Boomrang Hiring : जुन्याच कंपनीत परत जाण्याचा विचार करताय? मग बूमरँग हायरिंगबद्दल वाचाच!

कोविडनंतर जगात जे अगणित बदल होत आहेत, त्यातलाच एक म्हणजे जुन्याच कंपनीत नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येतील वाढ.. या बूमरँग हायरिंगच्या ट्रेंडचे फायदे तोटे आणि आर्थिक बाबी याबद्दल...
Boomrang Hiring
Boomrang HiringE sakal

बूमरँग एम्प्लॉयीज हा नवा ट्रेंड सध्या कंपन्यांच्या मनुष्यबळ म्हणजेच एचआर विभागात दिसतो आहे. हल्ली सगळ्याच बाबतीत निरनिराळे ट्रेंड्स येत असतात. त्यातलाच एक म्हणजे हा नवा ट्रेंड.

जुन्याच कंपनीत नव्याने रुजू होण्याच्या या ट्रेंडचे फायदे, तोटे, त्यातलं राजकारण, मानसिकता सगळ्याबद्दल जाणून घेऊया

करिअर आणि नोकऱ्यांच्या बाबतीत अनेक निकष दिवसेंदिवस बदलतायत. पूर्वीसारखं एकाच कंपनीत चिकटल्यावर तिथेच निवृत्त व्हायचं, असं तर बिल्कुल राहिलेलं नाही.

उलट मधल्या काळात तर धडाधड नोकऱ्या बदलण्याची लाटच आली होती. आयटी, इंजिनीअर्स यांच्यात त्याचं प्रमाण मोठं दिसत होतं. एखाद्या कंपनीत काही महिने काम करायचं आणि लगेच दुसरीकडली ऑफर आल्यावर तिकडे जायचं. त्यामुळे लोकांच्या सीव्हीमध्ये अनेक कंपन्यांची नावं असायची.

अगदी आत्तासुद्धा तिशीच्या आतल्या लोकांच्या लिंक्डइन प्रोफाइल पाहिल्यात तर अनेकांच्या फॉर्मर एम्प्लॉयमेंट कॉलममध्ये कंपन्यांच्या नावाची भलीमोठी लिस्ट असते.

पण मग हे बूमरँग एम्प्लॉयीज म्हणजे नेमकं काय ?

तर बूमरँग एम्प्लॉयीज म्हणजे त्याच कंपनीत परत येणं किंवा कंपनीने त्यांच्याच माजी कर्मचाऱ्यांना नव्या आणि अधिक वरच्या पदांवर परत आणणं. या घरवापसीची अगदी मोठ्या पदांवरची उदाहरणंसुद्धा आहेत.

वेदांताने त्यांचे पूर्वीचे सीएफओ अजय गोयल परत येत असल्याचं सांगितलं. (ज्या वेदांतावरुन मधल्या काळात शिंदे आणि ठाकरे गटांत वाद झाला तीच ही कंपनी)

अदानी सिमेंटने अजय कपूर यांना सीईओ म्हणून आणत असल्याचं सांगितलं आहे. अंबुजा सिमेंटमध्ये एमडी आणि सीईओ ही पदं सांभाळणारे अजय कपूर आधी अदानीमधीलच कर्मचारी होते. त्याचीच आता घरवापसी होते आहे.

श्री सिमेंटमध्ये त्यांचेच पूर्वीचे सीएफओ हे आता सल्लागार म्हणून परत येत असल्याची घोषणा केलीय.

जेएसडब्ल्यू ग्रूप, दालमिया सिमेंटने आपल्याच काही निवृत्त माजी कर्मचाऱ्यांना सल्लागार म्हणून परत येण्याची विनंती केली होती.

आता बूमरँग एम्प्लॉयीज हा नवा ट्रेंड म्हणजे करून करून भागले... अशा अर्थाचा नसून खरोखरच कंपनीतीलच काही वरिष्ठ आणि अर्थातच चांगला रेकॉर्ड असलेल्या कर्मचाऱ्यांची घरवापसी होण्याचा आहे.

विशेषत: कोविडने जगात जे काही दूरगामी परिणाम केले, असं आपण ज्याला म्हणतो त्यातलाच हा एक भाग आहे.

एका अहवालानुसार आपल्या जुन्याच कंपनीत पुन्हा रुजू होणारे कर्मचारी सुमारे २० टक्के आहेत.

बूमरँग एम्प्लॉयी म्हणजे कुठेच जमलं नाही म्हणून परत येणारा नव्हे तर कंपनीबरोबर असलेला पूर्वीचा रॅपो राखून त्यात काही नवीन आणणारा असा बदल कसा झाला, तुम्हाला अशी संधी हवी असेल तर कर्मचारी म्हणून काय करावं लागेल...

कंपन्यांच्या माध्यमातून याचे फायदे तोटे काय आहेत.

या सगळ्यावर एक नजर टाकूया.

