तुमचा पाल्य तुमचे ऐकत नाही, काय करावे? | Parent- Child Relationship | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुमचा पाल्य तुमचे ऐकत नाही, काय करावे?}

तुमचा पाल्य तुमचे ऐकत नाही, काय करावे?

‘‘काय करू माझा मुलगा माझे अजिबातच ऐकत नाही...’’, ‘‘काय करू नेहाला अनेकदा सांगितले तरी तिचे पहिले पाढे पंचावन्नच...’’, ‘‘वैताग आलाय, नोकरी करू की मुलांकडे लक्ष देऊ काही समजत नाही..’’, ‘‘कितीही लाड करा मुलगा त्याच्या पद्धतीने वागतो....’’ या व अशा प्रकारचे संवाद आता घरोघरी ऐकायला मिळतात. ‘टु मिनिट’च्या जमान्यात सर्वांना सर्व गोष्टी अगदी कमी वेळेत पाहिजे असतात. सारासार विचार, सहनशक्ती, एकमेकांना समजून घेणे हे प्रकार दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यातून पालकांबरोबर पाल्यासमोरही अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत...पालकांनो काही गोष्टींसाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

पुढीत गोष्टी पालकांनी समजून घेतल्या पाहिजेत.

किस्सा १

लॉकडाउन सुरू झाल्याबरोबर दोन वर्षाच्या निमिषाने एका प्रश्नाने तिच्या आईला आणि आजीला हसू आवरता आवरता नाकीनऊ आले. निमिषाने एका सकाळी विचारले, आई आपल्या घरात दोन दिवसांपासून वावरणारा माणूस कोण आहे, हसून झाल्यावर आईने सांगितले अगं तो तुझा बाबा आहे... यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवा परंतु अनेक कुटुंबात ही वस्तुस्थिती आहे. कारण अनेक कुटुंबातील बाप सकाळीच बाहेर पडतो ते रात्री उशिराच घरी येतो. स्पर्धा, नोकरीच्या निमित्ताने तो रॅट रेस सारखा धावत आहे. आपण त्यात नाही ना..हे तपासा..खालील प्रश्न दिले आहेत आपण त्यात नक्की बसतो का?

हे स्वतःच ताडून पहा..

१) दिवसभरात मी माझ्या मुलाना किती वेळ देतो?

२) मुलांना हवाय तेव्हा माझ्याकडे वेळ आहे का?

३) आठवड्यातून एकदा तरी कुटुंबाबरोबरएकत्र जेवणाचा आनंद घेतो का?

४) मुलांना प्राईम टाईम देतो का

५) त्यांच्या बरोबर असतानाचा वेळ कसा घालावतो.

वरील पान प्रश्न नमुन्यादाखल दिली आहेत. याची खरी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा उत्तरे शोधताना स्वतःला फसवू नका.

वरील बहुतांश प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आली असल्यास काळजी करू नका. अजूनही तुमच्या हातातील वेळ गेलेली नाही.

१) ऑफिसचे काम लवकरात लवकर हातावेगळे होण्यासाठी प्राधान्य द्या.

२) वाचलेल्या वेळेत मोबाईल, लॅपटॉप चक्क बंद ठेवून कुटुंबाला, मुलांना वेळ द्या.

३) ऑफिस आणि घर यामध्ये सुवर्णमध्य साधा. घरचे काम ऑफिसमध्ये करू नका आणि ऑफिसचे काम घरी घेऊन जाऊ नका.

४) मुलांना, घराला प्राईम टाईम देतो म्हणजे खूप काही करतो, हा अविर्भाव बाजूला ठेवा.

५) कोरोनामुळे कुटुंबाला आपली आणि आपल्याला कुटुंबाची गरज आहे, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच.

चांगला बाप होण्याच्या दृष्टिने तुमची पावले पडत आहेत..ती तशीच कायमस्वरूपी पडावी..यासाठी शुभेच्छा...

पालकत्वाच्या गाड्याला आई आणि वडील ही दोन चाके असतात. दोन्ही चाके भक्कम असली की पाल्याची गाडी सुसाट धावते नाहीतर अडखळते, धडपडते. त्यामुळे आई इतकंच वडिलांनीही जबाबदारीने पालकत्व निभावणं आवश्यक वाटत.

पालकत्वावर अनेक माहिती आणि लेख वाचायला मिळतात. आपण एक वेगळी गम्मत घेऊन आलोय. चांगले आई-बाबा होण्यासाठी आपण एक चॅलेंज घेणार आहोत. हे आठवड्याला एक चॅलेंज दिलं जाईल. ते पूर्ण करून आपण सेल्फ ॲसेसमेंट (self assessment)करून स्वतःच्या क्षमता पडताळून पाहायच्या आहेत.

