जगात भारी; 200 उद्यानांची पुण्याची दुनियाच न्यारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगात भारी; 200 उद्यानांची पुण्याची दुनियाच न्यारी!}
जगात भारी; २०० उद्यानांची पुण्याची दुनियाच न्यारी!

जगात भारी; 200 उद्यानांची पुण्याची दुनियाच न्यारी!

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

‘पुणे तेथे काय उणे’ ही म्हण प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध म्हणजे नुसती प्रसिद्ध नाही तर ती या शहरात जगताना अनुभवता येते. त्यामुळे पुणेकर म्हणत असतात ‘जगात भारी आमचा तळ्यातला गणपती (सारसबाग) आणि शनिवार वाडा’. जगातला कोणताही माणूस पुण्यात आलाच, तर तो या दोन ठिकाणी हमखास भेट देणार म्हणजे देणारच. पुण्यात २७१ वर्ष जुनी सारसबाग सुरू झाली तेव्हापासून उद्याननिर्मितीचा प्रवास सुरू आहेत. आज २०२१ मध्ये शहरात थोडी थोडकी नव्हे तर २०४ उद्याने विकसित झाली आहेत. शहरातील तब्बल ६०० एकर जमीन उद्यानांनी व्यापली आहे. उद्याने केली म्हणजे फक्त झाडे लावली, जॉगिंग ट्रॅक केला असे नाही तर त्याला आधुनिकतेची जोड दिल्याने मुघल शैली, जपानी शैली, साहसी खेळ, ऊर्जा उद्यान, सेव्हन वंडर अनोखे उद्याने शहरात निर्माण झाल्याने वैभवात भरच पडली आहे. या शिवाय १३० एकर भागात विस्तारलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय शहराची शान वाढविणारे आहे.

अॅटोमोबाईल हब, आयटी हब, शिक्षणाचे माहेरघर अशी अनेक बिरुदावली पुण्यासाठी वापरली जातात. हे वैशिष्ट्य आहेच. पण शहर मोठे होताना सोसायटीत छोटे गार्डन, तर जवळच शाळा, मॉल, दवाखाना आहे का? हे लोक घर घेताना बघतात म्हणजे बघतातच. पण घराजवळ मोठी बाग असेल का? याचा विचार करत नाहीत. याच्या नेमके उलटे पुण्यात घडतय. सोसायटीतील छोटे उद्यान असेलच पण घराजवळही एक दोन किलोमीटरच्या परिसरात महापालिकेने विकसित केलेले उद्यान आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी उद्यान हा जसा आवडीचा विषय आहेत. तसाच प्रेमी युगलांनाही याच उद्यानात निवांतपणा मिळतो हे देखील तितकेच खरे आहे. अशाच काही खास उद्यानांची माहिती घेऊयात

हेही वाचा: कोरोनातील अनलॉकनंतर ‘हाय डिमांड’ असणाऱ्या नव्या संधी!!

१९५० ला पुणे महापालिका स्थापन झाल्यापासूनच नागरिकांना सोई सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील होती. त्यात उद्यान हा विषय कायम अग्रस्थानी राहिलेला आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी आंबिल ओढ्याच्या कडेने २५ एकर जागेवर सारसबाग साकारताना तेथे तलाव निर्माण केला. तेथे नौकाविहार आणि पेशव्यांकडे असलेल्या हत्तींच्या अंघोळीसाठी वापर केला जात असे. १७८४मध्ये पेशव्यांनी तळ्याच्या मध्यभागी सिद्धिविनायकाची प्राणप्रतिष्ठापना केली. त्यामुळे या सारसबागेला तळ्यातला गणपती असे नाव पडले. काळानुरूप सारसबागेत बदल होत गेला. मंदिराच्या बाजूने छोटे तळे असून, त्यात कमळाची फुले आणि करंज्या आहेत. पण हे उद्यान ऐतिहासिक असल्याने पर्यटकांचा ओढा कायम आहे.

