तुम्ही मुलांची अतिरिक्त काळजी करताय, मग हे वाचाच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school going children}

तुम्ही मुलांची अतिरिक्त काळजी करताय, मग हे वाचाच...

‘‘मॅडम, अहो आमच्या प्रियाकडे जरा जास्त लक्ष द्या हं!!’’, ‘‘आमच्या सोहमला ए टू झेड यायला लागलं का हो!’’, ‘‘अहो, आमच्या देवांशला (वर्ष ३) ए, बी, सी, डी काढ म्हटलं, शिकवलं तरी त्याला अजून येत नाहीये हो, आता येईल का हो’’ अशा कधीही न संपणाऱ्या प्रश्न वारंवार शिक्षकांना विचारले जातायत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांच्या प्रदीर्घ ‘ब्रेक’नंतर संपूर्ण राज्यातीलच नव्हे, तर देशातील शाळा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होऊन महिना होत आला, तरी शाळांच्या परिसरात फेरफटका मारल्यास असे संवाद प्रामुख्याने कानावर पडत आहेत. कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद होत्या आणि ऑनलाइन शिक्षण सुरू होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या मुलांच्या म्हणजे इयत्ता नववी ते बारावी म्हणा किंवा पाचवी ते बारावीच्या मुलांच्या शाळा २०२१मध्ये काही प्रमाणात टप्प्या-टप्प्याने सुरू झाल्या. परंतु प्राथमिक आणि विशेषत: पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थी तब्बल दोन वर्षांच्या ‘ब्रेक’नंतर पहिल्यांदाच शाळेत गेली.

ती यंदाच्या जूनमध्येच (जून २०२२). आपल्याकडे मुलं तीन वर्षांचे झाले की सर्वसाधारणपणे त्याला नर्सरीमध्ये टाकले जाते. त्यानंतर ज्युनिअर केजी, सीनियर केजी (लहान गट/मोठा गट) आणि त्यानंतर इयत्ता पहिली (म्हणजे खऱ्या अर्थाने प्राथमिक शिक्षण) अशा पद्धतीने शाळा सुरू होते. मार्च २०२० या काळात पूर्वप्राथमिक शाळेतील नर्सरीला प्रवेश घेतलेले विद्यार्थी आता मोठ्या गटात, तर लहान गटात प्रवेश घेतलेली मुलं पहिलीला, तर मोठ्या गटातील मुलं दुसरीला आणि इयत्ता पहिलीतील मुलं तिसरीला असणार आहेत. यातील अनेकांची यंदा शाळेत जाण्याची ही पहिलीच वेळ होती.

कोरोना हे निमित्त ठरले असले तरीही, शाळा सुरू होताच शाळेच्या पहिल्या दिवशी आई-वडिलांपासून लांब जाण्याच्या भीतीने मुलांची होणारी रडारड, मुलांच्या काळजीपोटी पालकांकडून शिक्षकांकडे होणारी विचारपूस हे नित्याचेच आहे. परंतु यंदा शिक्षकांशी बोलताना जाणवलं ‘शाळेतलं पहिलं पाऊल या विषयाबाबत विद्यार्थी- त्यांची मानसिकता आणि पालक-त्यांची मानसिकता याचे नानाविध कंगोरे समोर आले.

*पालकहो, काळजी असावी पण ती ‘अति’ नसावी
जूनमध्ये तिसऱ्या आठवड्यात (१५ जून) शाळा सुरू झाल्यात. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी पुन्हा जोमाने शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू होऊनही आता काही दिवस उलटले असून शाळांमध्ये पालक सभा सुरू झाल्यात. याबाबत मुख्याध्यापक, शिक्षकांशी बोलताना समोर आलेले विषय.
१. शाळेत जाणाऱ्या मुलांची पालकांना काळजी, चिंता असणे साहजिकच आहे. परंतु पालक मुलांची अति काळजी करत आहेत.
२. शाळेत पहिल्यांदा पाऊल ठेवलेल्या मुलांच्या पालकांच्या ‘अति काळजी’मुळे शिक्षकांना असंख्य प्रश्न विचारले जात आहेत.
३. आपलं मुलं सगळ्यापेक्षा जास्त हुशार आणि ‘ऑल राउंडर’ व्हावं, याचा पालक करताहेत आग्रह
४. मुलांची इतरांशी सतत तुलना केली जाते.
५. मुलं झटापट वाढावी, त्यांचा विकास व्हावा, त्यांना लवकरात लवकर सगळं यावे, असे वाटते
६. मुलं त्यांच्या कलेने, गतीने वाढावे याबाबत पालकांमध्ये संयम नसल्याचे दिसते.
७. पालकांच्या वयाचा विचार करता, त्यांना लवकरात लवकर काही तरी मिळविण्याची घाई असल्याचे जाणवतं
८. शाळा सुरू झाल्या-झाल्या मुलांना अभ्यास शिकवावा, त्यांना अभ्यासातील सगळ काही यावे, असे पालकांना वाटते.

