
शेतकऱ्याची लेक ते लेफ्टनंट कर्नल पदापर्यंतचा प्रवास, मीनल शिंदेची यशोगाथा
तनिष्का डोंगरे
आपल्या पालकांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वसामान्य घरातील रणरागिणीची यशोगाथा इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरते. अशा कथांमुळे अनेकींमध्ये विश्वास निर्माण होतो. अशाच एका सर्वसामान्य घरातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची यशोगाथा तरुणींना दिशादर्शक आणि त्यांचे करिअर घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी आहे, ती म्हणजे मीनल शिंदे-चव्हाण यांची.
सातारा जिल्ह्यातील हनुमानवाडी (उंब्रज) येथील मीनल शिंदे शेतकरी कुटुंबातील. अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये वावरणाऱ्या मीनल यांची स्वप्ने साधीच होती. परंतु, ती पूर्ण करण्यासाठी त्यांची जिद्द मात्र तितकीच मोठी होती. एका वेगळ्या करिअरला गवसणी त्यांनी घातली आणि ती यशस्वी करण्याचे कामही त्यांनी केले. आपल्या वडीलांचे नाव उंच करण्याचे ध्येय गाठताना त्यांना दिशा मिळाली ती देशसेवेची.
देशसेवेचे व्रत घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यातून आपला ठसा उमटवला. महिला असल्याचे कोणतेही अवडंबर न करता आपली कामगिरी कशी उत्तम होईल आणि त्यातून कशी देशाची सेवा होईल याकडे त्यांचे सतत लक्ष असते. विविध ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या मीनल शिंदे-चव्हाण या रणरागिणीने नुकतीच लेफ्टनंट कर्नलपदी झेप घेतली. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे गाव असलेल्या सातारचे नाव तर त्यांनी उज्ज्वल केलेच शिवाय त्यांचे सासर असलेल्या कोल्हापूरच्याही त्या शान झाल्या. नुकतीच त्यांनी कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन मोसन यांच्या हस्ते लेफ्टनंट कर्नलपदाची सूत्रे स्वीकारली.
हेही वाचा: ऐतिहासिक मस्तानी तलावाकडे दुर्लक्ष, साठलाय 50 हजार ब्रास गाळ...
घरची परिस्थिती बिकट असतानाही मुलीला शिकवण्याचे ध्येय मीनल यांच्या आई-वडील दोघांचेही होते. त्यांनी आपल्या लेकीला जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणास घातले. त्यांच्या हुशारीमुळे मीनल यांची निवड गुरुकुलमध्ये झाली. सातारच्या महाराजा सयाजीराव शाळेत त्यांनी ९ वी आणि दहावीचे निवासी वर्गात शिक्षण घेतले. त्यानंतर त्या पुन्हा उंब्रजला गेल्या. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मोठ्या कॉलेजला ॲडमिशन घेता आले नाही.
पहिल्यापासूनच मीनल यांना प्रशासकीय सेवेमध्ये जायचे होते. त्यांनी उंब्रजच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले. कला शाखेची पदवी घेतली. कॉलेज करताना यूपीएससी, एमपीएससी करण्यासाठी त्यांना कोचिंग क्लासला कराडला जावे लागायचे. त्यामुळे मीनल यांचे नवनवीन मित्र-मैत्रीण झाले. त्यांच्या माध्यमातून आर्मीमध्येही महिलांना संधी असल्याचे कळाले. ‘सीडीएस’च्या माध्यमातून आर्मीमध्ये ऑफिसर म्हणून जाता येते. तेव्हा त्यांनी असा विचार केला की, शॉर्ट टर्म सर्व्हिस असल्याने जर जमले नाही तर सोडताही येईल. त्यानंतर पुढे काय करायचे ते ठरवताही येईल.
