
आर. डी. बर्मन यांच्या निधनानंतर प्रदर्शित झालेल्या आणि इतिहास घडवणाऱ्या '१९४२ अ लव्ह स्टोरी`' या चित्रपटातल्या 'कुछ ना कहो` 'या गाण्याची पहिली चाल विधू विनोद चोप्रा यांना अजिबात आवडली नव्हती. त्यावरून त्यांनी आरडी यांच्या तोंडावर टीका केली होती. मात्र दुसरी चाल अशी होती की....''कमाल!!' काय होता या गाण्याचा नेमका किस्सा?
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो!!
काही वेळा प्रतिभा आणि लोकप्रियता यांचं गणितच काही केल्या जमत नाही. अफाट प्रतिभेचे संगीतकार आरडी बर्मन यांचं शेवटच्या काळात असंच झालं होतं. काम मिळत नव्हतं, हाताला आधीइतकं यश मिळत नव्हतं. `लिबास`सारख्या चित्रपटातली गाणी चांगली असली, तरी चित्रपट चालत नव्हते. नासिर हुसेन यांच्या सगळ्या चित्रपटांना ज्या आरडींनी लोकप्रियतेच्या उंचीवर नेलं, अशा नासिर हुसेन यांच्या प्रॉडक्शनचा `कयामत से कयामत तक` हा चित्रपट नव्या पिढीकडे गेला होता.
सुभाष घई `रामलखन`चं संगीत त्यांच्याकडे सोपवणार अशी चर्चा होती, पण हा चित्रपट लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडे गेला होता. नवनवे संगीतकार आणि प्रवाह उदयाला येत होते. थोडक्यात सिंह म्हातारा झाला होता. गवत खायची वेळ येईल की काय अशी वेळ आली होती.... पण प्रतिभावंतांचे दरवाजे फार काळ बंद राहत नाहीत. संधी दार ठोठावतेच. दादांकडे अशी संधी आली. विधू विनोद चोप्रा यांच्या रूपानं.
हेही वाचा: दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’
विधू विनोद चोप्रा हा प्रतिभावान चित्रकर्मी. त्याच्या `परिंदा`मध्ये आरडींनी `तुमसे मिलके` नावाचा मास्टरपीस दिला होताच. विधू विनोद चोप्रांना या कलावंताची कदर होती आणि ज्या स्केलवर ते काम करत होते. त्यासाठीआरडींच्याच स्केलच्या प्रतिभावंताची गरज होती. त्यातलं एक गाणं फार मोलाचं होतं चित्रपटासाठी. `कुछ ना कहो` हे गाणं. या गाण्याची चाल आरडींनी नेहमीच्या वेगानं तयार केली. विधू विनोद चोप्रा सीटिंगसाठी आले. त्यांनी चाल ऐकली, पण ती त्यांना अजिबातच आवडली नाही. त्यांनी संताप व्यक्त केला. `दादा, डोंट गिव्ह मी धिस बुलशिट` असं त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावलं. आरडींनी विचारलं `मी सिनेमात आहे की नाही?` विधू विनोद चोप्रांना त्यांना बदलायचं नव्हतंच. पण त्यांना या संगीतकाराला आव्हान आणि आवाहन कसं द्यायचं हे माहीत होतं. वर एसडी बर्मन यांचा फोटो होता. `दादा, आय एम लूकिंग फॉर हिम. तुमच्याशिवाय दुसरं कोणी हे संगीत देऊ शकणार नाही हे मला माहीत आहे. मला हा लूक देऊ नका,`असं ते म्हणाले. आरडी काय समजायचं ते समजले. त्यांनी एक दिवसाचा वेळ मागितला. त्या एका दिवसात त्यांनी प्रतिभादेवीला आवाहन केलं. एक ट्युन मनाशी तयार झाली.
दुसऱ्या दिवशी विधू विनोद चोप्रा आले. आरडींनी त्यांच्या आवाजात काही बंगाली शब्द वापरत एक ट्युन ऐकवली. ती अद्भुतच होती. विधू विनोद चोप्रांनी डोळे मिटले. त्यांचा हात आपोआप वर गेला. त्यांना या गाण्यासाठी जी एक विशिष्ट लय अपेक्षित होती, ती बरोबर मिळाली होती. त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. ही ट्युन उत्तमच होती. त्यांना पूर्ण गाणं ऐकायची आवश्यकता नव्हती. काही सेकंदांची सुरावट आरडींचं सामर्थ्य दाखवायला पुरेशी होती. आरडींना दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारलं होतं आणि एखाद्या मल्लासारखं त्यांनी ते तितक्याच कुशलतेनं परतावूनही लावलं होतं.
या गाण्याची दोन व्हर्जन्स आहेत. एक प्रेमगीत- जे कुमार शानूनं गायलंय आणि दुसरं आहे सॅड व्हर्जन जे लता मंगेशकर यांनी गायलंय. लतादीदींनी गायलेलं `कुछ ना कहो` आधी रेकॉर्ड झालंय. खरी गंमत म्हणजे कुमार शानूच्या रेकॉर्डिंगच्या वेळी झाली. कुमार शानूला आरडींनी खास बोलवून घेतलं. त्याला सगळी सिच्युएशन समजावून सांगितली. कुमार शानूनं रिहर्सल म्हणून त्यात सगळ्या भावना ओतून गाणं गायलं. आता रेकॉर्डिंगची वेळ- पण त्याच्या आधीच आरडी त्याच्याकडे आले. त्यांनी त्याला मिठी मारली. `तू काय गायलंयस तुला कळतंय का` असं विचारत त्याला कन्सोलजवळ घेऊन गेले. रिहर्सल म्हणून कुमार शानूनं गायलेलं गाणं हेच फायनल गाणं झालं. केवळ काही मिनिटांत रेकॉर्ड आणि ओके झालेलं हे गाणं.