*पालकांचे म्हणणे ; ‘‘जरा नाजूकपणे मुलांना समजून घ्यायला हवं’’*
१. कोरोना काळातील दोन वर्षे मुलं घराबाहेर पडलेली नाहीत. त्यामुळे घरातील आई-बाबा, आजी-आजोबा सोडले तर त्यांना अन्य ठिकाणी वावरण्याचा अनुभव नाहीये.
२. कोरोनामुळे मुलांचे इतरांमध्ये मिसळणे अशक्य झाले, आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला, मुले मोकळ्या वातावरणात जात आहेत. परंतु शाळा ही त्यांच्यासाठी नवीन आहे.
३. शाळेत एकदम मोकळ्या, खूप मुलं असणाऱ्या, मुख्याध्यापक-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अशा शिस्तबद्ध वातावरण हे सर्वच मुलांसाठी नवीन आहे.
४. शाळेनेही आपल्या मुलाकडे जरा जास्त लक्ष द्यावे
५. शाळेबाबत आजकाल खूप काही कानांवर पडते. त्यामुळे मुलांसाठी आपण निवडलेली शाळा योग्य असेल ना!, त्या शाळेत काही गैरप्रकार होणार नाहीत ना!, याबाबत पालकांच्या मनात सतत धाकधूक असते.
६. वर्गात आपलं मुल नीट बसेल ना, वर्गातून बाहेर जाणार नाही ना, त्याला आपली आठवण येईल, तो रडेल, अशी असंख्य प्रश्न पालकांच्या मनात येतात.

*मुलांमध्ये जाणवतोय ‘स्कूल फोबिया’*
शाळेत जायचं म्हटलं की मुलांचे रडणे अगदी ‘कॉमन’ आहे. परंतु आजकाल शाळा म्हटलं की, किंवा पालकांनी शाळेची तयारी केली आणि नेमकं आता शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडायचे म्हटलं की ‘मोठ्याने आरडाओरडा करणं,’ डोकं आपटून घेणं’, ‘अंग टाकणं’ एवढंच नव्हे तर अगदी शरीराचा थरकाप उडणे, ताप येणं अशी काहीशी गांभीर्याने लक्ष देण्याची लक्षणे मुलांमध्ये जाणवत आहेत. पालकांनो, सामान्यपणे रडणे, अगदी काही दिवस काहीसे रडणे, मग शाळेत गेल्यानंतर काही वेळाने शांत होणं हे अगदी ‘कॉमन’ आहे. परंतु शाळा सुरू होऊन भरपूर दिवस झालेत, किंवा शाळेत गेले तरीही मुलं सतत दिवसभर रडत आहे, किंवा शाळेत जाताना सातत्याने मुलं घाबरून लपून बसत असेल, डोकं आपटून घेत असेल किंवा तत्सम गंभीर लक्षणे दिसत असतील, ते हा ‘स्कूल फोबिया’ आहे समजून घ्यायला हवे, असा सल्ला समुपदेशक देत आहे. अशी लक्षणे दिसल्यास तुम्ही तातडीने मानसोपचारतज्ज्ञ, मनोविकारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांचा सल्ला घ्यायला हवा.

हेही वाचा: 'चेटकिण' ठरविलेल्या छुटनी देवी यांना पद्मश्री मिळाला तेव्हा...