सन २००८ मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्या देशात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यावेळेला त्या अवघ्या २० वर्षांच्या होत्या. त्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली. त्यांनी जम्मू-काश्मीर येथील राजौरी, पूँछ, नारिया अशा संवेदनशील ठिकाणी यशस्वीरीत्या सेवा केली. कॅप्टन म्हणून लेह, लडाख येथे दोन वर्षे उणे २५ अंश सेल्सिअस तापमानात उल्लेखनीय सेवा बजावली. तर रांची, गुवाहाटी, आसाम, येथेही त्यांनी कर्तव्य बजावले. त्यांच्याकडे एएससी बटालियन डेहराडून येथे डेप्युटी कमांडरचा पदभार होता. त्यांना लेफ्टनंट कर्नलपदी पदोन्नती मिळाली आहे.
मीनल सांगतात सिलेक्शन झाल्यानंतर मला माहितही नव्हते काय करायचे ते. आमच्या येथे आर्मी ऑफिसर्स फार नव्हते. होते ते पण उंब्रजला. त्यांच्याकडे जाऊन माझ्या वडिलांनी माहिती घेतली. त्यानंतर माझे ट्रेनिंग झाले. त्यावेळेला त्या २१ वर्षांच्या होत्या. मीनल सांगतात सातारा, सांगली, कोल्हापूर येथे आर्मीसंदर्भातील कोचिंग नाही. ते पुण्यात आहे. त्यामुळे पुस्तकांमधून माहिती घेऊनच पुढे पाऊल टाकले. जेव्हा मी ट्रेनिंगला गेले तेव्हा घाबरले होते. ट्रेनिंगमध्ये बरेच शिकायला मिळते. सर्व एटिकेटस् येथे आल्यावर शिकले. ट्रेनिंग खूप हार्ड असते.
त्यामध्ये १० ते १५ किलेमीटर रनिंग, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतात. त्यामुळे वेळही नसतो. किमान अठरा तास ट्रेनिंगमध्ये बिझी असतो. पहाटे साडेचार पासून रात्री कधीकधी अकरा बारा वाजतात. त्यातूनच पुढच्या आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांसाठी तयार केले जाते. त्यामुळे पुढे जाऊन सगळ्या सिच्युएशन हँडेल करण्याचे ट्रेनिंग येथेच मिळते. सहा महिने ट्रेनिंग झाले. आमच्या बटालियनमध्ये आम्ही दोघीच महिला होतो. बाकी सगळे पुरुष होते. ट्रेनर्सनी आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्यावेळी चुका व्हायच्या पण त्यातून वरिष्ठांची बोलणी खात आम्ही शिकलो. त्यांनीही आम्हाला समजावून सांगितले. त्यामुळे सुधारणा होण्यास मदत झाली.
हेही वाचा: मध्यप्रदेशात मराठी भाषा जोपासली जातेय कारण...
मीनल सांगतात आमची बॅच पासआउट झाली तेव्हा आम्ही एकूण ५५ जणी होतो. २००८ मध्ये मी पासआउट झाले. त्यानंतर आमचे सिलेक्शन वेगवेगळ्या बटालियनमध्ये झाले. सध्या आम्ही त्या सगळ्या संपर्कात आहोत. आता तर वॉटस अप ग्रुप आहेत त्यामुळे आम्ही संपर्कात असतो. काही इव्हेटस, कोर्समध्ये पण भेटत रहातो. कधीकधी जवळपास पोस्टिंग असेल तर भेट होतेच. माझ्या बटालियनमध्ये नॉर्थ इंडियन महिला बऱ्याच होत्या महाराष्ट्रातील जळगावमधील एक जण होती.
