत्तम धन जोडून, प्रत्येक रात्री शांत झोप लागेल असे मानसिक समाधान मिळवत ‘समृद्ध’ होण्याचा हा प्रवास आरंभ करू. श्रीमंत होण्याच्या प्रवासाबरोबर क्षमतांचा विकास करत ‘समृद्ध’ही होऊ या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com