तुम्ही अँटिबायोटिक्स घेताय? मग हे वाचाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्ही अँटिबायोटिक्स घेताय? मग हे वाचाच}
तुम्ही अँटिबायोटिक्स घेताय? मग हे वाचाच

तुम्ही अँटिबायोटिक्स घेताय? मग हे वाचाच

तुम्हाला सर्दी-खोकला सारखा साधा आजार झाल्यानंतर तुम्ही थेट मेडिकल शॉपमध्ये जाऊन अँटिबायोटिक्स घेता का? की, आधी डॉक्टरांकडे जाता. ते तुम्हाला तपासतात आणि नंतर त्यांनी दिलेली औषधे तुम्ही घेता. यापैकी कोणती पद्धत तुम्ही अवलंबता? आतापर्यंत तुम्ही काय केलं त्याबरोबरच आता पुढे तुम्ही काय केलं पाहिजे, हे जास्त महत्त्वांच ठरतं. त्यासाठी अँटिबायोटिक्स रेझिस्टन्स समजून घ्यावा लागेल.

हेही वाचा: पार्सलमुळे कोरोनाला आळा मात्र, पर्यावरणीय धोका वाढला

अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी १९२८ साली सर्वप्रथम प्रतिजैविकाचा (अँटिबायोटिक्स) म्हणजेच पेनिसिलीनचा महत्वाचा शोध लावला. ही वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीकारी शोध ठरला. त्यातून वैद्यकक्षेत्राला कलाटणी मिळाली. त्या वेळेपासून अँटिबायोटिक्सचा वापर सुरू झाला. आता आपण म्हणजे विशेषतः भारतात सर्रास अँटिबायोटिक्सचा बेसुमार वापर सुरू झालाय.

चुकीची जीवनशैली, व्यवसनाधीनता, अयोग्य आहार, दिवस-रात्र होणारे प्रदूषण या आणि अशा सर्वांचा परिणाम शरीराच्या नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमतेवर होते. त्यातून ही रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. अशा वेळी आपण अँटिबायोटिक्सचे प्रमाण वाढवत जातो. आता तर अँटिबायोटिक्स अनर्बिंध वापर सुरू झालाय. त्याचा सर्वांत मोठा धोका म्हणजे ‘अँटीबायोतटीक्स रेझिस्टन्स.’

हेही वाचा: नोबेल पुरस्कारांची अशी झाली सुरुवात...!

अँटिबायोटिक्स बेबंद वापरामुळं रोगजंतू या औषधांना दाद देत नाहीत. त्यामुळे आता "अँटिबायोटिक-रेझिस्टन्स' हे वैद्यकीय जगापुढचे सर्वांत मोठे आव्हान ठरत आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) घेतली आहे. ‘अँटिबायोटिक्स रेझिस्टन्स’ हे जगापुढील पहिल्या दहा डोकेदुखीपैकी एक ठरले आहे.

जगात १९२८ पूर्वी आपण आजारी पडणारच नाही, अशी जीवनशैली आपल्या पूर्वजांची होती. पण, त्यातूनही माणसांना रोगजंतूंचा संसर्ग होतच होता. अगदी गेल्या शतकाच्या जगभराच्या इतिहासात आपल्याला हेच दिसते. त्यातूनच जगातील अनेक थोरा-मोठ्यांचा मृत्यू वेगवेगळ्या आजाराने झाल्याचे इतिहासातून समजते. वेगवेगळ्या रोगांच्या जंतूनी मानवावर सातत्याने आक्रमण केले आहे. त्यांच्यापासून नैसर्गिक संरक्षण करायचे म्हणजे, नियमित व्यायाम, चौरस आहार, पुरेशी विश्रांती हीच त्रिसूत्री ठरते.

औद्योगिक क्रांती झाली. त्यातून समाज प्रगत होत गेला. जगातील इतर खंडांच्या तुलनेत युरोपात आर्थिक सुबत्ता आली. त्याच वेळी वैद्यकशास्त्राने विकासाची कास धरली. कोणत्या जंतूंपासून कोणता रोग होतो. त्यावर कोणते औषध प्रभावी ठरते, या संशोधनाची एक साखळीच तयार झाली. वेगवेगळी औषध तयार करण्याचा ध्यास शास्त्रज्ञांनी घेतला. त्यातून पेनिसिलनच्या रुपाने प्रतिजैविक माणसाला मिळाले.

