ओटीटी - नंगा-पुंगा दोस्त?

ओटीटी - नंगा-पुंगा दोस्त?

‘ओव्हर द टॉप’ अर्थात ‘ओटीटी’ या प्लॅटफॉर्मला कोरोनामुळं लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात तुफान महत्त्व आलं. तुम्हाला हवं ते आणि हवं तेव्हा पाहण्याची सोय असलेलं ओटीटी काही दिवसांतच सिनेरसिकांसाठी परवलीचा शब्द बनलं. देश-विदेशातील नवे-जुने, पूर्वी पाहायचे राहून गेलेले, नुकतेच रिलिज झालेले सिनेमे जाहिरातींच्या त्रासाविना, दिवसा-रात्री कधीही पाहण्याची सोय झाली. त्याच्या जोडीला वेबसिरिजचा धमाकाही होताच. ‘सेक्रेड गेम्स’पासून नोर्कोसपर्यंतचे व बॉम्बे बेगमपासून जगभरातील क्राईमवर आधारित बेवसिरिजचा पिटारा प्रेक्षकांसाठी खुला झाला. यात सेन्सॉरची कोणतीही अडचण नसल्यानं प्रेक्षकांना खरंतर एक नंगा-पुंगा दोस्तच मिळाला...कसं ते पाहुयात...

कोरोना काळात मल्टिप्लेक्ससह सर्व सिनेमागृहे बंद पडली आणि मनोरंजनाचे सर्वच मार्ग बंद झाले. त्याआधीच भारतात ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मची सुरवात झाली होती,मात्र त्याला हवा तेवढा प्रतिसाद नक्कीच नव्हता. नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइस या प्लॅटफॉर्मची बऱ्यापैकी चर्चा होती,ती त्यावरील बेवसिरिजमुळं. मात्र,मल्टिप्लेक्स बंद पडल्यानंतर सिनेमे पाहण्याचा पर्याय म्हणूनही ओटीटी हाच पर्याय शिल्लक राहिली आणि सिनेरसिक नाईलाजास्तव या प्लॅटफॉर्मकडं वळले. सिनेमा प्रदर्शित करण्याचे मार्ग खुंटल्यानं व फार वाट पाहणं शक्य नसल्यानं अनेक निर्मात्यांनी ओटीटीवर सिनेमे रिलिज करण्याचा धडाका लावला आणि या प्लॅटफॉर्मचं महत्त्व वाढतच गेलं. अनेक बिग बॅनरचे सिनेमे ओटीटीवर रिलिज झाले आणि या प्लॅटफॉर्मचे ग्राहक वाढतच गेले.

ओटीटी - नंगा-पुंगा दोस्त?
मेटाव्हर्समध्ये तुमचे स्वागत आहे!


