India Gold Mine: कुठे आहे भारतातले लिटल इंग्लंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोलार - भारताची सूवर्णभूमी}

Gold Rush: कुठे आहे भारतातले 'लिटल इंग्लंड'..?

स्पर्धात्मक परीक्षेत नेहमीच विचारला जाणारा प्रश्‍न. भारतात सोने कोठे सापडते ? किंवा भारतात ‘लिटल इंग्लंड’ कोठे आहे? हे ठिकाण दुसरे तिसरे नसून कर्नाटकातील ‘कोलार’ आहे. सोन्याच्या खाणीसाठी जगभरात कोलारची कीर्ती पसरली असून तेथून आतापर्यंत तब्बल ९०० टन सोने काढल्याचे सांगितले जाते. जाणून घेऊ या 'लिटल इंग्लंड' विषयी....

एकेकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या कोलारची आता बकाल अवस्था झाली आहे. रेल्वे किंवा रस्ते मार्गातून कोलार शहर ओलांडतो. तेव्हा आपल्याला सोन्याच्या खाणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जीव धोक्यात घालून कामगारांनी सोने शोधून श्रीमंतांना आणखी श्रीमंत केले. याच कामगारांवर पुढे उपासमारीची वेळ आली. ते आता ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत आहेत. (Little England Story of Indias biggest gold field)

दक्षिणेतील सुपरहिट चित्रपट ‘केजीएफ’वरून कोलार गोल्ड फिल्ड (Gold Field) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या गोल्ड फिल्डसला २००० वर्षापेक्षा अधिक इतिहास आहे. अर्थात इंग्रजांच्या राजवटीत केजीएफचे नाव सर्वत्र पोचले. विशेष म्हणजे केजीएफ चित्रपटातील काही दृश्‍य आणि कथानक हे सत्य घटनेवर आधारित आहे. या खाणीचा (Mine) इतिहास पाहिल्यास प्रत्यक्षातील केजीएफचा इतिहास देखील रक्तरंजित आहे. इतिहासतज्ज्ञांच्या मते, चोल साम्राज्यातील लोक कोलारच्या जमिनीत हात घालून सोने (Gold) काढून घेत होते. गेल्या शंभर ते दीडशे वर्षात तब्बल ९०० टन सोने काढल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा: प्रत्येक व्यक्ती एक कथा असते ती ऐकायला तुम्हाला आवडेल का? वाचा ह्युमन लायब्ररीबद्दल

कर्नाटकची राजधानी बंगळूर (Bengluru) येथून शंभर किलोमीटर अंतरावर असलेले कोलार गोल्ड फिल्ड्सबाबत जगाला नेहमीच उत्सुकता राहिली आहे. सुमारे दोन हजार वर्षांपासून या ठिकाणी सोने काढले जात असल्याचे इतिहास तज्ज्ञ सांगतात. गुप्त, चोल वंश, टिपू सुलतानसह इंग्रजांनी कोलारमधून सोने काढले. या फिल्ड्सबद्धल एशियाटिक जर्नलमध्ये सविस्तर लेख प्रकाशित झाला. यात कोलारवर चार पाने आहेत. इंग्रजाच्या राजवटीत कोलार खाणीतून सोने काढण्यास सुरवात झाल्यानंतर १८८० च्या काळात जॉन टेलर तिसरे यांच्यानंतर जॉन टेलर ॲड सन्स यांनी केजीएफच्या खाणीवर नियंत्रण मिळविले.

ब्रिटिश शासकांनी कोलार गोल्ड फिल्ड्सची जमीन म्हैसूर राज्याला दिली होती. परंतु, त्यांनी सोन्याची खाण असलेले कोलार (Kolar) क्षेत्र आपल्याकडेच ठेवले. या कंपनीकडून तब्बल १९५६ पर्यंत सोने काढले जात होते. कोलारमध्ये हाताने देखील सोने निघते, असे जेव्हा कळाले तेव्हा लेफ्टनंट जॉन वॉरेन यांनी कोलारच्या गावातील लोकांना बक्षीस देण्याचे आमिष दाखवून सोने काढून घेण्यास सुरवात केली. बक्षीसापोटी गावकऱ्यांनी वॉरेनकडे बैलगाडी भरून माती नेली. ग्रामस्थांनी माती धुवून काढली तेव्हा त्यात सोन्याचे अंश दिसले.

