Money Matters- मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीडीएस कपात}

मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

दिलीप घाटे

बँकेच्या पॉलिसीप्रमाणे बँकेच्या व्याजाचे दर बदलत असतात मात्र ठेवीची रक्कम सुरक्षित असते. आता बँकेने तरीही ही मुदलातील रक्कम कमी केली तर कसे वाटेल आणि त्याविरुद्ध दाद-तक्रार कोठे करायची ते जाणून घेऊ या....

बॅंकेतील मुदतीच्या ठेवी सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम. बँकेमध्ये रक्कम ठेव ठेवून त्यावर व्याज उत्पन्न म्हणून घेणे हे जनमानसात सर्वांत प्रिय आहे. खासकरून सिनीअर सिटीझन अर्थात ज्येष्ठ नागरिकांमध्ये. कारण त्यांना उत्पन्नाचा दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. बँकेच्या पॉलिसीप्रमाणे बँकेच्या व्याजाचे दर बदलत असतात मात्र ठेवीची रक्कम सुरक्षित असते. आता बँकेने तरीही ही मुदलातील रक्कम कमी केली तर कसे वाटेल आणि त्याविरुद्ध दाद-तक्रार कोठे करायची ते जाणून घेऊ या. (What to do if TDS is deducted from fixed Deposit Principal amount)

यासाठी एक प्रातिनिधिक उदाहरण घेऊ या. शंतनू संन्याल यांनी त्यांची बचत स्टेट बँक इंडिया (State Bank of India) , सॉल्ट लेक शाखा, कलकत्ता येथे मुदत ठेवीमध्ये ठेवली. सर्व व्यवस्थित चालले असताना त्यांना काही महिन्यापूर्वी असे आढळून आले की व्याज उत्पन्न घटले आहे आणि बँकेने रु. २०,००० मुदत ठेवीमधून कमी केले आहेत. चौकशीअंती बँकेने सांगितले की बँकेने आधीच्या व्याजाच्या रकमेमधून पुरेसा टीडीएस (TDS) वजा न केल्याने तो आता मुद्दलाच्या रकमेमधून कमी केला आहे.

यावर संन्याल यांनी आक्षेप घेतला, की मला न कळविता बँक (Bank) परस्पर मुदत ठेवीला कसा हात घालू शकते आणि तेही माझ्या बचत खात्यामध्ये पुरेशी शिल्लक असताना. वेळेवर टीडीएस कपात करायची जबाबदारी बँकेची असताना ती पूर्ण न करणे यात माझा काय दोष?
नेहमीप्रमाणे ठराविक साचेबंद उत्तर बँकेने दिले, की हे सिस्टीममुळे झाले. संन्याल यांच्यासारख्या केसेस अजूनही असू शकतील.

कोणत्याही कारणास्तव बँकेने टीडीएस त्रैमासिक वजा न करता वर्षाच्या शेवटी एकरकमी वजा केला तर तसे ठेवीदारास कळवायला हवे आणि रकमेत काही कमतरता असेल तर ठेवीदार ती टीडीएसची कमतरता रक्कम भरू शकतो किंवा बँकेला बचत खात्यातून वजा करण्यास सांगू शकतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये बँक टीडीएस रक्कम मुदत ठेवीच्या रकमेमधून वजा करू शकत नाही. टीडीएस ही प्राप्तिकर खात्याने सुरू केलेली एक प्रणाली आहे. ज्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो. या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

काय आहे टीडीएस
टीडीएस म्हणजे Tax Deducted at Source येथे सोर्स (source) म्हणजे उत्पन्नाचा स्रोत आणि Tax Deducted म्हणजे या स्रोतामधील करकपात. जो उत्पन्न देणारा आहे त्याने करापोटी ठराविक रक्कम कापून घ्यायची आणि कापून घेतलेली रक्कम तपशीलासह सरकारकडे कर म्हणून जमा करायची. याला म्हणतात टीडीएस (TDS).

एखादा नागरिक वा संस्था यांचे उत्पन्नाचे स्रोत वेगवेगळे असू शकतात. वेतन, कमिशन, ठेवींवरील व्याज, भाडे इत्यादी. आपण बँकेतल्या ठेवींचा विचार करू. बँक आपल्याला व्याज देते आणि ठेवीदाराचे हे उत्पन्नच असल्याने या व्याजावर सरकार कर आकारते. कर केवळ व्याजाच्या रकमेवर आकारला जातो. आपल्या मुद्दलाच्या रकमेवर कर भरावा लागत नाही. इथे व्याज हे उत्पन्न, ते देणारी बँक हा उत्पन्नाचा स्रोत. या स्रोताच्या ठिकाणीच कर कापला जातो. कराची रक्कम वगळूनच उत्पन्न आपल्या हातात येते. हीच टीडीएस प्रणाली.

बँकेकडून मिळणाऱ्या फॉर्म १६ ए किंवा त्रैमासिक व्याज सर्टिफिकेट (Quarterly interest Certificate)द्वारे ठेवीदार किती टीडीएस कापला आहे, हे तपासू शकतो. या दोन्ही फॉर्ममध्ये एकूण किती आणि कसे व्याज मिळाले हे ही नमूद केलेले असते.

प्राप्तिकर कायदा १९६१च्या कलम १९४ अ अंतर्गत सिनिअर सिटीझनसाठी (वय वर्ष ६० आणि त्यापुढे) ठेवींवरील ५०,०००/-रुपयांपर्यंतचे व्याज टीडीएसमुक्त असते. आणि इतर व्यक्तींना ४०,०००रुपयांपर्यंतचे व्याज टीडीएसमुक्त असते. तरीही बँकेने टीडीएस मुद्दलातील रकमेतून कापून घेतला तर त्याविरुद्ध दाद मागता येते. कारण मुदत ठेव हा बँक आणि ग्राहक या दोघांमधील करार आहे आणि ग्राहकांच्या संमतीशिवाय बँक परस्पर हा करार मोडू शकत नाही.

यासंबंधी तक्रार कोठे करावी?
काही ग्राहक बँकेने टीडीएस म्हणून मुदत ठेवीच्या रकमेमधून वजा केली तरी सहन करतात. तर तसे न करता बँकेच्या शाखेत, रिजनल ऑफिस आणि मुख्य कार्यालयाकडे लेखी तक्रार नोंदवावी. ३० दिवसांच्या आत तक्रार निवारण झाले नाही तर ग्राहकाने बँकिंग ओम्बुडसमन (Banking onbudsman) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करावी.

रिझर्व बँक एकीकृत लोकपाल योजना २०२१ खंड ६ अनुसार तक्रार दाखल करण्यासाठी चंदीगडमध्ये एक केंद्र (सीआरपीसी) स्थापन केले आहे. त्याचा पत्ता पुढीलप्रमाणे :
केंद्रीकृत प्राप्ती आणि प्रसंस्करण केंद्र (सीआरपीसी)
भारतीय रिझर्व्ह बँक
सेंट्रल व्हिस्टा, सेक्टर-१७,
चंदीगड-१६००१७
इमेल ः --crpc@rbi.org.in