हेही वाचा: कोरोना काळात वितळले आइस्क्रीम; पी.व्ही. सिंधूमुळे व्यवसायाला मिळाले बळ

पेनिसिनलच्या शोधानंतर वेगवेगळ्या रोगावरील वेगवेगळी अँटिबायोटिक्स विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. विशेषतः युरोवातील प्रयोगशाळा अँटिबायोटिक्सच्या शोधात गढून गेल्या. त्याचा परिणाम असा झाला की, पेनिसिलननंतर एका पाठोपाठ एक अँटिबायोटिक्स माणसांना मिळत गेली. त्यामुळे साथीच्या रोगांना नियंत्रित करण्याचे मोठे आयुध माणसाच्या हाताला लागले. ऑपरेशननंतर होणारा जंतूसंसर्गाचे प्रमाण कमी करणे हे लिलया शक्य झाले. दिर्घकाळापर्यंत भळभळणाऱ्या जखमा भरून येऊ लागल्या. त्यामुळे ही सगळी अँटिबायोटिक्स एखाद्या जादू प्रमाणे आपल्याला वाटू लागली. साथीला रोखणं, जंतूसंसर्ग नष्ट करणं, जखमा बऱ्या करणं हे सगळंच आपल्या आटोक्यात येतंय, असे चित्र मानव जातीपुढे निर्माण होऊ लागले. त्यामुळे प्राणघातक आजारांना सहजेतेने रोखता येईल, असे आशादायक वातावरण तयार झाले.

माणसाने वैद्यकीय प्रगती केली. नवनवी अँटिबायोटिक्स आपल्या हातात आली. त्यामुळे आपल्याला रोगजंतूंवर नियंत्रण मिळाले, असा वाटत होते. पण, काही काळातच रोगजंतू हे माणसापेक्षा मागे टाकू लागले. डोळ्याला न दिसणाऱ्या अशा अतिसूक्ष्म जीवांनी माणसाने तयार केलेल्या अँटिबायोटिक्सविरोधातच जोरदार लढाई पुकारली. त्यामुळे माणसाच्या हातात प्रभावी अँटिबायोटिक्स आली तरीही ते सूक्ष्मजीवांनी शरणागती पत्करली नसल्याचे कालपरत्वे माणसाला कळू लागले.

अँटिबायोटिक्स विकसित करण्याचे शर्थीचे प्रयत्न शास्त्रज्ञ करत होते. ‘नेस्ट जनरेशन’चे अँटिबायोटिक्सचे उत्पादन सुरू होते. त्याच वेळी रोगजंतूंची पुढची येणारी पिढी त्या अँटिबायोटिक्सला जोरदार प्रतिकार करण्यासाठी सक्षम होत होती. या भूलोकावरील अस्तित्वाच्या लढाईत त्या सूक्ष्मजीवांनी स्वतःमध्ये झपाट्याने बदल करायला सुरवात केली. त्या वैद्यकीय परिभाषेत ‘म्युटेशन’ म्हणतात. या प्रत्येक म्युटेशनबरोबर अँटिबायोटिक्सला प्रतिकार करण्याची त्यांच क्षमता वाढत गेली. त्यामुळे नव्या येणाऱ्या अँटिबायोटिक्सवर रोगजंतूंकडून प्रतिहल्ला होऊ लागले. अर्थात, ही प्रक्रिया काही एका-दुसऱ्या वर्षांत निश्चित झाली नाही. त्यासाठी काही दशकांचा प्रवास जगभर करावा लागला.

हेही वाचा: भारतातील टॉप 10 महाकाय धरणं !

कोणतेही अँटिबायोटिक्स हे रोग पसरविणाऱ्या जंतूंना नष्ट करणारे ब्रम्हास्त्रसारखेच आहे. हे प्रत्येक सर्दी-खोकला, किरकोळ ताप यांचा जंतूंचा मुकाबला करण्यासाठी हे ब्रम्हास्त्र वापरून कसे चालेल? ते मोठ्या आजारांच्या जंतूंच्या विरोधात वापरायला हवे. पण, याचा आपल्या सगळ्यांनाच विसर पडला. आपण डॉक्टरांचा कोणताही सल्ला न घेता थेट मेडिकल शॉपमध्ये जातो आणि ‘सर्दी झालीय ‘स्ट्राँग अँटिबायोटिक्स’ द्या,’ असं आपण सहज म्हणून जातो. फार्मासिस्टही अँटिबायोटिक्स देऊन त्याचं ‘कर्तव्य’ करतो. खरंतर, हे किरकोळ बरं वाटतं नसणं, हे घालवण्यासाठी ब्रम्हास्त्राची गरज आहे, असं तुम्हाला वाटतं का? आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच्या आधारावर आपलं शरीर या जंतूंना मारते. त्याला काही ‘सपोर्टेड’ औषधे आपल्याला डॉक्टर देतात. पण, तेवढा धिर आपल्याला नसतो. आपल्याला लगेच बरं व्हायचं असतं. त्यासाठी आपण अँटिबायोटिक्सचा ‘शॉर्ट कट’ घेतो. ‘लवकर बरे करा,’ ही रुग्णाची मागणी लक्षात घेऊन डॉक्टरदेखिल अनेकवेळा अँटिबायोटिक्स प्रिस्क्राईब करतात. आपल्या या प्रतिजैविकांच्या बेजबाबदार वापरामुळे या माणसाला मिळालेल्या या ब्रम्हास्त्राची धार बोथट होत आहे, याचा साधा विचारही आपल्या मनात डोकावत नाही.