हेही वाचा: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांचा प्रेरणादायी प्रवास; पाहा व्हिडिओ
या सिनेमानं आणि गाण्यानं एक कीर्तिमान स्थापित केला. नव्वदीनंतरच्या दशकात `रोझा`, `१९४२ अ लव्ह स्टोरी`, `दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे` असे बरेच टप्पे आहेत हिंदी चित्रपटसंगीतातले. पण `१९४२` हा एक फक्त आणि फक्त म्युझिकल मास्टरपीस होता. `एक लडकी को देखा तो ऐसा लगा` हा प्रयोग मला स्वतःला फार मोलाचा वाटतो. `एक लडकी को देखा तो` हे फक्त एक वाक्य आणि पुढं जैसे जैसे म्हणत एकेक उपमा. किती अवघड आहे असं गाणं एक्झिक्युट करणं. सृजनशील कलाकारच असं करू जाणोत. कुमार शानूनं ते फार छान, जीव ओतून गायलंय. या चित्रपटातल्या सगळ्या गाण्यांचं ऑर्केस्ट्रेशन हे तर विलक्षण आहे. `एक लडकी को देखा तो`च्या आधीचा तो पीस, एको...सगळं अद्भुत.
वैयक्तिक आवडीचं विचाराल तर मला आवडतं ते कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गाणं. `प्यार हुवा चुपकेसे.` केवढी रेंज आहे या गाण्यात. कविता कृष्णमूर्ती यांनी अफाट गायलंय. त्यातला `रेरुना रेरुना` हा कोरस आणि वाद्यमेळ अंगावर येतो. हे गाणं चित्रीत होताना त्याला तितका न्याय मिळाला का, असा प्रश्न मी स्वतःला विचारतो आणि तो तेवढा ठामपणे होकारार्थी येत नाही. `कुछ ना कहो` आणि `एक लडकी को देखा तो` ही मात्र गाणी कमाल चित्रीत झाली आहेत. विशेष म्हणजे इतका महत्त्वाचा चित्रपट असूनही त्यात आशा भोसले नव्हत्या. लता मंगेशकर यांच्या वाट्याला मात्र `कुछ ना कहो` हे गाणं आलं. ते मला खूप म्हणजे खूप आवडतं. `कुछ ना` या शब्दाच्या शेवटी गोलाई देत `कहो` हा त्यांनी उच्चारलेला शब्द. अप्रतिम. `सुनना है` हे शब्द दीदींनी कसे उच्चारलेत ते तुम्हीच ऐका. केवळ शब्दोच्चारातून अभिनय कसा करायचा याचा दीदी मानदंड का आहेत हे दाखवणारं हे गाणं.
हेही वाचा: मालिका निर्मात्यांची डोकी तपासा!
हा चित्रपट म्हणावा तितका चालला नाही, पण चित्रपटसृष्टीतल्या महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक म्हणून त्याचं स्थान कायमच राहणार आहे. ते स्थान विधू विनोद चोप्राच्या संकल्पनेमुळे आणि दिग्दर्शनामुळे आहे, त्यापेक्षा किती तरी पटीनं ते आरडींमुळे आहे. आरडींनी या चित्रपटाच्या निमित्तानं स्वतःला रिइन्व्हेंट केलं. अजूनही त्यांच्या स्टाईलमधली ही गाणी वाटत नाहीत. स्वतःची एक अतिशय वेगळी बाजू ते शोधू शकले आणि सृजनाच्या शिखरावर जाऊ शकले, त्यामुळे हा चित्रपट एक मानदंड बनला.
दुर्दैवानं हा चित्रपट बघायला ते जगात राहिले नाहीत. या चित्रपटाचं यश ते बघू शकले नाहीत. त्यांचा मधला सगळा अंधार या एका दिव्यानं दूर करून टाकला होता. त्या वर्षीचे सगळे पुरस्कार या चित्रपटानं मिळवले, पण आरडी ते बघायला नव्हते. ते असते तर?..मेलडीची एक वेगळी लाट आली असती? कुणास ठाऊक. हल्ली एकेका चित्रपटाला अकरा-अकरा संगीतकार असताना एकेका गाण्यावर इतकी मेहनत घेणारे चित्रकर्मी एके काळी होते, म्हणूनच तो सगळा काळ अजूनही आपल्या कानात आहे, हृदयात आहे. या चित्रपटातल्या गाण्यांनी काही मिनिटांसाठी काळ पॉज झाल्यासारखं वाटतं. त्यानं त्यावेळी 1942मध्ये नेलं की नाही माहीत नाही, पण आज ती गाणी ऐकताना आपण मात्र नव्वदच्या काळात नक्की जातो. तो सगळा काळ आपल्यापुढं उभा राहतो. विचार इतकाच येतो, की किमान काही क्षणांसाठी काळ थांबवण्याचं सामर्थ्य असलेला चित्रपटसंगीताचा तो काळ आता कुणी थांबवला आहे बरं? कुणी उत्तर द्यायचा प्रयत्न केलाच तर मी एवढंच म्हणेन...कुछ ना कहो, कुछ भी ना कहो!!
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”