esakal | शतक पाहिलेली लस!
sakal

बोलून बातमी शोधा

शतक पाहिलेली लस!}

क्षयरोगावर मात करण्यासाठी बनवलेल्या बीसीजी लशीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोनाची महासाथ रोखण्यासाठी ती उपयुक्त ठरेल, असा आशेचा किरण आहे. या लशीची जन्मकथा.

शतक पाहिलेली लस!

sakal_logo
By
राहुल गोखले saptrang@esakal.com

कोरोना प्रतिबंधक लस विक्रमी वेळात विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. जगाच्या लोकसंख्येचा अफाट विस्तार पाहता संशोधक कोरोनाचा प्रतिबंध व्हावा यासाठी अन्य पूरक पर्यायांचाही विचार सुरू आहे. त्यातीलच संभाव्य पर्याय म्हणजे बीसीजीची लस. यामागील तर्क असा की, बीसीजीची लस ही क्षयरोग होऊ नये म्हणून दिली जाते. या रोगाचेही लक्ष्य कोरोनाच्या विषाणूप्रमाणे प्रामुख्याने फुफ्फुस हेच असते. तेव्हा बीसीजीच्या लशीचा कोरोना प्रतिबंधात काही लाभ होईल का, याविषयी अनेक प्रयोग झाले आहेत. अर्थात, कोरोनाचे घातक परिणाम कमी करण्यासाठी पूरक लस म्हणून बीसीजीचा उपयोग होईल, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. तरीही कोरोना प्रतिबंधासाठी या लशीचा उपयोग किती होईल, याचे ठोस निष्कर्ष नाहीत. अर्थात, बीसीजी लस पुन्हा चर्चेत येण्याचे दुसरे कारण म्हणजे या लशीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

क्षयरोग हा अत्यंत घातक रोग नेमका कशामुळे होतो, याचा शोध आपण लावला आहे, असे रॉबर्ट कॉश यांनी १८८२ मध्ये बर्लिन फिजियॉलॉजिकल सोसायटीला कळविले. मायकोबॅक्टेरियम वर्गातील जिवाणूंमुळे तो होतो, असे विशद करणारे शोधनिबंधही कॉश यांनी त्यानंतर लिहिले. कारण सापडल्यामुळे त्यावरील उपाय शोधण्याचाही प्रयत्न त्यांनी चालवला आणि क्षयरोगाला कारणीभूत जिवाणूंपासून मिळविलेला ट्युबरक्युलीन हा पदार्थ रामबाण उपाय ठरेल, अशी ग्वाही १८९०च्या सुमारास कॉश यांनी दिली. मात्र तो द्रवपदार्थ कुचकामी आणि काही प्रमाणात घातकही ठरला. साहजिकच क्षयरोगावर इलाज मिळाला म्हणून जी आशा निर्माण झाली होती, तिची जागा भ्रमनिराशाने घेतली. त्यानंतर कॉश हे मलेरिया, प्लेग इत्यादीच्या संशोधनाकडे वळले. त्यांना १९०५चे वैद्यकशास्त्रातील नोबेल मिळाले. १९१० मध्ये त्यांचे निधन झाले, तरीही लशीची निकड आणि असोशी कायम होती.

हेही वाचा: मेस्सी-बार्सिलोना; दोघांत तिसरा जुनं सगळं विसरा!

अखेर लस मिळाली

ही लस विकसित करण्याचे श्रेय ॲल्बर्ट काल्‍मेट आणि कॅमिल गारेन यांच्याकडे जाते. काल्‍मेट फ्रेंच डॉक्टर आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ; तर गारेन पशुवैद्यक आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होता. काल्‍मेट देवी आणि रेबीजवरील लशींच्या उत्पादनात सहभागी होता. त्यामुळेच कदाचित क्षयरोगाच्या प्रादुर्भावाला मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस जिवाणू कारणीभूत असल्याचे कॉश यांनी जाहीर केल्यावर काल्‍मेटला त्या विषयात रस निर्माण झाला असावा. गारेनने प्राण्यांमध्ये मायकोबॅक्टेरियम बोव्हाईन हा जिवाणू या रोगापासून बचाव करतो असे निरीक्षण १९०५ मध्ये नोंदविले होते. मग तो आणि काल्‍मेट यांनी एकत्रितरीत्या संशोधन सुरू केले. त्यांचा भर मुख्यतः या जिवाणूंची घातकशक्ती क्षीण करून लस विकसित करण्यावर होता.