ओटीटीची सुरवात बेवसिरिजनंच

खरंतर ओटीटी प्लॅट फॉर्मची सुरवात वेबसिरिजच्या माध्यमातूनच झाली. भारतात ‘नार्कोस’ किंवा ‘चर्नोबिल’सारख्या परदेशी वेबसिरिज चर्चेत आल्या व लोक त्या विविध माध्यमांतून मिळवून पाहू लागले. ओटीटीचे सबस्क्रिप्शन भरण्याकडं प्रेक्षकांचा कल खूपच कमी होता, त्याचं कारण अर्थातच मल्टिप्लेक्स सुरू होते आणि आवडत्या कलाकारांचे आवडते सिनेमे पाहण्याची सोय होती. ‘सेक्रेड गेम्स’सारखी वेबसिरिज भारतात प्रथम चर्चेत आली आणि त्याचबरोबर ‘नेटफ्लिक्स’ या प्लॅटफॉर्मची चर्चाही सुरू झाली. कोणतेही सेन्सॉर नसताना टोळीयुद्धासारखा विषय किती बेधडकपणे मांडता येऊ शकतो, हे या सिरिजनं दाखवून दिलं. नवाजुद्दीन सिद्दिकीपासून सैफ अली खानपर्यंतचे कलाकार या वेबसिरिजमध्ये होते आणि हिंसाचारापासून सेक्सपर्यंतच्या दृश्‍यांचा एवढा थेट वापर भारतीय प्रेक्षकांनी प्रथमच अनुभवला होता. एखादा तृतियपंथी थेट नग्न अवस्थेत पडद्यावर दाखवता येऊ शकतो,ही कल्पनाच भारतीयांनी केली नव्हती. मात्र,ते दृश्‍य प्रेक्षकांनी पडद्यावर पाहिलं. ‘मिर्झापूर’सारखी मालिका याचं अधिक पुढचं ‘व्हर्जन’ होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कालिन शेठ आणि मुन्ना ही नावं घराघरांत पोचली. त्यातील सेक्स आणि हिंसाचारानं तर सर्व मर्यादा ओलांडलेल्या पाहायला मिळाल्या. मानवी नातेसंबंधांचे थेट आणि भयंकर पैलू उलगडून दाखवताना दिग्दर्शकानं गोष्टी हव्या त्या पद्धतीनं सादर केल्या. कालिन शेठच्या पत्नीचे शारीरिक संबंध त्याच्याबरोबर त्याच्या वडिलांशी,नोकराशी आणि (सावत्र) मुलाशीही दाखवत आजपर्यंत सर्व विक्रम मोडीत काढले गेले! त्याच्या जोडीला सुरवातील उल्लेख केल्याप्रमाणे ‘नार्कोस’सारख्या परदेशी वेबसिरिजमधून अमली पदार्थांच्या स्मगलिंगचं विश्‍व,त्यातील हिंसाचार, स्पर्धा यांचे अनेक पैलू उलगडून दाखवले गेले. या वेबसिरिजचं छायाचित्रण जबरदस्तच होतं आणि भारतीय प्रेक्षकांसाठी एक नवं दालन खुलं करणारंच होतं. ‘चर्नोबिल’ या रशियातील चर्नोबिल अणुभट्टीत झालेल्या अपघाताची यथासांग चित्तरकथा मांडणारी मालिकाही अशीच प्रेक्षकांना एका वेगळा अनुभव देऊन गेली.


हे सुरू असतानाच कोरोनामुळं भारतातील सर्वच सिनेमागृह बंद पडली होती आणि प्रेक्षकांची मनोरंजनाची भूक खूपच मोठी होती. ‘नेटफ्लिक्स’, ‘ॲमेझॉन प्राईम’च्या जोडीला ‘झी ५’, ‘डिस्ने हॉटस्टार’ ‘सोनी एलआयव्ही’सारखे अनेक प्लॅटफॉर्म येत होते व मराठीतही काही आले. या सर्वांनी मिळून प्रेक्षकांना ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ या न्यायानं प्रचंड कंटेंट पुरवण्यात सुरवात केली होती. यात दर आठवड्याला नव्या मालिका आणि नव्या चित्रपटांचा रतीब घातला जाऊ लागले. ‘देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,’अशीच प्रेक्षकांची अवस्था झाली होती.

काही असे, काही तसेही...

