
''त्या शब्दाचा उच्चार म्हणजे गानसम्राज्ञीच्या भात्यामधला लक्षवेधी बाण होता... ''
ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर लतादीदींबरोबर एक गाणं गात होते. त्यात दीदींनी एक शब्द गाण्याच्या ओघात असा काही उच्चारला, की ते चक्क त्यांची पुढची ओळच विसरले. ज्या एका शब्दामुळे सुरेश वाडकर त्यांचं गाणं विसरले, त्या शब्दाचा उच्चार म्हणजे गानसम्राज्ञीच्या भात्यांमधल्या लक्षावधी बाणांपैकी एक बाण होता. हा बाण होता गाण्यामधल्या अभिनयाचा. एकेक शब्द जिवंत करण्याच्या त्यांच्या क्षमतेचा. नेमकी काय होती ही प्रतिभा?
ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर नुकतेच कोथरुड सांस्कृतिक महोत्सवात आले होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना स्वरांजली देणाऱ्या कार्यक्रमात त्यांनी दीदींबद्दल एक किस्सा सांगितला. लतादीदींबरोबर ते गाणं गात होते. त्यात दीदींनी एक शब्द गाण्याच्या ओघात असा काही उच्चारला, की ते चक्क त्यांची पुढची ओळच विसरले. ते दीदींकडे बघतच बसले. काय झालं ते संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनाही कळलं नाही. शेवटी सुरेशजी ते कडवं ते पुन्हा गायले आणि गाणं संपलं. सुरेश वाडकर यांच्यासारखा स्वरावर आणि सुरांवरही हुकूमत असणारा गायक त्याचं गाणंच विसरतो, तेव्हा त्याला असं काय अद्भुत जाणवलं असेल?
..मंडळी, खरं तर हे अद्भुत अनेकांना अनेक वेळी जाणवलं असेल. ज्या एका शब्दामुळे सुरेश वाडकर त्यांचं गाणं विसरले, त्या शब्दाचा उच्चार म्हणजे गानसम्राज्ञीच्या भात्यांमधल्या लक्षावधी बाणांपैकी एक बाण होता. हा बाण होता गाण्यामधल्या अभिनयाचा. एकेक शब्द जिवंत करण्याच्या त्यांच्या क्षमतेचा. हे गाणं होतं ‘मेरी किस्मत में तू नही शायद’ आणि चित्रपट होता ‘प्रेमरोग.’ राज कपूर हे ‘ग्रेटेस्ट शोमन’ होते, यात शंकाच नाही; पण त्यांनी अनेकदा वेगळ्या वाटेवरचे प्रयोग केले, त्याच प्रयोगातल्या साखळीतला हा एक प्रयोग होता. विधवाविवाह हा एक अतिशय गंभीर सामाजिक विषय तितक्याच गंभीरपणानं राज कपूर यांनी सादर केला होता आणि त्यात कथेपासून अभिनयापर्यंत आणि दिग्दर्शनापासून संगीतापर्यंत सगळ्या गोष्टी अशा काही जुळून आल्या होत्या, की त्याला प्रेक्षकांनी उचलून धरलं होतं.