यासाठी या जिवाणूंचे ‘सबकल्चर’ आवश्यक होते. त्याकरिता या संशोधकांनी बटाटा आणि ग्लिसरीन यांना माध्यम वापरले. मात्र त्यातून या जिवाणूंचा एकजिनसीपणा साध्य होत नव्हता; तेेव्हा ख्रिश्चियन अँडव्होर्ड या नॉर्वेजियन संशोधकाने त्यांना प्राण्यांच्या यकृतातून मिळणाऱ्या एका पदार्थाचा (बाईल) वापर करण्याचे सुचविले आणि बैलांच्या शरीरातील तो पदार्थ वापरल्यावर यश आले. अर्थात, सबकल्चर करणे क्लिष्ट होते. दर तीन आठवड्यांनी तो प्रयोग पुढच्या टप्प्यात जाई.

हेही वाचा: स्कॅन क्यूआर कोड, फसवणुकीचा नवा ‘मोड’

वरदायी सबकल्चर

जिवाणूंची घातकता कमी करण्यासाठी सबकल्चरची मालिका गरजेची होती. अखेरीस १९१३ मध्ये म्हणजे तब्बल पाच वर्षांनी गोवंशावर लशीचे प्रयोग करण्यास ते सिद्ध झाले. त्याच वेळी महायुद्धाचे ढग घोंगावत होते, प्रयोगांत खंड पडला. मात्र प्रयोगशाळेतील प्रयोग पुढे सुरू राहिले. युद्धामुळे बटाट्यांच्या वाढलेल्या किंमती आणि खाटीकखान्यातून बैलांच्या यकृतातील पदार्थ सहज न मिळणे हे अडसर होते. तरीही त्यातून मार्ग काढीत प्रयोग सुरू राहिले. अखेरीस १९१९ मध्ये युद्धाला विराम मिळाला. तोवर या दुकलीने २३० सबकल्चर केले. अकरा वर्षांची ती अथक मेहनत होती. त्यांच्या हातात असा जिवाणू होता जो प्रतिकारशक्ती निर्माण करू शकेल, पण रोग पसरवू शकणार नाही. तेव्हा गिनीपिग, घोडे, ससा अशांवर झालेले प्रयोग यशस्वी ठरले. या लशीचे नामकरण गरजेचे होते. तेव्हा बॅसिली (जिवाणू), काल्‍मेट आणि गारेन यांच्या अद्याक्षरांवरून ‘बीसीजी’ हे नाव दिले. काल्मेट यांचे क्षयरोगावरील संशोधनाचे प्रकाशन १९२० मध्ये झाले. १९२१ मध्ये त्यांना खात्री पटली की या लशीच्या मानवी प्रयोगाची वेळ आली आहे. पॅरिसमधील गरोदर पण क्षयरोगग्रस्त महिलेचा अपत्याला जन्म दिल्यानंतर काही तासांतच मृत्यू झाला होता. त्या लहानग्याला ही लस १८ जुलै १९२१ रोजी दिली- याचाच अर्थ शंभर वर्षांपूर्वी. लस तोंडावाटे दिली, कारण क्षयरोगास कारणीभूत जिवाणूंचा प्रादुर्भाव सामान्यतः अन्ननलिकेवाटे होतो, अशी काल्‍मेट यांची धारणा होती. लस दिल्यावर बाळावर कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. त्यानंतर ही लस काही बाळांना त्वचेखाली टोचली. मात्र पालकांचा विरोध लक्षात घेता लस तोंडावाटेच देण्याची पद्धत काही काळ कायम राहिली. पाश्चर इन्स्टिट्यूटने मग या लशीचे उत्पादन सुरू केले. पुढच्या चारेक वर्षांत सव्वा लाख बालकांना लस दिली.

हेही वाचा: मुंबई हायकोर्टात ब्रिटिश अन्यायाची प्रतीके

बीसीजी लशीचा वापर विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जगभर होऊ लागला, याचे कारण लशीचे दुष्परिणाम नव्हते आणि लाभ मात्र होत होता. जगभर लसीसाठी वापरण्यात येणारे ‘स्ट्रेन’ आणि मूळचा ‘स्ट्रेन’ यांमधील फरक, त्यांचा परिणाम यांचाही अभ्यास झाला, त्यात भारतही सहभागी होता. १९२७पासून ही लस इंजेक्शन स्वरूपात देण्यासही मान्यता मिळाली. आजवर जगभरात कोट्यवधी बालकांनी ही लस घेतली आहे. तिची परिणामकारकता अनेक वर्षे टिकते. कोरोनाला रोखण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी बीसीजी लसीचा आधार वाटावा, यातच या शंभरातील तिचे माहात्म्य दडलेले आहे.

go to top