

गौरव बोरा
gauravbora89@gmail.com
भारताच्या सतत बदलत्या अर्थव्यवस्थेत नुकताच एक क्रांतिकारक घटक उदयाला आला आहे. ही अशी गतिशक्ती आहे, जी व्यवसायांचे नवरुपांतर घडवून नव्या संधी निर्माण करत आहे.
प्रायव्हेट इक्विटी (पीई) म्हणजेच खासगी भागमालकी हा घटक पारंपरिक गुंतवणुकींच्या पलिकडे जात विशेषतः नवउद्योग व सुस्थापित कंपन्यांच्या विकासासाठी वित्तीय कौशल्य व स्थिर भांडवल आणतो.
भारत आपल्या वैविध्यपूर्ण लोकसंख्येसह जागतिक गुंतवणूक आकर्षित करत असून, आपली ग्राहक बाजारपेठही विकसित करत आहे.
प्रायव्हेट इक्विटी ही भारताच्या प्रचंड सुप्त सामर्थ्याचा दरवाजा उघडणारी किल्ली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
आपण भारताच्या प्रायव्हेट इक्विटी जगताची ओळख करुन घेऊ या आणि हा घटक भारताच्या अर्थचित्राला आकार देत उद्योजकांचे कसे सक्षमीकरण करत आहे, हे समजून घेऊ या.
प्रायव्हेट इक्विटीला (पीई) मराठी भाषेत खासगी भागमालकी असे म्हणता येईल. हा गुंतवणुकीचा असा प्रकार असतो, ज्यात श्रीमंत व्यक्ती त्यांचा पैसा शेअर बाजारात नोंदणी न झालेल्या खासगी कंपन्यांत गुंतवतात.
हा गुंतवणुकीचा एक वेगळ्याच प्रकारचा पर्याय आहे, जो उच्च मत्ताधारक गुंतवणूकदारांना भविष्यात यशस्वी आणि विकसित होण्याचे सुप्त सामर्थ्य असलेल्या खासगी कंपन्यांना आर्थिक पाठबळ पुरवण्यास परवानगी देतो.
लक्षणीय संपत्ती बाळगून असलेले गुंतवणूकदार शेअर बाजारात अथवा नेहमीच्या पर्यायांत गुंतवणूक करण्यापेक्षा कालांतराने आकर्षक परतावा मिळविण्यासाठी हा ‘प्रायव्हेट इक्विटी’चा मार्ग पत्करु शकतात.
प्रायव्हेट इक्विटी दीर्घकाळात पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा उच्च परतावा मिळवून देते. या गुंतवणुकीचे यश संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असते आणि त्या निर्णयांवर गुंतवणूकदारांचे नियंत्रण नसते.
संस्था आणि उच्च मत्ताधारक गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीचा काही हिस्सा या प्रायव्हेट इक्विटीकडे वळवतात, त्यातून खासगी कंपन्यांना विस्तारासाठी निधी पुरवून त्यांच्या व्यवसायाची वाढ घडवून आणतात. त्यातून ते एकंदर व्यवसायिक व आर्थिक विकासात योगदानही देतात.
प्रायव्हेट इक्विटी गुंतवणूकदारांचे प्रकार
व्हेंचर कॅपिटलिस्ट (साहसवित्त पुरवठादार)ः हे गुंतवणूकदार विकासाचे उच्च सुप्त सामर्थ्य असलेल्या उगवत्या टप्प्यातील कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतात. ते नवउद्योगांना (स्टार्ट-अप) निधी व कौशल्य पुरवून त्यांचा व्यवसाय विकसित करण्यास व त्याचा आवाका वाढविण्यास मदत करतात.
ग्रोथ कॅपिटल इन्व्हेस्टर (विकास भांडवल गुंतवणूकदार)ः हे गुंतवणूकदार अधिक सुस्थापित कंपन्यांना लक्ष्य करतात, ज्यांना विस्तारासाठी आणि प्रगतीला चालना देण्यासाठी भांडवलाची गरज असते. ते कंपनीच्या भविष्यातील विकासाला पाठबळ देण्यासाठी निधी पुरवतात.
बायआऊट फंड ः हे गुंतवणूकदार सुस्थापित कंपन्यांत नियंत्रक हिस्सा मिळवण्यात पारंगत असतात. त्यातून ते बहुतेकवेळा लक्षणीय परतावा मिळविण्यासाठी अशा कंपन्यांची फेररचना घडवून त्यांची कामगिरी सुधारतात.