या चित्रपटात सतरा-अठरा वर्षं वयाच्या पद्मिनी कोल्हापुरे यांना आवाज दिला होता तो तेव्हा ५२ वर्षं वय असलेल्या लतादीदींनी. ‘ये गलिया ये चौबारा’ या गाण्यात पद्मिनी कोल्हापुरे यांच्या वयाला तितकाच अल्लड आवाज देणाऱ्या लतादीदींनी त्याच चित्रपटात ‘भंवरे ने खिलाया फूल’मधली प्रेमभावना स्वतःच्या आवाजातून अधोरेखित केली आणि ‘मेरी किस्मत में तू नही शायद’ या गाण्यातून विरहाची, वेदनेची भावनाही अधोरेखित केली. ‘मेरी किस्मत में’ हे गाणं तुम्ही नीट ऐकलंत तर ते अतिशय अवघड आहे; पण सुरेशजींनी आणि लतादीदींनी ते अतिशय सहजपणे गायलंय. मात्र, सुरांवर हुकूमत असलेल्या सुरेशजींना लतादीदींचा एक विलक्षण पैलू स्पर्शून गेला, तो म्हणजे गातागाता अभिनय करण्याचा. दोन्ही खांद्यावर घट्ट ओढलेला पदर, दोन वेण्या, पांढरी साडी अशा वेशातही केवळ गळ्यातून विलक्षण अभिनय करण्याचा, शब्दांना झळाळतं रूप देण्याचा हा पैलू. ‘मेरी किस्मत में’ हे गाणं पुन्हा ऐका, म्हणजे हा पैलू कळेल. एकीकडे अतिशय अवघड ताना दीदी या गाण्यात गात असताना, नायिकेची वेदनाही किती विलक्षण पद्धतीनं अधोरेखित करतात. या गाण्यात तिसऱ्या कडव्यात एक ओळ आहे, ‘तुझसे मिलने की आस है आ जा, मेरी दुनिया उदास है आ जा.’ याच ओळीमध्ये दीदींनी अतिशय ओघामध्ये, सहजपणे ‘उदास’ हा शब्द फार विलक्षण पद्धतीनं उच्चारला. त्यांनी अतिशय सहजपणे या शब्दावर इतकं नजाकतीनं काम केलं, ती नायिका उदास आहे हे केवळ त्या उच्चारावरून समजलं. या ‘उदास’ शब्दात दीदींनी भरलेल्या प्राणामुळेच सुरेशजी थरारून गेले आणि ते त्यांचं गाणं विसरले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.
तिन्ही सप्तकांचा वापर, स्वरांमधलं वैविध्य, श्वासावरची हुकूमत अशा काही गोष्टींत ‘एक्सलन्स’ असलेल्या दीदी काही शब्द अशा पद्धतीनं उच्चारतात, की ऐकणारा थक्कच होऊन जातो. सुरेशजींनीच एक उदाहरण दिलं आहे. ‘लेकिन’ चित्रपटातल्या ‘सूरमयी शाम इस तऱ्हा आये’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगची प्रक्रिया सुपू होती तेव्हाची गोष्ट. लता मंगेशकर याच या चित्रपटाच्या निर्मात्या, त्यामुळे त्या अर्थातच त्या वेळी उपस्थित होत्या. त्या वेळी त्यांनी सुरेशजींना एकच सूचना केली, ती फार विलक्षण होती. या गाण्यात एक ओळ आहे, ‘सांस लेते है जिस तऱ्हा साये.’ ही ओळ सुरेशजी अगदी प्लेन पद्धतीनं गात होते. दीदींनी सुचवलं, की हा ‘सांस’ शब्द गाताना त्यात श्वासाचा फील आला पाहिजे असा गाता आला तर बघा. त्यानंतर दीदी पुढे निघून गेल्या. सुरेशजींनी दीदींच्या सूचनेनुसार त्या शब्दावर काम केलं. आता हे गाणं पुन्हा ऐका. त्यात केवळ एका सूचनेमुळं काय जिवंतपणा आला बघा.
