
सेक्शन : सक्सेस स्टोरी
सुधीर जोगळेकर
sumajo51@gmail.com
सुरेश भट यांची एक प्रसिद्ध कविता आहे, ‘रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!’ या कवितेतला रंग वेगळा आहे. हा रंग आहे समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या कलंदर माणसाचा!
त्या रंगाचा या लेखाशी तसा संबंध नाही, कारण या रंगाचा संदर्भ संपूर्ण वेगळा आहे. हा रंग आहे रंगांवर प्रेम करणाऱ्या आणि सारा भवताल पर्यावरणस्नेही रंगांनी व्यापण्याची जिद्द बाळगून गेली चाळीस वर्षे रंगनिर्मितीत रंगून गेलेल्या चंद्रचूड परिवाराचा.
प्रदीप चंद्रचूड, ज्यांनी क्वॉलिटी पेंट्स अँड कोटिंग्ज प्रा. लि. या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली, ते शिकले डोंबिवलीत, वाढले डोंबिवलीत.
ते डोंबिवलीकर असल्यापासून माझा त्यांचा परिचय आहे. आता चंद्रचूड परिवार पुणेकर झाला आहे.
प्रदीप चंद्रचूड यांनी ‘यूडीसीटी’मधून पेंट्स टेक्नॉलॉजीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि पुण्याला स्थायिक होण्याआधी काही काळ भांडूपमधील रंगनिर्मिती उद्योगात नोकरी करीत सर्व प्रकारचा अनुभव घेतला.
१९८० मध्ये पिंपरी-चिंचवड परिसरातील भोसरी भागात स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. त्यांना इंडस्ट्रियल आणि ऑटोमोटिव्ह प्रोसेसेसचे आकर्षण होते. रंगनिर्मिती करताना त्यातही मुशाफिरी करता येईल असे वाटल्याने ते रंगनिर्मितीकडे वळले.
प्रदीप चंद्रचूड यांचे वडील मधुसूदन चंद्रचूड यांनी डोंबिवलीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत दीर्घकाळ नोकरी केली, परंतु आपल्या मुलाने नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करावा, अशी त्यांची इच्छा होती.
‘क्वॉलिटी पेंट्स’ची सुरुवात
प्रदीपनी १९८० मध्ये वडिलांच्या इच्छेनुसार प्रोप्रायटरशिपमध्ये स्वतःचा पहिला कारखाना सुरु केला, तो आज प्रायव्हेट लिमिटेड बनत चार कारखान्यांमध्ये विस्तारला आहे.
आता पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होण्याचीही त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘क्वॉलिटी पेंट्स अँड कोटिंग्ज प्रा. लि.’ हे त्यांच्या व्यवसायाचे नाव. तो काळ होता क्वॉलिटी आईस्क्रीमच्या लोकप्रियतेचा.
‘ते नाव घे, पण तीच विश्वासार्हता आणि तोच दर्जा तुझ्या उत्पादनांनाही राहील असे बघ,’ असा सल्ला प्रदीप यांना त्यांच्या वडिलांनी दिला होता.
पहिली पाच वर्षे ‘गरवारे पेंट्स’ची उत्पादने प्रदीप बनवत होते; पण दुसऱ्यासाठी किती काळ काम करायचे, आपले स्वतःचे काही ‘ब्रँड प्रॉडक्ट’ असले पाहिजे, असे ठरवून १९८५ मध्ये त्यांनी वाहन उद्योगाला लागणाऱ्या रंगाचे उत्पादन सुरु केले.
आज इतकी वर्षे हेच वाहन क्षेत्र त्यांचे मोठे गिऱ्हाईक आहे. प्रारंभी जमशेदपूरच्या ‘टाटा ट्रक्स’साठी आणि आता ‘टाटा मोटर्स’साठी खास करून ‘क्वॉलिटी’चे पेंट्स वापरले जातात.
आज तरी यातील काही विशेष प्रकारच्या रंग उत्पादनात ‘क्वॉलिटी’चा हात धरणारा दुसरा उद्योग भारतात नाही.
सातत्याने सुरू असलेले संशोधन, ग्राहकाभिमुख धोरण, नवनव्या संकल्पनांचा अवलंब आणि व्यवसायाप्रती समर्पण यामुळे गेल्या चाळीस वर्षांत ‘क्वॉलिटी’ने स्वतःची वेगळी छाप रंग उद्योगात उमटवली आहे.
साधारणपणे अनुभव असा की उद्योग-व्यवसाय क्षेत्रात कर्मचारी येत-जात राहतात, नवनव्या कामगारांना प्रत्येक वेळी तंत्रे शिकवावी लागतात.