हेही वाचा: नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचं घोडं अडलंय कुठं..?

सुरवातीला वॉरेन यांना विश्‍वास बसला नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकाराचा सखोल तपास करण्यास सांगितले. वॉरेनने आपल्या राजवटीत कोलार खाणीतून ५६ किलोच्या आसपास सोने काढल्याची नोंद आहे. इंग्रज मंडळी कोलारला भारतातील ‘लिटल इंग्लंड’ असे म्हणत असत. केजीएफमध्ये भरपूर सोने असल्याने इंग्रजांना कोणत्याही स्थितीत ती खाण मिळवायची होती. त्यामुळे ते लोकांकडून खोदकाम करून घेत असत. पण हाताने खोदकाम करणाऱ्या मजुरांचा मृत्यू होऊ लागला. त्यामुळे इंग्रजांनी या ठिकाणी खोदकामावर बंदी घातली.

भारतात पहिली वीज कोलारमध्ये
कोलारमध्ये १८७५ मध्ये खोदकाम सुरू केले तेव्हा भारतात वीज नव्हती. कालांतराने वीजेची सोय करण्यात आली आणि वीज पाहणारे कोलार हे भारतातील पहिले शहर होय. कोलार खाणीवर नियंत्रण ठेवणारे जॉन टेलर ॲड सन्सची मोठी कामगिरी म्हणजे १९०२ मध्ये कोलारमध्ये त्यांनी वीज आणली. १४० किलोमीटर अंतरावरील कावेरी पॉवर प्लँटवरून वीज आणली.

जपाननंतर केजीएफ हे वीज असणारे आशियातील दुसरे शहर ठरले. १९०५ मध्ये भारत जगात सोने उत्पादनात सहाव्या स्थानावर होता. जेव्हा केजीएफ सोने उत्पादनात आघाडीवर होते, तेव्हा ३० हजाराहून अधिक कामगार या ठिकाणी काम करत होते. ते कामगार कुटुंबीयांसह राहत होते आणि जगभरातून या कामासाठी भरती केली जावू लागली. त्यामुळे विविध समुदायाचेच नाही तर विविध देशाचे लोक या ठिकाणी येऊ लागले. ॲग्लो इंडियन असणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय होती.

खाण सुरू झाली तेव्हा स्थानिक कामगार तेथे काम करण्यास तयार नव्हते. कारण ती अतिशय धोकादायक होती. त्यामुळे तामिळनाडूतील कामगार आले. त्यामुळे केजीएफमध्ये तमिळ भाषिकांची संख्या वाढली. खाणीतून काढलेले सोने इंग्लंडला पाठविले गेले. त्यामुळे ब्रिटिश भागधारक गब्बर झाले. कोलार खाण परिसरात कमालीची विषमता निर्माण झाली. ब्रिटिश कामगार हे आलिशान बंगल्यात राहत होते, त्याचवेळी भारतीय कामगार मात्र झोपडीत आणि मातीच्या खोलीत राहत होते. विशेष म्हणजे खाणीतील धोकादायक काम करण्याची जबाबदारी भारतीय कामगारच उचलत असत.

ब्रिटिशांकडून पर्यटन स्थळ विकसित
१९०३ मध्ये ब्रिटिश सरकारने केजीएफ आणि परिसरातील गावांतील पाणीपुरवठ्यासाठी बेटमंगला येथे सरोवर तयार केले. या कृत्रिम सरोवरात पर्यटकांची गर्दी वाढली आणि कालांतराने हा भाग पिकनिक स्पॉट बनला. ब्रिटिश लोकांनी कोलार परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांनी रुग्णालय, शाळा. सोशल क्लब, बोटिंग लेक, गोल्फ कोर्स, जलतरण तलाव, जिमखाना सुरू केले.

