esakal | Alzheimer Disease : ‘विस्मरणा’कडे नको दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

‘विस्मरणा’कडे नको दुर्लक्ष}

‘जागतिक विस्मरण दिवस’ नुकताच पार पडला. त्यानिमित्त सप्टेंबरमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम जगभरात आयोजित केले जातात. भारतात या विषयाची जागरूकता वाढविण्याची गरज आहे.

‘विस्मरणा’कडे नको दुर्लक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘विस्मरण’ हा उतारवयात जडणाऱ्या आजारांपैंकी एक महत्त्वाचा आजार. ‘वयोमानानुसार विसरायला होतच,’ हे पठडीतील वाक्य या आजाराच्या शास्त्रीय माहितीपासून आपल्याला दूर ठेवते. उतारवयात ‘विस्मृती’, ‘विस्मरण’, ‘स्मृतिभ्रंश’ होणारच... हे आपण गृहीत धरून चालतो. साहजिकच या अवस्थेतून जाणाऱ्या ज्येष्ठांना समजून घेणे, त्यांना सुरक्षित वातावरण देणे, मानसिक स्तरावर गुंतवून ठेवणे, एकटे न पडू देणे इत्यादी गोष्टींची काळजी घेणे आवश्यक ठरते. भारतात साठीच्या पुढील नागरिकांमध्ये ‘विस्मरण’ या आजाराचे सुमारे ५३ लाख रुग्ण असल्याचे ‘अल्झायमर्स ॲन्ड रिलेटेड डिसऑर्डर सोसायटी ऑफ इंडिया’ या संघटनेचे म्हणणे आहे.

‘अल्झायमर’ आणि ‘डिमेन्शिया’ या दोन्ही आजारांमध्ये सूक्ष्म फरक आहे. ‘डिमेन्शिया’ होण्यामागील विविध कारणांपैकी ‘अल्झायमर’ हे एक महत्त्वाचे कारण आहे. म्हणूनच जवळपास साठ-सत्तर टक्के रुग्णांमध्ये ‘अल्झायमर-डिमेन्शिया’चे निदान होत असल्याचे दिसून येते. मेंदूच्या कार्याशी संबंधित या विस्मरणाच्या आजाराचे ढोबळमानाने तीन टप्पे दिसतात.

पहिला टप्पा : वस्तू कुठे ठेवल्या आहेत, कोणाचे निरोप देणे, फोन बिल, वीज बिल भरण्याच्या तारखा विसरणे, नवीन गोष्टी शिकण्याचे धाडस न होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. सहजपणे ती लक्षात येत नाहीत. या अवस्थेला अति-सौम्य टप्पा म्हणतात.

हेही वाचा: श्रीलंका अर्थसंकटात?

दुसरा टप्पा : हा टप्पा सौम्य असतो. या अवस्थेत व्यक्तीला आपण सकाळी काय जेवलो? काल आपल्याला कोण भेटून गेले? गोळ्या घेतल्या, की न घेतल्या, हे न आठवणे, सामाजिक उपक्रमांत, सण-समारंभात कमी उपस्थित राहणे, घरी परत येताना रस्ता चुकणे आदी लक्षणे दिसतात. या टप्प्यांमध्ये व्यक्ती मानसिक पातळीवर गोंधळलेली दिसून येते. आपल्या बाबतीत हे असे का घडते आहे? म्हणून तिची चिडचिड सुरू होते. या अवस्थेत व्यक्तीला बरेचदा बँकेचे व्यवहार वा आर्थिक व्यवहारासाठी कुटुंबीयांवर अवलंबून राहावे लागते.

तिसरा टप्पा : हा पहिल्या दोन टप्प्यांपेक्षा गंभीर असतो. त्याला तीव्र अवस्था म्हणतात. या टप्प्यांमध्ये व्यक्ती अगदी आपल्या गल्लीत, कॉलनीत, परिसरात- गावात हरवते. तिला आपल्या घराचा पत्ता, परिचितांचा फोन नंबर सांगता येत नाही. बालपणीच्या, तरुणपणीच्या ज्या घट्ट स्मृती असतात त्यादेखील व्यक्ती विसरू लागते. त्याच त्या गोष्टींची पुनरावृत्ती त्यांच्याकडून होत राहते. याच टप्प्यातील अतितीव्र अवस्थेत मल-मूत्र विसर्जनावरील नियंत्रण सुटणे, आभास होणे, दिवस-रात्रीचे, वेळ-तारखांचे भान न राहणे, शारीरिक हालचाली अतिशय मर्यादित होणे, स्नायूंवरील पकड जाणे, अन्न गिळता न येणे, संवाद साधता न येणे, बोलणे कमी-कमी होत जाऊन पूर्णत: बंद होणे इत्यादी लक्षणे दिसतात.

‘अल्झायमर’ला वाढणारा आजार (प्रोग्रेसिव्ह डिसीज) म्हटले जाते. पूर्णपणे तो बरा होत नसला तरी आजाराचा वेग कमी करता येतो. योग्य काळजी व औषधोपचारांमार्फंत हे साध्य होते. आजार पहिल्या वा दुसऱ्या टप्प्यांत लवकरात लवकर ओळखून त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. पहिल्या वा दुसऱ्या टप्प्यांत आजार लक्षात आल्यास, मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी किंवा तिचे अधिकाधिक विघटन रोखण्यासाठी मेंदूला चालना देणाऱ्या गोष्टी व्यक्तीला करावयास दिल्या पाहिजेत. शब्दकोडी सोडवणे, पुस्तके वाचून त्याचा सारांश लिहिणे,

हेही वाचा: चीन-भारतातील ‘द लाँग गेम’

घरातील वेगवेगळ्या फाइल नियमितपणे व्यवस्थितरित्या लावणे, अनेक कुलपे आणि त्याच्या चाव्या यांचा मेळ घालणे इत्यादी बौद्धिक कामात व्यक्तीला गुंतवता येईल. कौटुंबिक सोहळे, सण-समारंभ, लग्नकार्य आदी उपक्रमांतून व्यक्तीला भावनिक-मानसिकरीत्या आनंदी ठेवणेही महत्त्वाचे असते. त्यांच्याजवळ नेहेमी त्यांचा सविस्तर पत्ता ठेवावा. या रुग्णांची जबाबदारी घरातील इतरांनी आलटून पालटून घ्यावी. घरातल्या महिलेवर आधीच ताण असतो. तिच्यावर हाही भार पडला तर तो असह्य होऊ शकतो. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांतील रुग्णांनी नियमीत, संतुलित आहार, विहार, हलका व्यायाम, योग, प्राणायम, छंद-आवडीची जोपासना, वाचन, मित्र-नातेवाइकांचा संपर्क आदी गोष्टींमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवावे. कुटुंबीयांनी त्यांना समजून घेऊन, त्यांना मदत करावी.

‘अल्झायमर’ या आजाराचा अलॉइस अल्झायमर हया जर्मन डॉक्टरद्वारा शोध लावून आता जवळपास सव्वाशे वर्षे होत आहेत. तरीही आपल्याकडे या आजाराबाबत लोकांना फारशी माहिती नाही. व्यापक जनजागृती, लवकर निदान आणि उपचार, कुटुंबीयांचे प्रेम आणि काळजी या गोष्टी ज्येष्ठ वयातील ‘विस्मरण’ निश्चितपणे अधिक चांगल्या रीतीने हाताळण्यास साहाय्यक ठरतील.

- डॉ. स्वाती अमराळे-जाधव

(लेखिका सामाजिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांच्या अभ्यासक आहेत)

go to top