समज-गैरसमज : आई-वडिलांबाबत सतत एक तक्रार केली जाते की ते त्यांच्या अपेक्षांचं ओझं मुलांवर लादत असतात. मुलांशी सतत स्वतःशी, स्वतःच्या भूतकाळाशी तुलना करतात. चला तर मग हा समज मोडून काढूयात

घेऊयात चॅलेंज :

१) आपल्याला रोज मुलांशी १५ मिनिटं बोलायचं आहे

२) दररोज त्यांच्या आणि आपल्या (तत्कालीन) जगण्यातला फरक काय, यावर एक नोंद करायची आहे

३) सात दिवसाच्या सात नोंदी होतील

४) शेवटच्या दिवशी सातही नोंदी वाचून नेमकं काय बदललंय याची नोंद करायची आहे

५) बदलल्या काळात आपण आज आपल्या मुलाच्या जागी असतो तर काय केलं किना करू शकलो असतो? हे नोंदवा

६) आपल्या परिस्थितीत आपली मूळ असती तर ती कशी वागली असती हे अजमावून बघा.

नक्की करा :

आठवडाभर हे टास्क करायचे आहेत. रोजच्या नोंदी लिहून काढायच्या आहेत. आणि आठवड्याच्या शेवटी स्वतःला गुण द्यायचे आहेत.

अशी द्या स्वतःला गुण :

१) आठवडाभर टास्क रोज पूर्ण केला - ७/७

२) काळानुसार बदल झालाय

- असं तुम्हाला वाटतंय ३/३

- थोडा बदल झालाय २/३

- काहीच बदल झाला नाही - १/३

३) मुलाच्या आहे त्या परिस्थितीत तुम्ही असता तर

- तुम्ही त्यापेक्षा उत्तम काम केलं असतं ५/१

- तो/ती आहे तसेच तुम्ही असता ३/५

- तुमचा मुलगा तुमच्यापेक्षा चांगलं करतोय असं तुम्हाला वाटत ५/५

४) दररोज मुलांशी सलग १५ मिनिटे बोलता आलं? (स्वतःला ५ पैकी गुण द्या)

किस्सा २ :

‘आई, माझा डबा भरलास का? आज दोन डबे दे, कॉलेज सुटल्यावर थेट क्रिकेटचा सराव करायला जाणार आहे...’ बाथरूममध्ये शिरता-शिरता लेकीनं दिलेला आदेश...

‘अगं, आज मला ऑफिसला लवकर जायचं आहे, माझाही डबा भरून ठेव...’ वर्तमानपत्र वाचणं बंद करत ‘अहों’नी सोडलेल्या ऑर्डरवर ‘अहो, तुमचा आणि तुमच्या लाडलीचा डबा भरून झाला आहे. आता तो बॅगमध्ये तुम्ही ठेवणार की मी ठेवू,’ असा लाडिक दम...

सकाळी सकाळी प्रत्येक घरातच असे संवाद सुरू असतात आणि त्यामध्ये मुख्य भूमिकेत असते अर्थातच घरातील गृहिणी....

अहोंचा पेपर वाचून होईपर्यंत ‘सौं’चा स्वयंपाक झालेला असतो. मग घरातील केर काढताना दिवसभरातील कामांचा वेगवान आढावा घेणं सुरू असतं आणि दुसरीकडं स्वतःच्या ऑफिसला जायच्या तयारीवर शेवटचा हात फिरवला जातो. (ही तयारी तिला स्वत:लाच करावी लागते, त्यासाठी कोणाची मदत नसते.)

खरोखरच महिलांची ही तारेवरची कसरत रोज सुरू असते. आपण घरातील आधारस्तंभ असल्याने सर्व कामे आपलीच आहेत, या मानसिकतेत महिला वावरत असतात. यावर विचार केल्यास ते योग्यही असल्याचं लक्षात येतं.

१) निसर्गतः महिलांना अष्टावधानाची देणगी लाभलेली असते. स्वयंपाक करताना हे सहजतेने लक्षात येते. एका बाजूला पोळ्या करणे सुरू असताना दुसऱ्या बाजूला भाजी फोडणीला दिलेली असते, तर तिसऱ्या बाजूला जेवणाच्या डब्यांची जुळवाजुळव सुरू असते.

२) यासर्व धांदलीत घराकडं मात्र कुठंही दुर्लक्ष नसते. ऑफिसमधून येताना उद्यासाठी काय भाजी घ्यायची, याचं नियोजन सकाळी ऑफिसमध्ये निघतानाच झालेलं असतं, तर घरातील किराणा किती दिवसांनी भरायचा हे निश्‍चित करण्याचं कामही सुरू असतं.

३) हा सुपर वुमनचा फॉर्म्युला नाही किंवा काही अपवाद सोडल्यास महिलांना सुपर वुमन होण्यात गृहिणीला कोणताही रस नसतो. रस असतो ते आपले घराचे घरपण टिकविण्यात. ऑफिसहून घरी आल्यावर पुन्हा याच चक्रात ती पुन्हा स्वत:ला फिट बसविते, उद्याचा दिवस चांगला जाण्यासाठी....

पालकत्वाकडं तितकंच गांर्भीयाने पाहणाऱ्या महिलांच्या विविध कौशल्यावर बोललं जातं. परंतु ते प्रत्यक्षात उतरते का?

