इतक्या लहान मुलांना फटाके वाजवायचे नसतात हे कसं समजवायचं?

मुलांना फटाके देण्याची इच्छा नसतानाही भावनेचं पारडं आपसूक झुकतं.
environmental diwali
environmental diwaliesakal

"लहान मुलांवर एखादी गोष्ट लादणे आणि तीच गोष्ट त्यांना पटवून देणे या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक असतो. आम्ही आमच्या मुलींना फटाके कधीच आणलेच नाही असं नाही. पण जेव्हा जेव्हा आमच्या घरात हवा आणि ध्वनी प्रदूषणाविषयी चर्चा व्हायच्या त्यामुळे आमच्या दोन्ही मुली त्यात सहभागी व्हायच्या.

जेव्हा जेव्हा त्या प्रदूषण, प्राणी, पक्षी यांच्याविषयी प्रश्न विचाराच्या तेव्हा त्यांच्या प्रश्नांना आम्ही उत्तरे दिली.. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनाच मिळाली आणि त्यांनीच या वर्षी फटाके आणण्याचा विषय देखील काढला नाही" सिंहगड येथे राहणाऱ्या शिल्पा भालेराव आपल्या मुलींबद्दल अगदी भरभरून बोलत होत्या..

सध्या दिल्ली आणि मुंबई पाठोपाठ पुण्याच्या हवेचा दर्जा खाली आला असल्याचे हवा गुणवत्ता निर्देशांकावरून समोर आले आहे. सुप्रीम कोर्टाने देखील घातक रासायनिक घटक असलेल्या फटाक्यांवर बंदी घातली आहे.

पण तरीही अनेक सर्व्हेक्षणातून असे समोर आले की आजही बाजारात ग्रीन फटाक्यांच्या नावाखाली घातक रासायनिक घटक असलेल्या फटाक्यांची विक्री होते आहे. हवा आणि ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे.

फटाके वाजवू नये असे म्हणणे कदाचित सोपे असते.. परंतु आपल्या आजूबाजूला असणारी सर्व लहान थोर मंडळी जेव्हा दिवाळीत मोठमोठे फटाके वाजवताना दिसतात. फटाक्यांचे वेगवेगळे प्रकार घेऊन तुमच्याच मुलांची मित्रमंडळी तुमच्या मुलांसोबत खेळताना दिसतात अशा वेळी मुलं कळत नकळत फटाक्यांची मागणी करतात.

अशा वेळी पालकांना देखील आपल्या मुलांना फटाके देण्याची इच्छा नसताना परिस्थिती हाताळणे अवघड होते आणि भावनेचं पारडं आपसूक झुकतं.

शिल्पा आणि भूषण म्हणाले, आमची लहान मुलगी ईला चार वर्षांची आहे तर मोठी त्रिशा ही नऊ वर्षांची असून चौथीत आहे. दोघी लहान असताना आम्ही त्यांनी मागणी केली त्याप्रमाणे फटाके देखील आणून दिले. फक्त आम्ही त्यांना खूप जास्त प्रमाणात फटाके नाही दिले. दोन चार, दोन चार फटाके दिले.

कधी मुलींनी फटाके बाकीच्या मुलांसोबत शेअर करून देखील वाजविले. हवा प्रदूषण या विषयावार अनेक व्यासपीठावर चर्चा होत असते अशा ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन गेलो. आरोग्यावर त्याचे होणारे दुष्परिणाम मुलींनी आजूबाजूला पहिले त्यावर प्रश्न विचारले. आम्ही फक्त त्यांची खरीखरी उत्तरे दिली.

शिल्पा म्हणाल्या, हेच जर आम्ही जर त्यांच्यावर लादायचा प्रयत्न केला असता तर कदाचित त्यांनी आम्हालाच सांगितलं असतं की, "मग तुम्ही देखील नका वापरू गाड्या, सायकलवर जात जा ऑफिसला". पण कुठे शक्य आहे, कुठे नाही, गरज काय आहे आणि चैन काय यातला फरक मुलींना आपोआपच समजला.

भूषण म्हणाले, इलाला प्राणी, पक्षांविषयी खूप प्रेम आहे. ज्यावेळी फटाके वाजल्यावर पक्षी उडताना पाहते त्यावेळी ती आम्हाला विचारते की, "पक्ष्यांना भीती वाटली म्हणून ते उडाले का बाबा?" तर त्रिशाला आता समजतं. शाळेत देखील चांगल्या वाईट परिणामांची चर्चा होते त्यातून तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळतात.

जोरात प्रवाह असलेल्या पाण्याला एकदम बांध घालणे शक्य नसते. त्याला हळूहळू प्रवाह कमी करूनच बांध घातला की त्या पाण्याला फाटे फुटण्याची शक्यता कमी होते, असे भूषण आणि शिल्पा मात्र आवर्जून सांगतात.

environmental diwali
Diwali :जाणून घ्या इतिहासातील दिवाळी कशी होती?

शिवाजीनगर येथे राहणाऱ्या अमेय आणि अश्विनी पटवर्धन म्हणाले, आमची आनंदी सध्या चार वर्षांची आहे. मागच्या वर्षीपर्यंत ती थोडी घाबरत होती फटाक्यांना पण यावेळी मात्र तिने फटाके हवेत असा आग्रहच केला. आम्ही ठरवलं होतं की फटाके द्यायचे नाहीत. आणि मुख्य म्हणजे आम्हा सर्व मोठ्या मंडळींमध्ये याची एकवाक्यता होती.

फटाके न देण्याचं कारण अर्थात ध्वनी आणि हवा प्रदूषण आहेच. पण दिवाळी म्हणजे फक्त फटाके हा संस्कार मुलांवर रुजता कामा नये. दिवाळी म्हणजे अनेक गोष्टी आहेत. त्याचीही माहिती तिला होणे गरजेचे आहे.

सुरुवातीला थोडीशी रुसली पण नंतर तिने ते मान्य केलं. सध्या ती खूप लहान आहे त्यामुळे प्रदूषण ही गोष्ट तिला कदाचित समजणार नाही. म्हणून मग आम्ही आजी आजोबांना, छोट्या बाळांना, आजारी माणसांना याचा कसा त्रास होते हे तिला समजावून सांगतोय.

तिचं म्हणणं होतं की मग मी काय करू? मला बोअर होतंय. त्यावेळी मी तिला रांगोळी काढायला, फराळ बनवायला माझ्या सोबत घेतले. आकाशदिवा देखील आम्ही घरीच तयार केला.

इतक्या लहान मुलांना समजणं आणि पटणं अवघड असतं पण वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही ते समजावतो. यावेळी मी अशी रांगोळी काढली होती ज्यात एका बाजूला फटाक्यांमुळे झालेले काळे ढग आणि दुसऱ्या बाजूला दिवा, आकाशदिवा आणि पांढरे ढग.. त्यामुळे तिला ते पटकन समजायला मदत झाली.

आमच्या घरात कामाला येणाऱ्या मावशींनी जेव्हा आनंदीला विचारलं की, "काय आनंदी फटाके आणले की नाही दिवाळीला? " त्यावेळी जरासाही वेळ घेता आनंदी म्हणाली, "फटाके उडवायचे नसतात काकू..!! "

_________

environmental diwali
Fire Crackers : फटाके तुमच्या शरीरासाठी किती घातक?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com