नेटफ्लिक्स’सारखा प्लॅटफॉर्म जगभरातील चांगल्यात चांगला माल-मसाला आणून आपल्या प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी ओळखला जाऊ लागला. या प्लॅटफॉर्मवरील वेबसिरिज अधिक बोल्ड,विषयांची थेट मांडणी करणाऱ्या,सेन्सॉरचा लवलेशही नसलेल्या असल्यानं त्यांना मोठा प्रेक्षकवर्ग मिळत गेला. ‘बॉम्बे बेगम’सारख्या किंवा सेक्स याचा विषयाला वाहिलेल्या अनेक इंग्रजी वेबसिरिज या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक राजरोसपणे पाहू लागले. प्रत्येक सिरिजच्या सुरवातीला तिचं रेटिंग देऊन त्यात कोणत्या प्रकारचा कंटेंट आहे याचा इशारा दिला जातोच व त्याचबरोबर तुम्हाला घरात लहान मुलं असल्यास त्यांच्या वयाप्रमाणं सेटिंग करून देत मुख्य अकाउंटला पासवर्ड देण्याचीही सोय आहे. मात्र,मुलांच्या हाती पासवर्ड लागल्यास त्यांच्या हाती कोणत्या प्रकारच्या मालिका आणि चित्रपट जातील याची भीती पालकांच्या मनात कायम राहतेच. सांगायचा मुद्दा हा,की हा अतिशय बोल्ड कंटेंट घरबसल्या व मोबाईल,टीव्ही, लॅपटॉप अशा कोणत्याही स्क्रीनवर, कोणत्याही वेळी पाहण्याची सोय असल्यानं प्रेक्षकांची मनोरंजनाची भूक भागू लागली. ‘बॉम्बे बेगम’सारख्या किंवा गुन्हेगारीच्या सत्यघटनांचं विश्‍लेषण मांडणाऱ्या सिरिजना प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली. दिल्लीत घडलेल्या एकाच घरातील ११ आत्महत्यांवर आधारित सिरिज असो अथवा दक्षिणेत घडलेल्या खुनांवरली सिरिज, प्रेक्षकांनी त्याला पसंती दिलीच. ‘बॉम्बे बेगम’ या सिरिजनं कॉर्पोरेट विश्‍वातील राजकारणाचा व गळेकापू स्पर्धेचा व त्यातून तयार होणाऱ्या नव्या नातसंबंधांचा पट मांडला. त्यातील नातसंबंध दाखवताना सेक्सचा केलेला सढळ वापर,हिंसाचाराच्या घटना आणि गरीब-श्रीमंतांतील दरी दाखवतानचं चित्रणही भेदक ठरलं. एकंदरीतच,सेक्स, हिंसाचार आणि नातेसंबंधांतील तणाव दाखवणाऱ्या सिरिज पाहणाऱ्या प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग तयार होत गेला.

ओटीटी - नंगा-पुंगा दोस्त?
आनंददायी मुलं वाढवा, सुदृढ समाज घडवा

‘पंचायत’ ते ‘फॅमिली मॅन’

एका बाजूला सेक्स आणि हिंसाचाराचं ओटीटीवरचं महत्त्व वाढत असतानाच काही अत्यंत वेगळे विषय हाताळणाऱ्या,प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणाऱ्या सिरिजही काही प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्या आणि यात ॲमेझॉन प्राईमचा वाटा मोठा होता. दीपक कुमार मिश्रा यांचं दिग्दर्शन असलेल्या व जितेंद्र कुमार या वेबसिरिजमधूनच पुढं आलेल्या अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पंचायत’ या सिरिजचा उल्लेख करावा लागंल. शहरातील एक उच्चशिक्षित तरूण एका खेड्यामध्ये पंचायत संस्थेतील अधिकारी म्हणून रुजू होतो आणि तिथल्या व्यवस्थेचा भाग होताना उडालेल्या धमाल प्रसंगांवरची ही मालिका जबरदस्तच. तिनं ऐंशी-नव्वदीच्या दशकातील दूरदर्शनवरील मालिकांचीच आठवण करून दिली नसती, तरच नवल! ‘फॅमिली मॅन’ या मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या मालिकेसंदर्भातही हेच म्हणता येईल. अंडरकव्हर एजंट आणि त्यानं पाकिस्तानच्या कारवायांविरोधात उडलेली मोहीम असा विषय असला,तरी त्याला कुटुंबाची जोड दिल्यानं हा विषय प्रेक्षकांना भावला. या मालिकेच्या दुसऱ्या भागात आपला नायक तमीळ बंडखोरांशी लढताना दिसला,मात्र पुन्हा एकदा कुटुंब हा मुद्दा कायम राहिल्यानं ही सिरिज पहिल्या भागापेक्षा अधिक चर्चेत राहिली. ‘कोटा फॅक्टरी’सारखी कोटामधील ‘आयआयटी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची कैफियत मांडणारी बेवसिरिजही प्रेक्षकांनी उचलून धरली. या सिरिजचा दुसरा भाग पुरेशी पकड घेण्यात अयशस्वी ठरला, मात्र तिसरा भाग अधिक चांगला असंल, यात सिरिजच्या चाहत्यांना शंका नाही. `हंड्रेड डेज’ ही रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेली थ्रिलर, ‘बंदिश बॅण्डिट’सारखी संगीतावर आधारित किंवा ‘तांडव’ व ‘महाराणी’सारख्या राजकारणावर बेतलेल्या वेबसिरिजचाही उल्लेख करावा लागेल.