लता मंगेशकर यांच्या एकेका पैलूवर पुस्तकंच्या पुस्तकं लिहिता येतील; पण एकेका शब्दावर त्यांनी केलेलं काम हा एक फार वेगळा पैलू आहे. तो कमाल आहे आणि तो एकमेवाद्वितीय आहे. अनेक गायकांना ते अजूनही जमत नाही. काही जण करतात, पण त्यात नैसर्गिकपणा नसतो. दीदींनी लाखो शब्द त्यांच्या विलक्षण प्रतिभेनं जिवंत केले ते अगदी सहजपणानं, कोणताही आविर्भाव न घेता! ‘बघा, मी आता हा शब्द कसा गाते’ असा आविर्भाव कुठंही नाही. एखादा आध्यात्मिक माणूस एखादं स्तोत्र ज्या प्रकारे मनापासून, जीव ओतून म्हणत असतो, तशाच प्रकारे त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवलं आणि म्हणूनच ते काळाच्या पलीकडचं ठरलं. तुम्ही दीदींचं कोणतंही गाणं ऐका. ‘मी डोलकर डोलकर’ गाण्यात ‘गडगड ढगात बिजली करी, फडफड शिडात धडधड उरी’ या ओळीतला ‘धडधड’ हा शब्द ऐकताना खरंच धडधड जाणवते. ‘ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता’ या गाण्यात ‘चमचमती लखलखती’ या ओळीत ‘लखलखती’ या शब्दाचा त्या असा काही उच्चार करतात की खरंच लखलखते दिवे डोळ्यांपुढे उभे राहतात. ‘मोगरा फुलला’मध्ये ‘फुले वेचिता बहरू कळियासी आला’ या ओळीत कळियासी आला या शब्दात ‘कळी’ डोळ्यांसमोर दिसायला लागते. शेवटच्या काही वर्षांमध्ये त्यांनी गायलेल्या गाण्यांपैकी ‘आता विसाव्याचे क्षण’ या गाण्यात ‘काय सांगावे नवल’ या ओळीत ‘नवल’ हा शब्द त्या अशा प्रकारे उच्चारतात, की ‘नवल’ थेटपणे जाणवतं. या शब्दाआधी त्या अतिशय किंचिंत पॉज घेतात.
त्याचा किती विलक्षण परिणाम दिसतो तो तुम्ही ऐकून बघा. ‘नीज माझ्या नंदलाला’ हे श्रीनिवास खळे यांची विलक्षण संगीतरचना असलेलं गाणं ऐकून बघा. त्यात ‘शांत हे आभाळ सारे, शांत तारे शांत वारे’ या ओळीत ‘शांत’ या शब्दातून तो शांतपणा जाणवून देतादेता ‘या झऱ्याचा सूर आता मंद झाला रे’ या ओळीत ‘मंद’ हा शब्द त्या असा काही उच्चारतात की तो सूर मंद झाल्याचं वेगळं सांगावं लागत नाही. गाण्यातले शब्द जिवंत करण्याच्या त्यांच्या प्रतिभेची अनुभूती घेण्यासाठी ‘अभंग तुकयाचे’ हा अल्बम पुन्हा एकदा ऐका. ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस’ या ओळीतला ‘आस’ शब्द ऐका, ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ या ओळीतला ‘आनंद’ शब्द ऐका, ‘कन्या सासुऱ्याशी जाये’ मधल्या एका कडव्यातला ‘उतावीळ’ शब्द ऐका...कमाल कमाल कमाल!
लता मंगेशकर यांना गानसम्राज्ञी म्हणतात ते यासाठीच. त्यांनी केलेलं ‘डिटेलिंग’ हे केवळ आनंद घेण्यापुरतं नाही, ते अभ्यासण्यासारखं, अंमलात आणण्यासारखं आहे. कित्येक कलाकारांसाठी ती शिकण्याची खाण आहे. ‘आवाज’ ही ईश्वरी देणगी असते, यात शंकाच नाही; पण त्यात स्वतःच्या अभ्यासानं, प्रतिभेनं, कष्टानं काय करता येऊ शकतं याचा आदर्श दीदींनी घालून दिला म्हणून त्या ग्रेट. कोणत्याही बाह्य विभ्रमाचा वापर न करताही गाणं किती विलक्षण पद्धतीनं गाता येतं, उगाच ‘आंह उंह’ असं काही न करताही केवळ शब्दांच्या नेमक्या उच्चारांतून ते साध्य करता येतं हे दीदींनी दाखवून दिलं म्हणून त्या ग्रेट. शाळेत केवळ एक दिवस गेलेल्या लतादीदींनी अशा प्रकारे अनेक अभ्यासक्रम केवळ स्वतःच्या गाण्यांमधून शिकवले आणि त्या स्वतःच एक ‘विद्यापीठ’ झाल्या म्हणून त्या ग्रेट!...आणि मग लक्षात येतं, की दीदी आपल्यातून शरीररूपानंच गेल्या आहेत; पण हजारो गाण्यांमधून, स्वतःच्या आचरणातून त्यांनी जे काही मागं ठेवलंय ते कधीही संपणार नाही.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”