सारसबागेनंतर शहरात प्रसिद्ध आहे ते ‘संभाजी महाराज उद्यान’. १९५२ मध्ये हे उद्याने महापालिकेने विकसित केले. जंगली महाराज रस्त्यावर नदीच्या काठी उद्यान विकसित झाले. या ठिकाणी शिवमंदीर, कारंजे, लष्करातील रणगाडा हे नागरिकांना आकर्षित करतातच, पण या उद्यानातील ‘मत्स्यालय’ हे देखील आकर्षणाचे केंद्र आहे. पुण्याच्या पर्यटनात वाढ व्हावी यासाठी १९५३ मध्ये हे गोड्या पाण्यातील मत्स्यालय सुरू करण्यात आले. यामध्ये देश विदेशातील २३ माशांच्या जातींचे संगोपन व उत्पादनही करण्यात येते. लहान मुलांसाठी हे आवडते ठिकाण आहे. १९५२ या वर्षात आणखी एक उद्यान विकसित केले ते म्हणजे एरंडवण्यातील कमला नेहरू उद्यान. प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, कर्वे रस्त्यावरील नागरिकांसाठी हे उद्यान विकसित केले असले तरी शहराच्या इतर भागातील नागरिक येथे येतात. या ठिकाणी भारत पाकिस्तान युद्धात वापरल्या गेलेल्या ‘नॅट’ या विमानाची प्रतिकृती लक्षवेधी आहे. आशिया खंडातील सर्वात वेगाने विकसित झालेले उपनगर म्हणून कोथरूडचा उल्लेख होतो. या कोथरूडला साजेसे तात्यासाहेब थोरात उद्यान १९८६ ला विकसित करण्यात आले. खेळायला, फिरायला मोठी जागा आहेच. याठिकाणी एस. के. ४२३ या लढावू विमानाची प्रतिकृती लावलेली आहे. उद्यानातील भिंतींवर संतसाहित्याचे लिखाण केले आहे. कोथरूड मध्ये भुसार कॉलनीमध्ये विकसित करण्यात आलेले पंडित भीमसेन जोशी उद्यानही उत्‍तम पद्धतीने विकसित केले आहे.

पुण्यात काळाप्रमाणे उद्यानांची संकल्पना बदलत गेली. केवळ विरंगुळा म्हणून नाही तर थीम पार्क म्हणून उद्याने विकसित करण्याकडे महापालिकेने प्रयत्न केला. यापैकीच एक आहे ते पू. ल. देशपांडे उद्यान. ६० हजार चौरस मीटरवर हे उद्यान विस्तारले असून, फेज एक आणि फेज दोन असे याच दोन भाग आहेत. फेज एकमध्ये पुणे महापालिका असोसिएशन आॅफ फ्रेंड्स आॅफ जपान आणि गव्हर्नमेंट आॅफ दय ओकायामा प्रेफेक्टर यांच्यातील सामंजस्य करारानुसार ओकायामा येथील कोराक्यएन उद्यानाच्या धर्तीवर ‘पुणे ओकायामा मैत्री उद्यान’ २००६ मध्ये विकसित करण्यात आले. हे उद्यान पाहताना डोळ्याचे पारणे फिटते हे नक्की. या उद्यानात बॉडीगार्ड, मराठीतील दुनियादारी यासह इतर चित्रपटाचेही शूटिंग झाले आहे. उद्यानातील हिरवळ, मोठे तळे, त्यातील विविधरंगी मासे, धबधबा, नागमोडी ओहोळ आहे. लहान मुले या पाण्यात खेळण्यासाठी प्रचंड हट्ट करतात, त्याची सुद्धा या ठिकाणी दखल घेऊन खास एका ठिकाणी पाण्यात खेळण्याची व्यवस्थाही केली आहे. उंचावर जाऊन फोटो काढण्यासाठी सागवानाचे सहा पॅगोडा तयार केला आहे. फेज एक जेवढे भारी आहे, तेवढेच भारी फेज टू देखील आहे. राष्ट्रपती भवनात असलेल्या ‘मुघल गार्डन’च्या धर्तीवर हे उद्यान विकसित केले. याच्या नावात मुघल असा शब्द आल्याने काही संघटनांनी त्यास विरोध केला होता. मात्र, हे उद्यान नेमके कसे आहे हे सांगितल्यानंतर हे सुंदर उद्यान नागरिकांसाठी खुले केले या ठिकाणी असलेली विद्युत रोषणाई, वास्तुरचना, गुलाबाचे ताटवे, कारंजे यामुळे एक वेगळीच अनुभूती येते. या उद्यानात गेले की दोन तीन तास फुल्ल मजा करायची, अजिबात कंटाळा येणार नाही. असे हे स्थळ आहे, फक्त अट एकच हे सर्व रसिकतेने अनुभवता आले पाहिजे.

हेही वाचा: जीवनाचा नाही भरवसा! कुटंबीयांसाठी एवढं कराच

शहरीकरण वाढत चालल्याने ग्रामीण भागातील संस्कृतीला नवी पिढी मुकत आहे. त्यांना ग्रामीण संस्कृतीही कळाली पाहिजे यासाठी पाषाण येथील सोमेश्‍वरवाडी येथे संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान हे थीमपार्क आहे. याच्या तटबंदी प्रवेशद्वाराच्या वर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे याचे पुतळे आहेत. आत प्रवेश करताच गावाचे वातावरण अनुभवता येते. ग्रामपंचायत, झाडाखाली भरणारी शाळा, शेतात काम करणारे शेतकरी, भजन कीर्तन, लग्नसोहळे, अठरा अतुलेदार, बारा बलुतेदार, वाडा, जत्रा, बाजार हे सर्वच याठिकाणी पाहता येते. याठिकाणी सोमेश्‍वराचे मंदिर व नदीकाठचा रम्य परिसर यामुळे या उद्यानाची सुंदरता खुलते.