एखादे काम दिल्यावर ते जमेल का नाही असे वाटायचे. परंतु ते जमल्यावर मग जास्त विश्वास यायचा. मला आधी असे वाटायचे की मी पाच वर्ष करून थांबेन, पण जेव्हा त्या करिअरमध्ये गेले. तेव्हा वेगळी भावना वाटू लागली. त्यामध्ये आवड निर्माण झाली. त्यानंतर पडलेल्या जबाबदाऱ्या मी आनंदाने स्वीकारत गेले. माझ्या मैत्रिणी या क्षेत्रात नाहीत. काही जणींची तर लग्नही झाली आहेत. त्यांच्याशी तुलना करता मला असे वाटू लागले की ही मला मिळालेली चांगली संधी आहे तिचा उपयोग करून घ्यावा. गावाकडे असल्याने माझ्या आईला जे अधिकार मिळाले नाहीत ते तिच्या मुलीला मिळावेत असे वाटायचे. तिने साठवलेले पैसे ती मला शिक्षणासाठी द्यायची. त्यामुळे लहानपणापासून जाणीव होती की मला काही तरी चांगले करायचे आहे.
ट्रेनिंग नंतर माझे पहिले पोस्टिंग झाले ते जम्मू काश्मीरला. दोन वर्षांनंतर कॅप्टनपदी प्रमोशन झाले. त्यामुळे या कामामध्ये आणि त्यातील असलेल्या देशसेवेप्रती माझे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कायम उत्सुक असायचे. त्यातूनच आज पुढे जाताना खूप अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.
मीनल यांचा विवाह लाचलुचपत विभागात पोलिस उपअधिक्षक सुशांत चव्हाण यांच्याशी झाला. त्यानंतरही त्यांनी आर्मीतील सेवा बजावण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना त्यांच्या पतीसह सासरच्या मंडळींचीही मदत मिळते आहे. विवाहानंतर त्यांनी रांची, गुवाहाटी, आसाम, येथे कर्तव्य बजावले. काही काळ त्या महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर येथेही कार्यरत होत्या. वर्षातून तीन महिने सुट्टीचे मिळतात ते कुटुंबासमवेत त्या घालवतात. इतरवेळी मात्र देशसेवेसाठी त्या तत्पर असतात. मीनल यांना लहान मुलगा आहे. त्याला सांभाळत त्या आपले कर्तव्य बजावतात. त्यासाठी त्यांना त्यांच्या सासू-सासऱ्यांचे सहकार्य मिळते. त्या सांगतात. सध्या माझे पोस्टिंग जिथे आहे, तेथे माझे सासू-सासरे माझ्या सोबत असतात. त्यामुळे चांगल्याप्रकारे काम करता येते.
आपल्याकडे अनेकांना आर्मीबाबतची फारशी माहिती नाही. त्यामध्ये करिअरच्या संधी माहिती नाहीत. त्यामुळे माझे पोस्टिंग महाराष्ट्रात असताना मी बऱ्याच कॉलेजमध्ये दिलेल्या लेक्चरच्या माध्यमातून मुलांना या क्षेत्राबाबतची माहिती द्यायचे. अनेक वेळा माझ्या सुट्टीत विद्यार्थी मला भेटायला येतात. त्यांना जमेल तेवढे मार्गदर्शन करत असते. आर्मीत आता मिलिटरी पोलिसमध्येही महिलांना संधी आहे. गेल्यावर्षी त्याची पहिली बॅच आली होती. त्यामुळे आता मुलींना ही चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्याच्या तरुणाईला मी हेच सांगेन की, विनाकारण वेळ वाया न घालवता तो वेळ चांगल्या कामासाठी वापरावा. त्यामध्ये अभ्यास केला आपले ध्येय समोर ठेऊन त्यादृष्टीने वाटचाल केल्यास निश्चितच कोणत्याही क्षेत्र असो त्यामध्ये आपण आपली यशस्विता सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याला नक्की काय करायचे आहे हे ठरवून ध्येय गाठले पाहिजे.
माझ्या अनेक मैत्रिणी आहेत की, ज्यांनी लग्नानंतर जॉब सोडले आहेत. आमचे पोस्टिंग सांगून होत नाही. त्यामुळे घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. भविष्यात काय करायचे हे मी ठरवले नाही. पण जितकी सेवा देता येईल तितकी देण्याची इच्छा आहे.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”