ऑफ बिट सिनेमांनाच मागणी

ओटीटी प्लॅटफॉर्मवर गेल्या दीड वर्षांत अनेक सिनेमे प्रदर्शित झाले,मात्र मसाला किंवा केवळ मनोरंजनाचा उद्देश असलेल्या चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. ‘राधे’ या सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा उल्लेख त्यासाठी पुरेसा ठरवा. मात्र,काही वेगळे प्रयोग असलेल्या ‘गुलाबो सिताबो’, ‘ल्युडो’, ‘चेहरे’सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद तुलनेनं चांगला होता. यामध्ये इतर भाषिक चित्रपट व त्यातल्या त्यात तमीळ व मल्याळम चित्रपटांना प्रेक्षकांचा मिळालेल्या प्रतिसाद अतिशय उत्तम होता. याचं कारण अर्थातच या चित्रपटांतील प्रयोगशीलता हेच आहे. यात धनुषची प्रमुख भूमिका असलेला ‘कर्णन’,कंगना राणावतचा ‘थलैवी’, ‘मंडेला’, ‘लाबम’ त्याचबरोबर कोरोनातील क्वारंटाइनमध्ये अडकून पडलेल्या संगीतकाराची गोष्टी सांगणारा ‘सनी’ अशा अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल.


ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही जुने हिंदी व इंग्रजी सिनेमेही पाहायला मिळतात आणि काही नव्यानं समाविष्टही होत असतात. त्यामुळं मोकळ्या वेळात एखादा पाहायचा राहिलेल्या जुन्या सिनेमाचा मनसोक्त आनंदही लुटता येतो. या सर्व प्लॅटफॉर्मवर असलेल्या आर्टिफिशिय इंटेलिजन्समुळं तुम्ही एखादा विनोदी किंवा सस्पेन्स सिनेमा पाहिल्यास तुम्हाला तशाच सिनेमांची यादी सादर केली जाते आणि तुमचं सिनेमा पाहणं अधिक समृद्ध होत जातं...

ओटीटी - नंगा-पुंगा दोस्त?
राष्ट्रपती कोविंद यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन! पाहा खास फोटो

एकंदरीतच, ओटीटीचं विश्‍व खूप विशाल आहे आणि त्यात अनेक गोष्टी निवडण्याची संधी आहे. हा तुमचा नवा दोस्त आहे. काहींसाठी तो नंगा-पुंगा आहे,तर काहींसाठी नवं विश्‍व खुलं करणारा,जगण्याचा आनंद देणारा ते अधिक समृद्ध करणारा आहे यात शंकाच नाही. आता कोरोनाची लाट ओसरून सिनेमागृहे सुरू होत आहेत व त्यामुळं ओटीटीचं महत्त्व कायम राहणार की घटणार,हा कळीचा मुद्दा आहे. भविष्यात या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका व चित्रपटांना सिनेमागृहांशी टक्कर द्यावी लागणार आहे. यात बाजी कोणीही मारली तरी अंतिमतः फायदा प्रेक्षकांचाच होणार यात शंका नाही.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com