जगातील सात आश्‍चर्य आपण बघू शकतो का? तस असा अनुभव घेणारे खुपच कमी लोक असतील. पण पुण्यात राहून हा अनुभव घ्यायचा असेल तर सहकारनगर येथील यशवंतराव चव्हाण उद्यानाला नक्कीच भेट द्या. हे थीम पार्क सेव्हन वंडर या नावानेच ओळखले जाते. आग्रॅचा ताजमहाल, झाचे द ग्रेट पिरॅमिड, पिसाचा झुलता मनोरा, स्टोनहॅज, कोलोझियम, पॅसिरचे अयफेल टॉवर, अमेरिकेतील स्वातंत्रता देवीचा पुतळा यांची प्रतिकृती पाहायला मिळते. त्याचा आनंद लहान मोठ्या सर्वांना घेता येतो. सहकारनगर येथे जयंतराव टिळक गुलाब पुष्प उद्यान आहे. येथे आकर्षक व दुर्मिळ गुलाब पाहायला मिळतात. याच भागात आणखी एक थीम पार्क आहे ते फुलपाखरू उद्यान, येथे बागडणाऱ्या फुलपाखरांना पाहण्याचा आनंद वेगळाच आहे.पुण्यात पेशवे ऊर्जा उद्यान हे सासरबागेच्या शेजारी आहे. या ठिकाणी सौरऊर्जा निर्मितीचे पॅनेल आहेत. तसेच मोठे तळे आहे. या उद्यानात काही वर्षांपूर्वी मुलांसाठी साहसी खेळण्या बसविण्यात आल्या. त्यामुळे हे उद्यान लहान मुलांच्या पसंतीला उतरते.

पुणे महापालिकेचे सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय. १३० एकर जागेत सर्पोद्यान, साळिंदर, बोनेट माकड, अस्वल, चितळ, सांबर, नीलगाय, चिंकारा, कोल्हा, वाघ, हत्ती, लांडगा, बिबट्या यासह इतर प्राणी आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी सात वाघ असून, यात औरंगाबाद येथून अर्जुन आणि भक्ती आणि राजकोट येथून आणलेली पांढरी पट्टेरी वाघीण नागरिकांचे लक्ष वेधून घेते. प्राणी संग्रहालयाचा इतिहास देखील एकदम खास आहे. १७२० मध्ये थोरले बाजीराव यांनी हे प्राणिसंग्रहालय सुरू केले. नानासाहेब पेशवे व सवाई माधवराव यांच्या कारकिर्दीत त्याचा विस्तार झाला. भारतभरातून आणलेले प्राणी, पक्षी पर्वती येथील परिसरात ठेवले जात. अनेक वर्ष प्राणी इथे होते. १९५३ मध्ये पेशवे पार्कच्या सात एकर जागेत हे संग्रहालय सुरू करण्यात आले. पण इथली जागा अपुरी पडत असल्याने १९९६ मध्ये केंद्र सरकारच्या आदेशानुसार कात्रज येथील १३० एकर जागेत संग्रहालय स्थलांतरित केले आहे. त्यामुळे प्राण्यांना नैसर्गिक अधिवास मिळत आहे.

हेही वाचा: ‘सेन्सेक्स’ने विक्रमी पातळी गाठली; पुढे काय?

पुण्याच्या मध्यवर्ती भागात मोठे उद्याने विकसित झाली, त्याच पद्धतीने उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षात उद्यान निर्मितीने गती पकडलेली आहे. महापालिकेने १९५० ते २०१६ या कालावधीत १६५ उद्याने विकसित केली. पण गेल्या पाच वर्षात शहरातील उद्यानांची संख्या २०४ वर गेली आहे. विकास आराखड्यात असलेल्या आरक्षणामुळे एक दोन एकर जागा ताब्यात येताच नगरसेवकांकडून प्राधान्याने उद्यान तयार केले जात आहे. जर जागा नसले तर प्रभागातून वाहणाऱ्या नाल्याच्या कडेने नाला गार्डन तयार केले जाते. उड्डाणपुलाच्या खालील मोकळ्या जागेत अतिक्रमण हो नये यासाठी उद्यान तयार केले जात आहे. त्याच प्रमाणे शहरात वन विभागाच्या तळजाई, भांबुर्डा, वारजे यासह इतर ठिकाणच्या टेकडीवर संयुक्त वनप्रकल्प राबविण्यात येतो. त्यामुळे शहराच्या फुफुसांचे संरक्षण होत आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय उद्यानांची संख्या
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय - १२
येरवडा- धानोरी क्षेत्रीय कार्यालय - २०
नगर रस्ता- वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय - १२
औंध- बाणेर क्षेत्रीय कार्यालय - १२
शिवाजीनगर- घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय- १७
कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय- १२
धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय- १९
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय- ११
वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय- १४
हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय- १२
वानवडी, रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय- १०
कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय - १०
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय- ६
कसबा -विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय- २०
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय- १६

go to top