Fruit Owner conferred Padmashree: चक्क एका फळविक्रेत्याला मिळाले पद्मश्री...जाणून घ्या कशासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चक्क एका फळविक्रेत्याला मिळाले पद्मश्री...जाणून घ्या कशासाठी}

चक्क एका फळविक्रेत्याला मिळाले पद्मश्री...जाणून घ्या कशासाठी

कदा एका विदेशी नागरिकाने संत्री विकणाऱ्याला संत्री कशी दिली, हे इंग्रजीत विचारलं. त्या फळ विक्रेत्याला इंग्रजी कळत नसल्याने त्याला सांगता आलं नाही. आपण शिकलेलो नाही याचं त्याला फार वाईट वाटलं. आणि त्यावेळी त्याने जो पण केला व त्यातून जे काम उभे केलं त्याला खरोखरीच तोड नाही. सरकारकडे एवढी यंत्रणा असून कधी कधी सरकार करू शकत नाही ते एक सामान्य माणूस करू शकतो हे मेंगळूर येथील हरेकाला हजब्बा यांनी करून दाखवलं आहे.

स्वतः शिक्षण घेऊ शकलो नाहीत, पण गावातील मुलांना तरी शिक्षण मिळावे म्हणून फळे विकून मिळालेल्या पैशांतून गावात शाळा सुरू केली. या कार्याची दखल घेऊन कर्नाटकातील हरेकाला हजब्बा यांना भारत सरकारने (Government of India) पद्मश्री देऊन सन्मानीत केले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी हरेकाला हजब्बा यांना पद्मश्री बहाल केला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात हरेकाला हजब्बा यांचे अभिनंदन केले. (Fruit seller in Karnataka awarded Padmashree)

हरेकाला हजब्बा सामान्य असूनही त्यांच्या असामान्य कार्यामुळे त्यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे. स्वतः निरक्षर असूनही शिक्षणाचे (Education महत्त्व जाणून त्यांनी स्वतःजवळ असलेल्या सर्व पैशातून मेंगळूरूजवळ शाळा सुरू केली. पद्मश्री मिळाल्यानंतर हरेकाला हजब्बा रातोरात चर्चेत आले. त्यांचे कार्य, त्याग आणि विचार याबाबत अनेकांकडून कौतुक झाले.

पैर में चप्पल नहीं,
चेहरे पर भाव नहीं,
मगर हाथ में पद्मश्री।
एक तस्वीर मन में
हजारों हिलोरें मार जाती है।

हे आहे एका भारतीयाने हरेकाला हजब्बा यांना पद्मश्री मिळाल्यानंतर केलेले ट्विट.

२०२० साठी ज्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यात अनेक सामान्य पण असामान्य काम करणारे आहेत. त्यातीलच एक हरेकाला हजब्बा. शाळा उभारणीसारख्या महत्त्वाच्या कामासाठी हरेकाला हजब्बा यांना जो संघर्ष करावा लागला त्याचे अनेकांनी तोंडभरून कौतुक केले.

व्यवसायाने फळविक्रेता असलेले हरेकाला हजब्बा यांनी जे केले आहे, ते पहाता राज्य सरकार व काही संघटनांनाही ते शक्य होईल की नाही याची शंका वाटते. आपल्या छोट्याशा फळविक्रीच्या दुकानातून जी कमाई होत होती त्याद्वारे त्यांनी गावातील मुलांसाठी प्राथमिक व माध्यमिक शाळा उभारली.

बंगळूरूपासून ३५० किलोमीटर दूर न्यू पडपू गावात रस्ते व्यवस्थित नाहीत व सगळीकडे चिखल आहे. पण शाळेत जाण्यासाठी तब्बल १३० मुलांना त्याची अडचण अजिबात जाणवत नाही. एवढ्या उत्साहात ते शाळेत जातात. २००० पर्यंत या गावात एकही शाळा नव्हती. पण दर दिवशी फक्त १५० रुपये कमावणाऱ्या हरेकाला हजब्बा यांनी जमा केलेल्या सगळ्या पैशांतून शाळा उभारली. आता या शाळेला दक्षिण कन्नड जिल्हा जिल्हा पंचायत हायस्कूल नावाने ओळखले जाते.

