खाकीची तुम्हालाही क्रेझ आहे तर मग हे नक्की वाचा ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police hierarchy}

खाकीची तुम्हालाही क्रेझ आहे, तर मग हे नक्की वाचा ...

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या पोलिस दलाबाबत सर्व सामान्यांना अभिमान वाटतो. पोलिसांचा रुबाब, डॅशिंगपणा, तपास करण्याची पद्धत, गणवेश याबाबत हेवा वाटतो. त्यामुळे अनेकजण पोलिस दलात भरती होण्यासाठी धडपडत असतात. पोलिस दलातील कामकाजासह त्यातील पदांबाबतही अनेकांना उत्सुकता असते. शिपाईपासून महासंचालक पर्यंत विविध पदे आहेत. या पद क्रमाबाबत जाणून घेऊ. (Maharashtra Police force hierarchy )

पोलिस म्हटले की, सर्व समान असे अनेकांना वाटते. पोलिसांकडून मदत मिळते, पीडित व्यक्तीला न्याय मिळतो, एवढेच ठाऊक. पदाबाबत पुरेशी माहिती नसते. चित्रपटातही ठराविक पदांचाच उल्लेख केला जातो. त्यामुळे ती पदे प्रचलित झाली आहे. एसपी, पीएसआय, डीआयजी ही पदे चित्रपटात नेहमी ऐकायला मिळतात. मात्र, या पदांव्यतिरिक्तही इतर मोठी व विविध पदे आहेत. प्रत्येकाची कामाची जबाबदारी वेगवेगळी असते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस खाते खूप महत्वाचे समजले जाते. त्यामुळे या दलातील अधिकारी, कर्मचारीही तितकेच हुशार, चाणाक्ष असतात. त्यांच्या परीक्षाही त्याच पद्धतीच्या असतात. पदांना मोठा मान आहे. जेवढे मोठे पद तेवढी मोठी जबाबदारी, अधिकार असतात. महासंचालक यांच्याकडे पूर्ण राज्याचा कारभार असतो. त्याचप्रमाणे इतर अधिकाऱ्यांनाही कामाची जबाबदारी वाटून दिलेली असते.

महाराष्ट्र पोलिस सेवेतील, भारतीय पोलिस सेवेतून आलेले अधिकारी तसेच भरती प्रक्रियेतून आलेले कर्मचारी यांचा समावेश असतो. शिपाई पदापासून महासंचालक पदापर्यंत विविध क्रम आहेत. नव्याने भरती झालेल्या उमेदवाराची शिपाई पदावर नियुक्ती केली जाते. त्यानंतर नाईक, हवालदार, सहायक फौजदार/सहायक उपनिरीक्षक, फौजदार/उपनिरीक्षक या पदापर्यंत ठराविक कालावधीनंतर पोहोचतात. यासह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आलेले उमेदवार उपनिरक्षक म्हणून रुजू होतात. त्यानंतर सहायक निरीक्षक, निरीक्षक, वरिष्ठ निरीक्षक, सहायक आयुक्त/उपअधीक्षक या पदावरून निवृत्त होतात.

तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातूनच गट अ मधून आलेले सहायक आयुक्त/उपअधीक्षक या पदावर रुजू होतात. त्यानंतर उपायुक्त किंवा अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपायुक्त किंवा पोलिस अधीक्षक, उपायुक्त किंवा वरिष्ठ अधीक्षक, अतिरिक्त पोलिस आयुक्त किंवा पोलिस उपमहानिरीक्षक, सह पोलिस आयुक्त किंवा पोलिस महानिरीक्षक त्यानंतर पोलिस आयुक्त किंवा अतिरिक्त पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त किंवा पोलिस महासंचालक या पदापर्यंत पोहोचतात. तर भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले थेट उपायुक्त किंवा अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होतात. नंतर ते महासंचालक पदापर्यंत पोहोचतात.

महासंचालक पोलिस दलाचे प्रमुख असतात. तसेच इतर विभागासाठीही महासंचालक असतात. त्यानंतर अतिरिक्त महासंचालक जबाबदारी सांभाळतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाहतूक, गृहरक्षक दल, गुप्त वार्ता विभाग, सीआयडी, प्रशासन, कारागृह आदी विभागासह मोठ्या शहरांचे आयुक्तपदी त्यांची नियुक्ती केली जाते. तर पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे कोल्हापूर, कोकण, अमरावती, नाशिक यासारख्या परिक्षेत्रासह काही शहराच्या आयुक्त, सहआयुक्त पदाची जबाबदारी दिली जाते.

शहरातील आयुक्तालय व ग्रामीण पोलिस दलातील पदांचा काहीसा वेगवेगळा उल्लेख आहे. मात्र, पदे समानच आहेत. शहर आयुक्तालयासाठी एसीपी तर ग्रामीण दलासाठी उपअधिक्षक असतात, दोन्ही पदे समान आहेत. तसेच उपायुक्त व अतिरिक्त अधीक्षक हे पद समान आहे.

असा आहे क्रम

पोलिस शिपाई (म.पो)
पोलिस नाईक (म.पो)
पोलिस हवालदार (म.पो)
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (म.पो)
पोलिस उपनिरीक्षक (म.पो)
सहाय्यक पोलिस निरीक्षक (म.पो.से)
पोलिस निरीक्षक (म.पो.से)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक (म.पो.से)
सहाय्यक पोलिस आयुक्त किंवा पोलिस उपअधीक्षक किंवा उपविभागीय पोलिस अधिकारी (म.पो.से)
पोलिस उपायुक्त किंवा अतिरिक्त पोलिस अधीक्षक (म.पो.से)
पोलिस उपायुक्त किंवा अतिरिक्त पोलिस अधीक्षक (भा.पो.से)
पोलिस उपायुक्त किंवा पोलिस अधीक्षक (भा.पो.से)
वरिष्ठ पोलिस उपायुक्त किंवा वरिष्ठ पोलिस अधीक्षक (भा.पो.से)
अतिरिक्त पोलिस आयुक्त किंवा पोलिस उपमहानिरीक्षक (भा.पो.से)
पोलिस सहआयुक्त किंवा पोलिस महानिरीक्षक (भा.पो.से)
पोलिस आयुक्त किंवा पोलिस महासंचालक (भा.पो.से)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top