किस्सा ३

‘‘जयदीप, अरे सणासुदीचे दिवस आणि तू एवढा का अपसेट झाला आहेस? अरे, रजेचा प्रॉब्लेम असेल तर मोकळेपणाने सांग. आपण काहीतरी मार्ग काढू,’’ नरेंद्र समजावणीच्या सुरात बोलत होता. जयदीपनं मात्र काही उत्तर न देता मौन बाळगणं पसंत केलं होतं. कदाचित आता मूड नसल्यानं थोड्या वेळानं बोलू असा विचार करू नरेंद्र आपल्या कामात गर्क झाला. गेल्या तीन-चार महिन्यांपासून तो जयदीपचं निरीक्षण करत होता. नेहमी उत्साहानं बोलणारा; मुलगा अद्वैतबाबत कायम काहीतरी सांगणारा जयदीप आता घराबद्दल- विशेषतः अद्वैतबाबत फारसा बोलत नाही, हे त्याच्या लक्षात आलं होतं. सायंकाळी एकदा पुन्हा बोलू असं त्यानं ठरवलं. त्यानुसार ऑफिस सुटण्यापूर्वी नरेंद्रनं जयदीपला गाठलं. खरंतर जयदीपला खूप बोलायचं होतं. परंतु कोणाशी आणि किती बोलावं, याबाबत संभ्रमावस्था होती. ठरल्याप्रमाणं नरेंद्रनं विषय छेडला. त्यावर सुरुवातीला शांत असलेला प्रदीप बोलता झाला. तो म्हणाला, ‘‘अरे, गेल्या काही महिन्यांपासून अद्वैतच्या वागण्याबोलण्यात खूप फरक पडला आहे. मला असं वाटलं, की लॉकडाऊनमुळं घरात बसून तो वैतागला असेल. मात्र, तसं जाणवत नाही. घरात प्रचंड चिडचिड करतो, छोट्या-छोट्या गोष्टींवरून एकदम रागराग करतो. आता तो विशीला आला आहे, कसं समजावून सांगायचं हा प्रश्नच आहे.’’


काय प्रॉब्लेम आहे, हे नरेंद्रच्या लक्षात आलं. तो म्हणाला, ‘‘काळजी करू नकोस. जयदीप तू खूप शिस्तीत वाढलास. त्यामुळे अद्वैतही तसाच वागावा, असं तुला वाटणं स्वाभाविक आहे. मी काही गोष्टी तुला सांगतो. त्या फॉलो कर. मला खात्री आहे, की तुझ्यात आणि अद्वैतमध्ये नक्कीच बदल दिसतील.


१. मुळात आपलं वर्तन चांगलं ठेवणं, आपण मुलांसाठी रोल मॉडेल बनणं महत्त्वाचं आहे. लहानपणापासून मुलांना घरात प्रेम, विश्वास आणि शिस्त यांचा योग्य समन्वय अनुभवायला मिळावा.
२. घरातील व्यक्तींचं वर्तन व्यवस्थित असूनही बाहेरील प्रभावांमुळे मुलांचं वर्तन बदलू शकतं. मुलांशी नातं इतकं विश्वासाचं हवं, की त्यांनं आपल्याशी मोकळेपणानं त्यांचे प्रॉब्लेम्स बोलावेत. त्या दृष्टीनं तू अद्वैतशी संवाद साधावास.
३. मुलांसमोर कुठल्याही प्रकारचे वादविवाद, भांडणं टाळावीत. पालकांमधले मतभेद त्यांनी स्वतंत्रपणे व्यक्त करावेत.
४. अद्वैत बाहेर काय करतो, त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांच्या सवयी याची त्यांच्या नकळत चौकशी करावी.
५. त्याला दिले जाणारे पैसे अवाजवी नाहीत आणि त्याचा योग्य विनियोग होतोय याकडे लक्ष द्यावं. याचा अर्थ ‘पोलिसिंग’ करावं असा नाही किंवा पैसे देऊच नयेत असाही नाही.
६. इंटरनेटचा सुयोग्य वापर करतोय ना, हे एकदा तपास.
७. त्याची नकारार्थी एनर्जी भरपूर व्यायाम आणि कला याद्वारे चॅनेलाईज होईल याकडे लक्ष ठेव.
८. त्याच्याशी मैत्री कर. आपल्या सहवासात त्यांना सुरक्षित वाटेल असा प्रयत्न कर. त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घे. आपलं म्हणणं ऐकलं जातंय याचा विश्वास त्याला वाटू दे.
नरेंद्रशी बोलण्यामुळं प्रदीपला जरा हायसं वाटलं. ‘‘मित्रा आभार मानून तुझा विश्वास कमी होऊ देणार नाही,’’ असं सांगत जयदीप नव्या उमेदीनं घरी निघाला.

वरील सर्व किस्स्यांचा बारकाईने विचार करा. आपल्या घरात असे काही घडते का, याचीही चाचपणी करा. प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या अनुभवातून शिकण्यापेक्षा काही अनुभव स्वतः घेणेही महत्त्वाचे आणि आयुष्याला दिशा देणारे असतात.