हरेकला हजब्बा कर्नाटकातील मेंगळूर शहरातील एक संत्री विक्रेता आहेत. आता त्याचं वय ६५ आहे. गावांत शाळा नसल्याने ते शिकू शकले नाहीत. पण शिक्षणप्रती ज्या समर्पण भावनेने त्यांनी कार्य केले ते शिक्षित व सुशिक्षीतांसाठी प्रेरणादायी आहे. गावात शाळा उभारायची हे स्वप्न उराशी बाळगून ते १९९५ पासून झपाटल्यासारखे कामाला लागले. शाळेसाठी जमीन व परवानगी मिळविण्यासाठी त्यांनी कसलीच कसर सोडली नाही.

पण स्वप्न साकार होईल असे त्यांना वाटत नव्हते. त्यांचे स्वप्न तेव्हा साकार झाले जेव्हा १९९९ मध्ये दक्षिण कन्नड जिल्हा पंचायतीने शाळेला मंजुरी दिली. सुरुवातीला ही शाळा दक्षिण कन्नड जिल्हा पंचायत कनिष्ठ प्राथमिक शाळा ‘हजब्बा आवारा शेल’ (हजब्बा का स्कूल) नावाने लोकप्रिय होते. सध्या या शाळेत १७५ विद्यर्थी शिक्षण घेत आहेत.

स्वतः अशिक्षित असूनही समाजात ज्ञानज्योत पेटविण्याचे महान कार्य हरेकला हजब्बा हे करत आहेत. ‘अक्षरा सांता’ (अक्षरांचे संत) या नावाने परिचित हरेकला हजब्बा यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. मागील ३० वर्षे ते संत्री विकतात. त्यातून एक एक पैशाची बचत करून त्यांनी गावात मुलांसाठी शाळा उभारली. आता एक महाविद्यालय उभारण्याचे त्यांचे स्नप्न आहे. पहाण्यासाठी एक चांगलं घरही नसताना हरेकला हजब्बा यांनी सर्व कमाई शाळेसाठी खर्च केली.

ते स्वतः कधीच शाळेत गेले नाहीत, पण गावातील मुलं शिक्षित व्हावीत व प्रत्येक घरात शिक्षणाचा दिवा पेटू दे, ही त्यांची इच्छा होती. २००० पर्यंत त्यांच्या गावात शाळा नव्हती. त्यानंतर गावात एक शाळा उभारण्याचा निश्‍चय त्यांनी केला. दिवसाला फक्त १५० रुपये कमावणाऱ्या हरेकला हजब्बा यांनी सगळी कमाई शाळेसाठी ठेवली. सुरुवातीला एका मशिदीत शाळेची सुरुवात झाली. त्यानंतर सगळ हळूहळू बदलत गेलं.

हरेकला हजब्बा यांनी एक अनुभव सांगितला. ‘‘एकदा एका विदेशी नागरिकाने मला संत्र्याची किंमत किती असे इंग्रजीत विचारले. पण इंग्रजी येत नसल्याने संत्र्याची किंमत सांगू शकलो नाही. त्यामुळे पहिल्यांदाच स्वतःला असहाय्य वाटू लागलं. याचवेळी गावात शाळा उभारण्याचा निश्‍चय केला. कारण माझ्यासारखी परिस्थिती गावातील मुलांवर येऊ नये.’’

तेव्हा पासून हरेकला हजब्बा यांनी मागे पाहिले नाही. जेवढे पैसे होते त्यातून अका मशिदीत पाठशाला सुरू केली. पण जशी जशी मुलांची संख्या वाढत गेली तशी जागा कमी पडू लागली. त्यामुळे स्थनिकांच्या मदतीने गावात दक्षिण कन्नड जिल्हा पंचायत उच्च प्रथमिक शाळेची स्थापना केली.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :presidentPadmashree
go to top