स्पेशलाइज्ड फंड ः प्रायव्हेट इक्विटी फंड यात येतात, जे रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा, आरोग्यनिगा अथवा तंत्रज्ञान अशा उद्योगांवर लक्ष केंद्रित करतात. हे फंड उद्योग-विशिष्ट ज्ञान व गुंतवणुकीच्या संधी मिळवून देतात.
प्रायव्हेट इक्विटी कसे काम करते?
प्रायव्हेट इक्विटी (पीई) गुंतवणुकीत अशा फंडांचा समावेश असतो, जे खासगी कंपन्यांत थेट गुंतवणूक करतात किंवा सार्वजनिक कंपन्यांच्या विक्रीत सहभागी होऊन त्यांचे खासगीकरण करतात. हे कसे घडते याचेही टप्पे आहेत-
फंड फॉर्मेशन (निधी उभारणी) ः पीई फर्म्स पेन्शन फंड, एन्डॉमेंट व श्रीमंत व्यक्ती अशा गुंतवणूकदार संस्थांकडून फंड स्थापनेसाठी भांडवल उभारतात.
डील सोर्सिंग (व्यवहार निश्चिती) ः पीई फर्म संपर्कजाळे, उद्योगातील संबंध व वित्तीय सल्लागार अशा विविध माध्यमांतून गुंतवणुकीच्या सुप्त संधी निश्चित करतात.
ड्यू डिलिजन्स (पूर्वाभ्यास) ः गुंतवणूक करण्यापूर्वी पीई फर्म विस्तृत लक्ष्य कंपनीचा सविस्तर अभ्यास करते व तिची आर्थिक स्थिती, व्यवस्थापन संघ, बाजारपेठेतील स्थान, प्रगतीच्या संधी व संभाव्य जोखमींचा आढावा घेते.
इन्व्हेस्टमेंट स्ट्रक्चर (गुंतवणूक रचना) ः पीई फर्म गुंतवणुकीची अशी रचना करते, ज्याद्वारे कंपनीत नियंत्रक किंवा लक्षणीय अल्पसंख्य हिस्सा संपादन करता येतो.
व्हॅल्यू क्रिएशन (मूल्य निर्मिती) ः गुंतवणूक केल्यानंतर पीई फर्म कंपनीच्या व्यवस्थापनाला सहकार्य करुन कंपनीचे मूल्यवर्धन करण्यासाठी कामकाजात्मक सुधारणा, व्यूहात्मक पुढाकार व खर्चबचतीचे उपाय राबवण्यासाठी मदत करते.
एक्झिट स्ट्रॅटेजी (निर्गमन व्यूहरचना) ः पीई गुंतवणुकीचे सर्वोच्च ध्येय हे गुंतवणूकदारांसाठी लक्षणीय परतावा निर्माण करण्याचे असते. त्यामुळे ते फायदा मिळताच काही काळाने अशा गुंतवणुकीतून बाहेरही पडू शकतात.
खासगी कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) होताना किंवा आपला वाटा इतर कंपनीला विकून (ट्रेड सेल) किंवा फेरभांडवलीकरण (रिकॅपिटलायझेशन) असे हे मार्ग असतात.
डिस्ट्रिब्युशन ऑफ रिटर्न्स (परताव्याचे वितरण) ः एकदा गुंतवणुकीतून बाहेर पडल्यावर मिळालेला नफा पीई फर्मच्या गुंतवणूकदारांमध्ये फंडाच्या कराराच्या नियमांनुसार वितरीत केला जातो. पीई फर्म सामान्यतः व्यवस्थापन शुल्क व झालेल्या नफ्यावरील व्याजाची आकारणी करतात.
पीई गुंतवणुकीची श्रेणी ही साहसवित्तापासून (सुरवातीच्या टप्प्यातील नवउद्योगांमध्ये गुंतवणूक) ते लाभात्मक खरेदी (लक्षणीय कर्ज वित्तपुरवठा करुन सुस्थापित कंपन्या ताब्यात घेणे) असते.
अशा गुंतवणुकीत नेहमीच उच्च दर्जाचे वित्तीय कौशल्य, कामकाजाची सखोल माहिती व सार्वजनिक बाजारातील गुंतवणुकीच्या तुलनेत अधिक दीर्घकालीन गुंतवणूक अवकाशाचा समावेश असतो.