एका कंपनीत एचआर विभागातच अशा बूमरँग ट्रेंडमध्ये रुजू झालेला पद्मनाभ म्हणतो, हा ट्रेंड चांगला आहे. महत्त्वाचं म्हणजे कंफर्ट लेव्हल. जर तुम्ही जुनी कंपनी सोडून जाताना कोणतीही कटुता न ठेवता गेला असाल तर परत येतानाही अडचणी येत नाहीत.

मी परत आलो कारण माझा आधीचा बॉस सोडून गेला होता. मला परत यायचंच होतं, असं नव्हे, जिथे होतो तिथे माझं बरं चाललं होतं. पण आधीच्याच कंपनीत मला विचारलं. संधी चांगली होती, मला वाटलं की माझी वाढही होईल त्यामुळे मी इथे आलो. मला इथे वरची पोस्टसुद्धा मिळाली.

फायदे काय आहेत ?

पुन्हा जुन्या कंपनीत जाणं कर्मचारी आणि कंपनी दोघांसाठी फायद्याचं असू शकतं कारण कंपनीच्या एचआर विभागाला कर्मचाऱ्याची माहिती असते आणि कर्मचाऱ्याला कंपनीची. शिवाय त्या विशिष्ट कामासाठी आवश्यक असलेली कौशल्य त्या कर्मचाऱ्याकडे आधीच असतात. त्या व्यक्तीला ती नव्याने शिकवावी लागत नाही. त्यामुळे कर्मचारी नव्या नोकरीत, नव्या पदावर पटकन रुळू शकतो, त्याच्या प्रशिक्षणात कंपनीचाही फार वेळ जात नाही आणि त्या व्यक्तीचाही.

काम ज्या सिस्टीमवर करायचे आहे, ती सिस्टीम, सॉफ्टवेअर कर्मचाऱ्याला माहिती असते. त्यामुळे त्यात रुळायला आणि खऱ्या अर्थाने कामाला सुरूवात करायला त्या व्यक्तीला वेळ लागत नाही. शिवाय या यंत्रणेतील खाचाखोचासुद्धा त्या कर्मचाऱ्याला आधीच माहिती असल्याने त्यात वेगवान काम सुरु करण्यास त्याला वेळ लागत नाही.

कंपनीत कोणत्या प्रकारचे वातावरण आहे, सहकारी कसे आहेत, कंपनी पॉलिसीज नेमक्या काय आहेत, या सगळ्याची आधीच माहिती असल्याने घरवापसी झालेल्या या खेळाडूला त्याच्या टीमचा परफॉर्मन्स आणि कंपनीच्या गरजा यांची सांगड घालणं सोपं होतं.

त्याच कंपनीत, त्याच विभागात अथवा क्षेत्रात काम करताना झालेल्या व्यावसायिक ओळखी, जुळलेले व्यावसायिक ऋणानुबंध अधिक मजबूत होतात. त्याचा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही फायदाच होतो. व्यावसायिक वावरातील नेटवर्क अधिक घट्ट होते.

करिअरमध्ये कायमच वरची पायरी चढायची असेल तर अधिक वेळ द्यावा लागतो, अधिक कष्ट करावे लागतात आणि तितकीच मानसिक तयारीही. अगदी नव्या कंपनीत नव्या आणि अधिकच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यापेक्षा माहितीच्या आणि पूर्वी काम केलेल्या कंपनीत वरची पायरी चढणं मानसिकदृष्ट्या सोपं जातं शिवाय दुसऱ्या कंपनीत जाऊन आधीच करिअरमध्ये एक लीप घेतल्याने आर्थिकदृष्ट्याही ते सोईचं ठरतं.

नवीन नोकरीच्या शोधात असताना मनात जी अनिश्चितता, धाकधुक असते ती जुन्याच कंपनीत परत जाताना कमी असू शकते. कारण तेथील आर्थिक सुरक्षितता, स्थैर्य याची तुम्हाला खात्री असते.

जसे फायदे तसे तोटेही आहेतच

तर तोटे कोणते ?

- तुम्ही जुन्याच कंपनीत पुन्हा रुजू झालात तर तुम्हाला तिथलं वातावरण, मानसिकता, कंपनीची धोरणं, काम करण्याची पद्धत सगळं सगळं माहिती असल्याने सोयीचं, सोपं जातं पण त्यामुळे तोचतोपणा अथवा साचलेपण सुद्धा येऊ शकतं.

- नवीन काही आव्हानं आणि संधी नसतील तर तुमच्या करिअर वाढीला खिळ बसू शकते. ज्यामुळे करिअरच्या बाबतीत तुम्ही ठरवलेली दीर्घकालीन उद्दिष्ट्य सफल होण्यात अडथळे येऊ शकतात.