प्रदीप यांचा अनुभव मात्र नेमका याच्या उलट आहे. त्यांच्याकडे ३०-३० वर्षे काम करणारे कर्मचारी आहेत. एकाच कुटुंबातील पुढच्या पिढ्यांतील सदस्यही त्यांच्याकडे नोकरीला आहेत.
रंगांचे वेड मुलीकडे...
प्रदीप यांना असलेले रंगांचे वेड त्यांची मोठी कन्या दीप्तीमध्येही आहे. ती या रंग-व्यवसायाची धुरा प्रदीप यांच्यासोबत सांभाळत आहे. दीप्तीने पॉलिमर अभियांत्रिकी शाखेतील पदवी आणि एमबीए असे शिक्षण घेतले.
शिक्षण झाल्यानंतर वडिलांचा स्थापित व्यवसाय तिला खुणावत होता; परंतु त्यात उतरण्याआधी, रंगांच्या उद्योगात काही काळ काम करावे, तिथला उत्पादनापासून विक्रीतंत्रापर्यंतचा अनुभव घ्यावा या उद्देशाने तिने काही काळ नोकरी केली.
गरवारे वॉल रोप्स, युरोपियन पेंट्स, पीपीजी, जोतून यांसारख्या महाराष्ट्रातील उद्योगांत नोकरी केल्यावर तिने काही महिने चेन्नईमधील एका उद्योगात काम केले. २०१० मध्ये तिने वडिलांच्या उद्योगात उतरायचे ठरवले.
२०१० ते २०२४ असा १४ वर्षांचा दीप्तीचा व्यावसायिक प्रवास; परंतु त्याआधीही ती आई-वडिलांबरोबर कारखान्यात जात असे, तिथले कामकाज पाहात असे.
आता निर्णय घ्यायचे, नवे ग्राहक शोधायचे, जुन्या ग्राहकांच्या गरजा पुऱ्या करताना व्यवसायाला प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जायचे, कर्मचारी व व्यवस्थापन यांचे नाते कौटुंबिक व खेळीमेळीचे राहील याची काळजी घ्यायची, हे सारे ती पार पाडत आहे.
दीप्तीचे भाग्य असे, की प्रदीप अजूनही सक्रीय आहेत, क्वॉलिटी पेंट्स अँड कोटिंग्ज प्रा. लि.चे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि तिची आई शोभा चंद्रचूड या अर्थविषयक संचालक म्हणून कंपनीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.
वाढता वाढता वाढे पसारा...
प्रदीप यांनी १९८० मध्ये तीन-चार कर्मचाऱ्यांनिशी एका छोट्या औद्योगिक शेडमध्ये सुरु केलेल्या या उद्योगाचा पसारा आता भोसरीतील तीन आणि शिरवळमधील एक अशा चार कारखान्यांमध्ये पसरला आहे. रोज सुमारे दहा ते बारा हजार लिटर पेंटचे उत्पादन येथे घेतले जाते.
आज कर्मचाऱ्यांचे संख्याबळ सुमारे शंभराच्या घरात आहे आणि त्यात साठ टक्के महिला आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सारी काळजी ‘क्वॉलिटी’ घेते, त्यांच्या आजारपणात उपचारांची व्यवस्था करते आणि हे सारे सामाजिक बांधिलकीच्या भावनेने केले जाते.
त्यामुळे कामगारांनाही घरच्या काही चिंता कमी राहतात आणि त्यांचे लक्ष कामाकडे राहते. दीप्तीने व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून कर्मचारी-सन्मुख उपक्रमांचा सपाटाच लावला आहे.
‘क्वॉलिटी’ आज पाचशेहून अधिक प्रकारच्या रंगांच्या शेड्स बनवते. ती केवळ घाऊक बाजारात रंग विकते असे नव्हे, तर वाहनावर साधा ओरखडा उठून रंग गेला, तर तिथे देता यावा यासाठीची अतिरिक्त शे-दोनशे मिलीलिटरची रंग-बाटलीही देऊ करते.
रंगनिर्मितीचे तांत्रिक ज्ञान प्रदीप आणि दीप्ती या दोघांनाही असल्याने सातत्याने संशोधनाची प्रक्रिया त्यांच्याकडे सुरूच असते. २०१२ मध्ये ‘वॉटर बेस्ड’ पर्यावरणपूरक रंग तयार करायला त्यांनी सुरुवात केली.
मेटलवर किंवा फायबरवर थेट रंगाचे कोटिंग देता येईल, असे तंत्र त्यांनी शोधून काढले. २०१२ मध्येच या रंगाला अमेरिकास्थित वाहन क्षेत्राचे मानांकन मिळाले, पहिला अमेरिकी ग्राहक मिळाला.