पीई गुंतवणूक उच्च मत्ताधारक व्यक्तींना शेअर बाजाराच्या सुप्त सामर्थ्याचा फायदा उठवण्याची; तसेच त्यांचा गुंतवणूक संग्रह विस्तारण्याची संधी मिळवून देतात.
ती वाढीचे सुप्त सामर्थ्य असणाऱ्या आश्वासक कंपन्यांचा सुरवातीच्या टप्प्यातच भाग बनण्याचा मार्ग मिळवून देते आणि त्यांच्या यशात योगदान देऊन निर्माण होणाऱ्या परताव्यात वाटाही मिळवून देते.
समारोपादाखल सांगायचे झाल्यास, भारतातील प्रायव्हेट इक्विटी हा घटक मौल्यवान भांडवली स्रोत ठरला असून, तो वित्तपुरवठ्याची तीव्र गरज असलेल्या कंपन्यांना पाठबळ देत आहे आणि नफाक्षम व्यवसायांच्या वाढीला चालनाही देत आहे.
तो उच्च मत्ताधारक व्यक्ती व गुंतवणूकदार संस्थांना शेअर बाजाराचा फायदा उठवण्याच्या, त्यांचा गुंतवणूक संग्रह विस्तारण्याच्याआणि आश्वासक कंपन्यांच्या यशात सहभागाच्या संधीही देतो.
भारतातील प्रायव्हेट इक्विटी फर्म मौल्यवान सेवा पुरवतातच, परंतु एकंदर मूल्यवर्धनात योगदानही देतात.
भारताची अर्थव्यवस्था सातत्याने जोमदारपणे कामगिरी करीत असताना प्रायव्हेट इक्विटी घटकही उद्योजकतेला चालना, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगती यांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे.
हे असे चैतन्यशील क्षेत्र आहे, जे अनोख्या गुंतवणूक संधी व संभाव्य आकर्षक परतावा देऊ करते, भारतातील व्यवसाय चित्राला आकार देते आणि आर्थिक प्रगतीत योगदान देते.
भारतातील प्रायव्हेट इक्विटी बाजारपेठ
भारतातील प्रायव्हेट इक्विटीसाठी वर्ष २०००ची सुरवात आशावादात्मक झाली. त्यामागे तरुण लोकसंख्या, एकूण देशांतर्गत उत्पादनाची (जीडीपी) भक्कम वाढ आणि अनुत्पादक मालमत्तांचे (एनपीए) घटलेले प्रमाण या घटकांची चालना होती.
मात्र, अशा गुंतवणुकीची कामगिरी वर्ष २००५ ते २००८ हा उच्चांकी काळ वगळता फारशी समाधानकारक झाली नाही.
त्याचे कारण म्हणजे ‘ब्रिक्स’सारख्या (ब्राझिल, रशिया, भारत चीन व दक्षिण आफ्रिका) गटांतील देशांत मिळून जितक्या खासगी कंपन्या स्थापन झाल्या, त्या तुलनेत भारतात खासगी कंपन्यांचा तुटवडाच होता. अनेक खासगी उद्योगांनी प्रायव्हेट इक्विटी घेण्याआधीच सार्वजनिक भागविक्रीचा मार्ग अनुसरला.
त्या जोडीला भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वर्ष २०११ नंतर घटते राहिले. अर्थात हे अडथळे असले तरी प्रायव्हेट इक्विटीचे पाठबळ मिळालेल्या भारतातील कंपन्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या स्पर्धकांच्या तुलनेत महसूल व नफावाढ यांमध्ये प्रशंसनीय कामगिरी करुन दाखवली आहे.
आज भारतात प्रायव्हेट इक्विटी हा महत्त्वपूर्ण भांडवल स्रोत म्हणून उदयाला आला असून निधी उभारणी सहकार्य, कर व नियामक साह्य, जोखीम व्यवस्थापन, कंपनी वित्त सल्ला व विश्लेषण सेवा अशा अनेक सेवा तो खासगी कंपन्यांना पुरवत आहे.
दीर्घकालीन यशाचे नियोजन व गुंतागुंतीच्या नियामक जाळ्यातून सुलभ वाटचाल करण्यासाठी या सेवा खासगी कंपन्यांना मदत करतात.
(लेखक संपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ आहेत. मोबाईल ९९६०४९९०६४)
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.