पण या सुविधांचा सरसकट वापर करता येत नव्हता. त्यातही विभागणी करण्यात आली. केजीएफमधील वैद्यकीय सुविधा जागतिक दर्जाची होती. कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोफत उपचार केले जात होते. कोलार ही जगातील दुसऱ्या क्रमाकांची खोल खाण असून तेथे १२१ वर्षापर्यंत सोन्यासाठी मोठे खोदकाम झाले.

कोलार गोल्ड फिल्डचे राष्ट्रीयीकरण
स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने केजीएफच्या खाणी ताब्यात घेतल्या. १९५६ मध्ये या खाणीचे राष्ट्रीयीकरण झाले आणि १९७० मध्ये भारत गोल्ड माइन्स लिमिटेड कंपनीने काम सुरू केले. सुरवातीच्या काळात या खाणीतून सरकारला लाभ झाला. परंतु, १९८० च्या काळात कंपनी तोट्यात जाऊ लागली. काही दिवसांनी तर मजुरांना पैसे देण्यासाठी कंपनीकडे भांडवल नव्हते. २००१ मध्ये कोलारमधील खाणकाम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कोलार गोल्ड फिल्ड हे खंडहर बनले.

केजीएफमध्ये अजूनही सोने असल्याचा दावा केला जात आहे. कोलारची खाण बंद पडल्यानंतर वर्षभरात सुमारे ४० कामगारांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे औषधोपचारासाठी पैसे नव्हते. ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे खाणीशी जोडले गेलेले होते. खाणकाम थांबविले, तेव्हा कोलार परिसरात तीन लाख लोक राहत होते. त्यापैकी ७० हजार नागरिक खाणीवर अवलंबून होते.

एस जॉर्ज नावाच्या व्यक्तीची कहानी इथे सांगता येईल. त्यांनी २२ वर्ष भारत गोल्ड माइन्स लिमिटेडमध्ये काम केले. त्याच्या कुटुंबात १० जण होते. ते खाणीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे आणि त्यापोटी २००१ पर्यंत दोन हजार रुपये मिळायचे. कालांतराने त्याच्या डोक्यावर ८० हजाराचे कर्ज झाले. एरव्ही तीन वेळेस जेवणारे जॉर्ज दोनदाच जेवण करू लागले. अशी शोचनीय स्थिती खाण कामगारांची झाली.

खाण कामगार 'अच्छे दिन'च्या प्रतिक्षेत
२००१ मध्ये भारत गोल्ड माइन लिमिटेड बंद पडल्यानंतर शेकडो कामगार बेरोजगार झाले. त्यानंतर केवळ एकच भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनी राहिली. या कंपनीत स्थानिकांऐवजी बाहेरील लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या. त्यामुळे स्थानिक कामगार मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी केजीएफबाहेर जाण्यास प्रवृत्त झाले. ‘बीजीएमएल’ नंतर ‘बीईएमएल’ हीच एक कंपनी कोलारमध्ये होती आणि तेथे देशभरातील कामगार आले होते. तेथे आणखी उद्योगाची गरज आहे. केजीएफ हे केरळप्रमाणे आहे. कोलारचे लोक केवळ साक्षरतेवर भर देत नाहीत तर उच्च शिक्षण मिळवण्याचेही ध्येय ठेवतात.

सरकारच्या हालचाली
कोलारची खाण पुन्हा सुरू करण्याची सरकारची इच्छा आहे. या खाणीतील कामासाठी जागतिक पातळीवर निविदा मागविण्यात आल्या. परंतु कोणतीही कंपनी पुढे आली नाही. खाणीत अजूनही सोने असल्याचे सांगितले जाते. देशात फक्त केजीएफ येथेच सोने आहे. भारत गोल्ड माइन्स लिमिटेडकडे हजारो एकर जमीन आहे. त्याठिकाणी औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा इरादा आहे. यासाठी योजनाही आखली जात आहे. त्यामुळे पाच लाख रोजगार उपलब्ध होतील, असा कयास आहे. त्याचवेळी सरकारने खनिजाचा योग्य वापर करण्याचे आदेश बजावले आहेत. राज्यात शंभरपेक्षा अधिक खनिजसंबंधी कारखाने सुरू करण्याच्या हालचाली केल्या जात आहेत.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top