*पालकांसाठी टिप्स*
- तुम्हाला आवडतं ते डब्यात देऊ नका, तर मुलं काय खातील, ते डब्यात असू देत.
- मुलांना शाळेतील इतर मुलांमध्ये मिसळू देत, त्यासाठी त्यांना मदत करा.
- शाळेबाबत मुलांमध्ये भीती निर्माण करू नका.
- शाळेतील सकारात्मक गोष्टींबाबत मुलांना सातत्याने सांगा.
- मुलांचे शाळा, शिक्षक, इतर मुलं यांच्यातील नातं निर्माण होण्यासाठी पुरेसा वेळ द्या.
- पालकांनी गोंधळून न जाता मुलांच्या भावना समजून घ्यायला पाहिजे. मुलांना शाळेत रुळण्यासाठी थोडा वेळ द्यावा.
- अभ्यासाची घाई करू नका, मुलांना शाळेत रमू द्या.
- मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक अशा सर्वांगीण विकासाबाबत संयम ठेवा
- शाळेच्या सुरवातीच्या काळात शाळेची ओढ मुलांना वाटू देत
- मुलांच्या वयानुसार त्यांना शाळेत शिकवलं जाणारच आहे, त्याची घाई नको
- मुलांना त्यांच्या गतीने आणि कलेने घडायला पुरेसा वेळ द्या
- अभ्यास, सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे, याचा अतिरेक आणि घाई टाळा
- मुलांच्या मानसिकतेचा विचार करा
- अभ्यासाचे ओझे लहान वयात वाटू देऊ नका

पूर्व प्राथमिक शिक्षण कशासाठी हे समजून घेऊयात-
पूर्व प्राथमिक शिक्षणात मुलांनी प्रवेश केला, की त्यांना अगदी लिहायला-वाचायला यायला हवं, अशी अपेक्षाही पालक करताना दिसतात. प्राथमिक शिक्षण हे इयत्ता पहिलीपासून सुरू होते. परंतु त्यांची पूर्व तयारी म्हणून पूर्व प्राथमिक शिक्षण असते, हे पालकांनी समजून घ्यायला हवे. पूर्व प्राथमिक शिक्षणातून नेमकं साध्य काय व्हायला हवे, अपेक्षित काय! हे जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे वाचा.

*पूर्व प्राथमिक शिक्षणात काय साध्य करायचे हे समजून घ्या*
- मुलांचा सर्वांगीण विकास
- शब्द संग्रहात वाढ, भाषा विकास
- अक्षर व अंक ओळख
- दैनंदिन व्यवहाराची जाण
- शिक्षण, शाळेची गोडी लागणे
- कृती, खेळातून अभ्यासाची आवड लावणे.

हेही वाचा: ..तुमच्या जागांचा पैसे कमावण्यासाठी करा असा वापर....

खरंतर मुलांचा ‘शाळेतलं पहिलं पाऊल’च्या निमित्ताने आज पालकांच्या जिव्हाळ्याच्या आणि अत्यंत नाजूक विषयाला हात घातला आहे. कारण शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत किंबहुना पालकच अधिक ‘पॅनिक मोड’मध्ये गेल्याचे यंदा प्रकर्षाने जाणवले. आपण सगळे पालक म्हणून काही मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. म्हणून शिक्षक-पालकांची संवाद साधून त्यातील काही मुद्दे येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पालकांनी मुलांच्या कलाने घ्यावे. विशेषकरून पूर्व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना शाळा सुरू झाल्या-झाल्या अवघ्या काही दिवसात अभ्यास आलाच पाहिजे, अशी घाई करू नका. पालकांनी संयमाने वागायला हवे. शाळेत पहिलं पाऊल ठेवणाऱ्या मुलांचे वय समजून घेऊन त्यादृष्टीने विचार आपण पालक म्हणून करायला हवा.

मुलांचा सर्वांगीण विकास करताना मुलांना सगळं यायलाच हवे, अशा स्वरूपात अति घाई किंवा अतिरिक्त घाई करू नये. त्यांच्या गतीने वाढू देण्यासाठी पालकांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून त्यांना मदत करणे गरजेचे असल्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
चला तर मग आपणही मुलांच्या ‘शाळेचं पहिलं पाऊल या प्रवासात त्यांची साथ देऊ यात. शाळेच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना आवश्यक ते करून यात. नव्याने उमलणाऱ्या कळीरुपी लहान मुलांना फुलण्यासाठी त्यांचे-त्यांचे अवकाश निर्माण करून देऊ यात. शिकण्याचा आनंद...शाळेची मज्जा त्यांना अधिकाधिक चांगल्याप्रकारे कशी घेता येईल, यासाठी प्रयत्न करू यात.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”