- प्रत्येकवेळी नोकरी सोडताना पगारापलिकडे काही कारणं असतातच. उदा. एखाद्या ठिकाणची कार्यसंस्कृती, वागण्याची पद्धत, व्यवस्थापन तुम्हाला फारसं रुचलेलं नसतं. तिथेच परत जायचं म्हणजे या सगळ्याला पुन्हा तोंड द्यावं लागणार नाहीतर मग ते आहे तसं सहन करावं लागणार. अर्थात कंपनीने मधल्या काळात काही सकारात्मक बदल केले असतील तर भाग अलहिदा. याचा परिणाम तुमच्या कामावर आणि त्यातून मिळणाऱ्या समाधानावर होतो.

- कधीकधी तुम्ही परत आल्यामुळे तुमच्या सहकाऱ्यांना असूया वाटू शकते, ते नाराज होऊ शकतात नाहीतर तुम्ही करिअरविषयक तितकेसे गंभीर नाही, असंही त्यांना वाटू शकतं. कारण तुम्ही परत आलेले असता. तुमच्या सहकाऱ्यांमध्ये अशा प्रकारची भावना असेल तर त्या टीमचं नेतृत्त्व करताना आणि अधिकच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तुम्हाला अतिशय अडचणी येऊ शकतात.

- जुन्याच कंपनीत परत जाताना बाजारभावापेक्षा कमी पगारावर तुम्ही परत याल, अशी त्या कंपनीची धारणा अथवा समज असू शकते. तसेच तेथील व्यवस्थापन आणि एचआरसुद्धा आधीच माहितीचे असल्याने आर्थिक वाटाघाटी करताना मर्यादा येतात. तुम्हाला कमी पगारात समाधान मानावे लागू शकते.

- जरी तुम्ही जुन्याच कंपनीत परत येत असलात तरीही तुमच्याप्रमाणे कंपनीतही काही बदल घडलेले असतात. कंपनीतील वातावरण, कार्यपद्धती यातले बदल पटकन लक्षात आले नाहीतर तर गडबड होऊ शकते. आणि सगळं पूर्वीसारखंच असेल असा गैरसमज असेल तर बदललेल्या गोष्टी समजून घ्यायला, त्यात रुळण्यासाठी उलट अधिक कठीण जाते.

एका कंपनीत एचआर म्हणून काम करणारी मल्लिका म्हणाली, काही कंपन्या कर्मचाऱ्यांना परत घेत नाहीत. कारण एकदा आपल्या ब्रँडला त्या कर्मचाऱ्याने नाकारलं असेल त्याला परत घेणं काही कंपन्यांच्या पॉलिसीत बसत नाही.

काही कर्मचारी पगारात वाढ हवी, म्हणूनही या ट्रेंडचा आधार घेतात. म्हणजे मुद्दामच दुसऱ्या एखाद्या साध्या कंपनीत जाऊन तिथे केवळ सीटीसी वाढवून घेतात आणि परत मूळ कंपनीत येताना त्या सीटीसीच्या आधारे वाढ मागतात, फायदे मागतात.

असे प्रकार उघडकीस आल्यास मग कंपन्या त्यांच्या ध्येय धोरणात बदल करू शकतात. एचआर म्हणून काम करताना आम्हाला जुनाच कर्मचारी परत येणं सोयीचं ठरतं पण मुख्यत्तेवकरून येणारी व्यक्ती, तिचं बाजारमूल्य, कंपनी खर्च करू इच्छित असलेली रक्कम आणि त्या व्यक्तीची वागणूक यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

शेवटी तुम्ही कोणतीही नोकरी किंवा करिअर संधी सोडून जाताना किती शांतपणे आणि फुकाचे वाद न करता जाता हे महत्त्वाचं असतं.

राजीनामा देणं म्हणजे काही एखाद्या नात्याचा कटू शेवट वगैरे नसतो. तर तुमच्या करिअरसाठी केलेली एक व्यावसायिक तडजोड असते.

परत त्याच कंपनीत येताना मात्र दुराभिमान बाळगणे, उपयोगाचे नाही. त्याचबरोबर मनाचा मोकळेपणा हवा. कंपनीच्या वातावरणात, कार्यपद्धतीत झालेले बदल समजून घेण्याची, नव्या गोष्टी शिकण्याची खुली मनोवृत्ती गरजेची आहे.

बूमरँग एम्प्लॉयी म्हणून येत असताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी

  • परत येताना फायदे आणि तोटे याचा अभ्यास करून या. आर्थिक फायद्याचा विचार करताना मानसिक बाबींकडे दुर्लक्ष करू नका कारण त्याचा तुमच्या परफॉर्मन्सवर मोठा परिणाम होत असतो. तुम्ही यंत्र नाही.

  • जुन्या वरिष्ठांबरोबर, सहकाऱ्यांबरोबर चांगले संबंध राखा.

  • नवे बदल स्वीकारण्यास खुल्या मनाने तयार राहा.

  • दुसऱ्या ठिकाणचे तुमचे अनुभव, संधी तुमच्या जुन्या सहकाऱ्यांना सांगा. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला.

  • जुन्या गोष्टी उगाळत राहू नका आणि नव्या गोष्टी शिकायला अजिबात लाजू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com