डॉक्टरांनी प्रस्क्राईब केलेला डोसच्या प्रमाणात औषधे आपण घेत नाही. मेडिकल शॉपमध्ये गेल्यावर फार्मसासिस्टला ‘प्रस्क्रिप्शनमधील सगळी औषधे निम्मी-निम्मी द्या,’ असं सांगतो. किंवा सगळी औषधे विकत घेतली तरीही आता ‘मला बरं वाटायला लागलं,’ असे म्हणत आता राहीलेली औषधे घेण्याची गरज नाही, असं आपलं आपणचं ठरवून मोकळा होतो. त्यामुळे पूर्ण डोस पोटात जात नाही. या सर्वांचा परिणाम अँटिबायोटिक्सचा प्रभाव कमी होण्यावर होतो. कारण, शरीरातील रोगजंतू त्यामुळे पूर्णतः नष्ट होत नाही. ते पूर्ण मरत नाहीत. त्यातून रोगजंतूच्या पुढच्या पिढीमध्ये या अँटिबायोटिक्सला प्रतिकार करण्याची क्षमता तयार होते. औषधांना, अँटिबायोटिक्सला प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण झालेल्या रोगजंतूंचा दुसऱ्या रुग्णाला संसर्ग झाल्यास त्यांनाही या औषधाचा गुण येत नाही.

दूधाचे उत्पादन आपल्या देशात वेगाने वाढत आहे. तसेच, कोरोना उद्रेकानंतर प्रथिनयुक्त आहाराला प्राधान्य मिळत असल्याने अंडी, चिकनची मागणी वाढली आहे. या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी गाई, म्हशी यांना इंजेक्शन देऊ लागलो. त्याचाही परिणाम अँटिबायाटिक्सची परिणाम कमी होण्यावर होत असल्याचे वेगवेगळ्या संशोधनातून पुढे येत आहे.

माणसामधील बेजबाबदारपणा हे देखिल अँटिबायोक्सचा प्रभाव कमी होण्यामागचं एक प्रमुख कारण आहे. अनेक उद्योगांमध्ये पाण्याचा वापर होतो. या सांडपाण्याची व्यवस्था योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते. ती केली जात नाही. त्याचा परिणाम रोगजंतू वाढण्यात होतो. त्यासाठी त्या भागातील नागरिक अँटिबायोटिक्सचा सर्रास वापर करतात. कालांतराने हे जंतू त्या अँटिबायोटिक्सला प्रतिकार करू लागतात.

अँटिबायोटिक्सचे उत्पादन आता औषधनिर्माण कंपन्यांना एक प्रकारचं ओझं वाटत आहे. कारण, एकतर, अँटिबायोटिक्स विकसित करण्यासाठी कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर अँटिबायोटिक्सच्या उत्पादन होते. त्यालाही काही दिवसांतरच रोगजंतू प्रतिकार करू लागतात. त्यातून कोट्यवधी रुपये खर्च करून उत्पादित केलेल्या अँटिबायोटिक्सची उपयुक्तताच रहात नाही. असा तोट्याचा उद्योग कोणतीच व्यावसायिक कंपनी करणार नाही. त्यामुळे आता औषधनिर्माण कंपन्यांनी अँटिबायोटिक्सचे उत्पादनाला हळूहळू ब्रेक लावायला सुरवात केली आहे. त्याचा थेट परिणाम आता असा होत आहे की, आपल्याकडे आजारांवर उपचार करण्यासाठी असलेल्या अँटिबायोटिक्सची संख्या कमी झाली. आता आपल्या हातात काही मोजकीच अँटिबायोटिक्स आहेत. त्याला रोगजंतूना अद्याप प्रतिकार करण्यास सुरवात केलेली नाही. त्यामुळे त्याचा प्रभाव अद्यपही कायम दिसतो. नजिकच्या भविष्यात आपल्या हातात राहीलेल्या मोजक्या अँटिबायोक्सलाही प्रतिकार झाल्यास, अँटिबायोटिक्सपूर्वीचे जग कसे होते, याची प्रचीती येण्याची शक्यता वाढू लागली आहे.

वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आरोग्य क्षेत्राची गती वाढली आहे. आव्हानात्मक शस्त्रक्रिया आता आपण यशस्वी करत आहोत. मृत व्यक्तीचे हृदय आता दुसऱ्या रुग्णाला प्रत्यारोपित करण्याची क्षमता आणि कौशल्य आपण विकसित केले आहे. अशा वेळी रोगजंतूंच्या ससंर्गाला रोखण्यासाठी प्रभावी अँटिबायोटिक्स आपल्याकडे असणे, ही आता काळाची गरज आहे.

भविष्यातील हा संभाव्य धोका जागतिक आरोग्य संघटनेने ओळखला आहे. त्यामुळे अँटिबायोटिक्सचा बेसुमार वापरास निर्बंध घेलण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे. त्यामुळे अँटिबायोटिक्स वापरण्याचे निश्चित धोरण आता देशांनी स्विकारले आहे. हे धोरण आता देशातील प्रत्येक हॉस्पिटलपर्यंत पोचत आहे. त्यातून अँटिबायोटिक्सचा न्याय्यपद्धतीने वापर होईल, अशी अपेक्षा आहे.