२०१० मध्ये दीप्ती प्रदीप यांच्याबरोबर काम करायला लागली, तेव्हा दुसरा कारखाना सुरू झाला होता. २०१७ मध्ये तिसरा कारखाना सुरू झाला.
नवी पिढी, नवे उत्पादन
दीप्ती नव्या पिढीची प्रतिनिधी आहे. ‘ग्रीन टेक्नॉलॉजी बेस्ड’ रंगोत्पादन करण्याच्या प्रयत्नात ती आहे. वयाबरोबर येणारा उत्साह तिच्यात आहेच; परंतु मार्केटिंगच्या शिक्षणातून आलेल्या अनुभवामुळे ती बहुभाषिक बनली आहे.
भारतीय भाषांबरोबरच परदेशी भाषाही ती शिकली आहे. तिचा भगवदगीतेचाही अभ्यास सुरु आहे. लेखनाची तिला आवड आहे.
तिचे आजोबा वृत्तपत्रांत आर्थिक विषयांवर लिखाण करीत. आता दीप्ती लिहिते. तिची व्यवसायाशी असलेली बांधिलकी, निष्ठा आणि संशोधक वृत्ती यांमुळे विविध संस्थांकडून तिचा गौरव झाला आहे. चंद्रचूड कुटुंबियांच्या ‘रंग आमुचा वेगळा’ या ध्यासाला मनःपूर्वक शुभेच्छा!
वाळणारा रंग तयार करण्यात यश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ धोरण अवलंबले आणि त्या धोरणानुसार यूव्ही किरणांच्या साह्याने वाळणारा रंग तयार करण्यात ‘क्वॉलिटी’ला यश आले. भारतात अशा प्रकारचा रंग तयार करणारी ‘क्वॉलिटी’ ही एकमेव कंपनी बनली.
‘वॉटर बेस्ड’ रंग पाण्याने धुतला जाणार नाही ना? पावसाळ्यात किंवा दमट हवेत रंग वाळणार कसा? ग्राहकांच्या या संभाव्य शंकांवर उत्तर शोधण्यासाठी एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या कमी सेकंदात वाळणारा रंग तयार करणे हे आव्हान ‘क्वॉलिटी’ने पेलले आणि तसा रंग तयार केला.
अशी अनेक आव्हाने पेलत ‘क्वॉलिटी’ची वाटचाल आज सुरू आहे. व्हेगा ही हेल्मेट बनवणारी कंपनी. रंग लवकर वाळत नसल्याने पावसाळ्यात ही कंपनी कमी हेल्मेट बनवत असे. आता लवकर वाळणारा रंग उपलब्ध झाल्याने हेल्मेटनिर्मितीची तिची क्षमता वाढली आणि ‘व्हेगा’ला त्याचा फायदा झाला.
कोरोनाची महासाथ हे ‘क्वॉलिटी’च्या वाटचालीतील एक विघ्न ठरले खरे; परंतु संकटाचे संधीत रुपांतर करून पुढचा प्रवास ‘दीप्ती’मान करणे यातच ‘क्वॉलिटी’चे यश सामावलेले आहे.
विषाणूचा प्रसार रोखणारा विषाणू प्रतिरोधक (अँटी मायक्रोबियल) रंग तयार करण्यासाठीचे संशोधन ‘क्वॉलिटी’त कोरोना महासाथीच्या निमित्ताने झाले आणि आता तर त्या रंगाचे उत्पादन ही ‘क्वॉलिटी’ची विशेषता बनली आहे.
ऑफिस, मॉल, विमानतळाच्या भिंती, छत यांवर हा रंग चढवला जातो. लिफ्टच्या आतील पॅनेल्ससाठी त्याचा वापर केल्याने विषाणूंचा संभाव्य प्रादुर्भाव कमी होतो.
नामवंत ग्राहक
‘टाटा मोटर्स’बरोबरच भारत फोर्ज, किर्लोस्कर, रिलायन्स, प्राज, ॲटलास कॉप्को, सँडविक, व्हेगा या कंपन्या सध्या ‘क्वॉलिटी’च्या मानांकित ग्राहक आहेत.
गाड्यांचे अनेक प्रकारचे पार्ट, इंजिन, कॉँक्रीट मिक्सर मशीन, संरक्षण क्षेत्राची बॉम्बशेल्स, एलपीजी सिलिंडर्स, प्री-इंजिनिअर्ड बिल्डिंग्ज, पंप्स, खनिज तेल शुद्धीकरण कारखाने (रिफायनरीज), स्टील फर्निचर यांसाठी ‘क्वॉलिटी’चे रंग वापरले जातात.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार-संपादक आहेत. मोबाईल ९८२००१६६७४)
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.